इतिहासाचे एक पान. ७२

या नेत्यांची अस्वस्थता आणखी वाढण्यास खेर यांचा एक निर्णय विशेष कारणीभूत झाला. हा निर्णय होता शिक्षणक्रमांतून इंग्रजीला हद्दपार करण्याचा ! प्रतिगामी वृत्तीच्या लोकांच्या प्रेरणेनं खेर यांनी मातृभाषा ही शिक्षणाचं माध्यम असावं, अशा आशयाचं एक विधेयक असेंब्लींत सादर केलं. मातृभाषेचा अभिमान असणं हें योग्यच होतं. परंतु मातृभाषा हेंच केवळ शिक्षणाचं माध्यम केल्यानं पुढच्या अनेक पिढ्या ज्ञानाच्या द्दष्टीनं बरबाद होणार आहेत हा द्दष्टीकोन खेर यांनी सोयिस्कररीत्या बाजूला ठेवला.

धार्मिक श्रद्धेचं पुनरुज्जीवन करणं हा प्रतिगाम्यांचा हेतु होता. त्याच द्दष्टीनं समाजांतील फार मोठा भाग इंग्रजीपासून दूर ठेवण्यांत या वर्गानं खेर यांच्या सहकार्यानं यश मिळवलं. मोरारजी हे या बाबतींत खेरांचे साथीदार. मोरारजी हे नोकरशहांच्या वृत्तीचे, उच्च घराण्यांतून आलेलेहोते. गोरगरीब, सामान्य जनता, ग्रामीण जीवन यांच्याशीं त्यांचा सुतराम संबंध नव्हता. मंत्रिमंडळांत स्थान प्राप्त झाल्यानं त्यांना देशभक्तीचं एक वेगळं सामर्थ्य प्राप्त झालं होतं. ते स्वतः कठोर नोकरशहा तर होतेच, शिवाय हाताखालच्या लोकांनाहि चाप लावून, सत्तेची दोरी आपल्या हातांत मजबूत ठेवण्यांत ते वाकबगार होंते. शहाणपणाचा सारा मक्ता हा आपला, हीच अशा लोकांची भूमिका असतें. हाताखालचा माणूस हा जर अशा नोकरशहाच्या जातीपेक्षा खालच्या जातींतला असेल तर तो त्यांच्या द्दष्टीनं निर्बुद्ध असतों हिंदुस्थानांत ब्रिटिशांचं राज्य सुरु झाल्यानंतर प्रथम ज्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात केली आणि त्या भांडवलावर नोकरींत रुजू झाले, त्या मंडळींचा सर्वसामान्य समाजाकडे पहाण्याचा साचा ठरून गेलेला असायचा. मोरारजी तर या सर्वांचे बादशहा शोभावेत असे होते. खेर-मंत्रिमंडळाचा शिक्षणविषयक निर्णय कृतींत उतरवण्यासाठी मोरारजींनी आपली सर्व शक्ति त्या काळांत कामाला लावली.

खेर-मंत्रिमंडळाचे शैक्षणिक सल्लागार म्हणून त्या वेळीं गुलाम सय्यद्दीन हे होते. डाँ. झाकीर हुसेन यांच्यापासून खेर यांनी हि स्फूर्ति घेतली होती म्हणतात, परंतु खेरप्रणित या शैक्षणिक सुधारणेमुळे घड्याळाचे काटे उलटे फिरवले गेले आणि महाराष्ट्रांतल्या तरुणांच्या पिढ्यामागून पिढ्या इंग्रजी ज्ञानाला वंचित झाल्या. विशेषतः ग्रामीण भागांतल्या किंवा शहरी भागांतल्याहि गरीब वर्गांतील मुलांपासून इंग्रजी शिक्षण कित्येक योजनं दूर गेलं. समाजांतला सुस्थितींतला वर्ग आणि सरकारी नोकर आपल्या मुलांना काँन्व्हेंट स्कूलमध्ये पाठवून त्यांना इंग्रजीचं ज्ञान देत राहिला. इंग्रजी माध्यम असलेल्या काँन्व्हेंट स्कूलचा खर्च सामान्य लोकांना कधीच आर्थिकद्दष्ट्या झेपणारा नसतो. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थि शैक्षणिकद्दष्ट्या उपाशी राहिला. उच्च शिक्षणापासून बहुजनसमाजाला चार हात दूर ठेवावं, असा खेर यांचा मूळ हेतु नसेलहि, पण त्यांच्या शैक्षणिक सुधारणेचा परिणाम मात्र तोच झाला. सरकारचे वैचारिक धोरणात्मक दारिद्र्यच यांतून स्पष्ट झालं. सरकारनं केलेलं धाडस हें सामाजिक हिताच्या दृष्टीनं बौद्धिक अभावाचंच द्योत्क ठरलं.

यशवंतराव हे अशा बौद्धिक दारिद्र्याचे भागीदार रहाण्याची सुतराम शक्यता नव्हती. समाजाच्या ज्या थरांत ते वाढले आणि शैक्षणिक काळांत अनुभव घेतले, त्या बहुजन-समाजाचे किती तरी महत्वाचे प्रश्न त्यांच्यासमोर होते. बहुजन-समाजांतील सर्वच विचारवंत नेत्यांसमोर ते प्रश्न होते. शेतक-यांची शेती सुधारावी, पाटबंधा-यांच्या कांही योजना कार्यान्वित कराव्यात, आर्थिक विषमता दूर करावी, अशा मागण्या ही नेते मंडळी खेर मंत्रिमंडळाकडे करत होती. पण खेर मंत्रिमंडळ मात्र, मातृभाषेचं महत्व पटवण्यांत आणि दारूबंदीचे पोवाडे लोकांना ऐकवण्यांतच सर्वस्व मानीत होतं. दारूबंदीचं महत्व पटवण्यासाठी त्यांनी हजारो रुपये खर्च केले. किती तरी कार्यकर्त्याना आणि शाहिरांना दारुबंदीच्या कामासाठी त्या काळांत त्यांनी पैसे दिले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org