इतिहासाचे एक पान. ९४

चौपाटीवरील सभेंत उडालेल्या गोंधळानं महाराष्ट्र काँग्रेसचे नेतेहि अस्वस्थ बनले, पण त्यांनी पाटील आणि मोरारजी यांना जाहीरपणे दोष न देतां गोंधळ माजवल्याबद्दल लोकांनाच दोष दिला. शंकरराव देव यांनी तर प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून पांच दिवसांचं उपोषण सुरु केलं. मोरारजी-पाटील यांनी लोकांना भडकावून देण्याच्या डावरेंचाबद्दल देवगिरीकर गप्प कां आहेत, याचा उलगडा जनतेला होत नव्हता. गांधीप्रणीत आत्मशुद्धीचा देव यांच्या उपोषणाचा परिणाम लोकांच्या मनावर होणं शक्यचं नव्हतं. करण त्यांच्या स्वाभिमानालाच पाटील-मोरारजी यांनी आव्हान दिलं होतं. याचं दर्शन या सभेच्या दुस-याच दिवशी घडलं.

संयुक्त महाराष्ट्र कृती समितीनं २१ तारखेला हरताळाचा आदेश दिलेलाच होता. हा हरताळ एवढा प्रचंड प्रमाणांत यशस्वी झाला की, विरोधी पक्षाचे नेतेहि त्यामुळे आश्चर्यचकित झाले. मनांतून संतापलेले हजारो लोक हरताळाच्या दिवशी दुपारी कौन्सिलहाँलच्या रोखानं निघाले. हा मोर्चा शांततेनं चालला होता. मुंबईंतल्या फ्लोराफाउंटन भागांत मोर्चेवाले पोंचले तेव्हा तिथे माणसांचा अक्षरशः महासागर निर्माण झाला. हत्यारी पोलीस, साधे लाठीधारी पोलिस आणि गृहरक्षक हेहि मोठ्या संख्येनं रस्ते अडवून उभे होते. फ्लोराफाउंटनला त्या दिवशीं युद्धभूमीचं स्वरुप प्राप्त झालं. पोलिसलोकांना मागे हटवत आहेत आणि लोक जिद्दीनं पुढेच जात आहेत, असं बराच वेळ सुरु राहिलं. लोकांचा रेटा थोपवता येत नाही असं पाहून मग पोलिसांनी लाठ्या चालवून त्याना मागे हटविण्यास प्रारंभ केला. मागोमाग अश्रुधुरांचीं नळकांडीं फुटू लागलीं आणि लगेच गोळबार सुरु झाला. गोळीबारालाहि लोकांनी दाद दिली नाही आणि परिस्थिती पूर्णपणें पोलिसांच्या आटोक्याबाहेर गेली. गोळीबारानं माणसं मारलीं जात आहेत असं समजतांच एस.एम.जोशी, नौशेर भरूचा, अमूल देसाई हे कौन्सिलहाँलमधून धांवत बाहेर आले आणि भडकलेल्या लाखो लोकांना त्यांनी थोपवलं. या सर्व लोकांना त्यांनी चौपाटीवर सभेसाठी चला म्हणून सांगितलं आणि तिथली गर्दी हटवण्याच्या दृष्टीनं त्या दिवशी तातडीनं चौपाटीवर सभा आयोजिती केली.

फ्लोराफाउंटनच्या ठिकाणीं हजारो लोक जमा झालेले असतांनाहि, संयुक्त महाराष्ट्राचे नेते बनलेले देव किंवा हिरे यांच्यापैकी कुणीहि त्या दिवशी लोकांसमोर आले नाहीत. आणीबाणीच्या त्या क्षणीं, लोकांना या नेतृत्वच्या पराभवाचंच दर्शन घडलं. पोलिसांनी केलेल्या गोळीबारांत या ठिकाणीं दहा लोक ठार झाले आणि ३०० जखमी झाले. पोलिसांनी गर्दी हटवण्यासाठी बंदुकीच्या ऐशी फैरी झाडल्या आणि विरोधी पक्षांनी मग त्यावरहि झोड उठवली.

सारं मुंबई सहरच अशान्त बनलेलं असल्यामुळे त्या परिस्थितींत कायदेमंडळांत, ठरावावर चर्चा करीत रहाणं योग्य नव्हे हें जाणून देवगिरीकर, चव्हाण, हिरे, बाळासाहेब देसाई, बँ. जी.डी.पाटील हे मोरारजींना भेटले आणि दिल्लीहून चर्चा तहकुबीला मान्यता आणा, अशी त्यांना विनंती केली. मोरारजींनी मग दिल्लीला फोन करून, मुंबईत निर्माण झालेली परिस्थिति सांगतांच, चर्-तहकुबीची परवानगी मिळाली आणि पक्षांतर्गत निर्माण झालेला पेंच तात्पुरता सुटला. गोळीबाराच्या दुस-याच दिवशीं म्हणजे २२ नोव्हेंबरला कायदेमंडळांत २४२ विरुद्ध २८असं मतदान होऊन चर्चा तहकुबी मंजूर झाली. चर्चा तहकुब होईपर्यत एकामागोमाग एक इतक्या गुंतागुंतीच्या घटना घडत राहिल्या की, चर्चा तहकूब होऊनहि, महाराष्ट्रांतील काँग्रेसचे नेते त्या मनःस्थितींतून बाहेर पडले नव्हते. उबग यावा अशीच सारी परिस्थिति होती.

त्याच मनोवस्थेंत हे सर्वजण, त्याच दिवशीं हिरे यांच्या बंगल्यावर, पुढचा विचार करण्यासाठी म्हणून जमा झाले. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना आपल्या तीव्र भावनांचं दर्शन कसं गडवायचं या विचारानं सा-यांना पछाडलं होतं. असेंब्लीचे सभापति असूनहि सर्व प्रथा बाजूला सारून नानासाहेब कुंटे हे बैठकीसाठी हजर राहिले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार पुढे पावलं टाकायचीं, की काँग्रेस वर्कींग कमिटीची आज्ञा प्रमाण मानायची, याबाबत मग बैठकींत ऊहापोह झाला. ही चर्चा सुरु असतांनाच ११६ आमदारांनी आपल्याकडे राजीनामे आणून दिले आहेत, असं भाऊसाहेब हिरे यांनी सांगितलं. त्याबरोबर हे सव राजीनामे सभापतींकडे पाठवून द्यावेत असं कुंटे यांनी सुचवलं. प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांकडे राजीनामे पाठवूं नयेत असंहि सांगितलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org