इतिहासाचे एक पान. ७०

प्तनी रोगाच्या संकटांतून बचावली तरी यशवंतरावांसमोर गणपतरावांच्या लहान मुलांचा सांभाळ, शिक्षण हे प्रश्न होतेच. मुलं लहान होतीं आणि आजी त्यांचं संगोपन करत होती. कराडांतच मुलांचं प्राथमिक शिक्षण सुरू होतं. यशवंतराव – काका – हा त्या मुलांचा आधार. १९५६ मध्ये त्यांतील दोन मुलांना, दादा आणि राजा यांना त्यांनी पुण्याला आणलं आणि पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलच्या वसतिगृहांत त्यांची व्यवस्था केली. थोरला मुलगा अशोक याला ठाणें जिल्ह्यांत बोर्डी येथील आचार्य भिसे यांच्या शारदाश्रमांत दाखल केलं. दोघांचं माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढच्या काळांत त्यांनी चरितार्थाच्या दृष्टीनं विविध व्यवसाय पत्करले आणि धाकटा विक्रम ऊर्फ राजा महाविद्यालयांत दाखल झाला. वैद्यकीय शाखेचं शिक्षण पूर्ण करून त्यानं डॉक्टरची पदवीहि संपादन केली. या तिन्ही मुलांचे विवाह करून त्यांचे संसार उभे करण्यापर्यंत यशवंतराव आणि सौ. वेणूबाई यांना सर्वच करावं लागलं. गणपतरावांच्या मुलांना जीवनांत स्वत:च्या पायावर उभं करतां आलं याचं फार मोठं समाधान दोघांना मिळालं.

१९१९ मध्ये बळवंतरावांच्या निधनापासून चव्हाण-कुटुंब परिस्थितीच्या आणि संकटांच्या फे-यांत सापडलं त्यांतून बाहेर पडायला पुढचीं पन्नास वर्षं खर्चीं पडलीं. चव्हाण –कुटुंबाइतकी कठोर परीक्षा घेण्यासाठी नियतीनं क्वचितच अन्य एखाद्याची निवड केली असेल! नियतीच्या शाळेंत पन्नास वर्षं दु:खाचे आणि संकटांचे धडे घेतलेल्या यशवंतरावांना म्हणूनच ‘परदु:ख शीतल’ असं कधी वाटलं नाही.

यशवंतरावांच्या खिशांत वकिलीची सनद होती. ख-याचं खोटं आणि खोट्याचं खरं करून कायद्याच्या साहाय्यानं अमाप पैसा मिळवण्यास सर्व न्यायालयं त्यांच्यासाठी खुलीं होतींच. ब्रिटिशांनी केलेल्या कायद्याचे सोयिस्कर अर्थ लावून वकील धनवान बनून नशिबवान ठरत आहेत, हें त्यांना आसपास दिसत होतं. खिशांत असलेल्या सनदेच्या आधारानं यशवंतरावांनाहि यशस्वी वकील म्हणून आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिति बदलतां येणं शक्य होतं. कांही वर्ष वकिली करून, न्यायाधिशाची खुर्ची मिळवण्याची महत्त्वाकांक्षा धरली असती, तर तेंहि त्या काळांत कठीण नव्हतं. तसं झालं असतं, तर कोर्टांत ज्यांचे वडील आणि ज्येष्ठ बंधु एक सामान्य बेलिफ म्हणून काम करत होते, अशा एका बेलिफाचा मुलगा आणि भाऊ न्यायाधीश झाल्याची नोंदहि न्यायालयाच्या इतिहासांत झाली असती. न्यायाधिशाच्या खुर्चीचा स्वीकार न करतांहि यशस्वी वकील म्हणून ते जरी राजकारणांत उतरले असते, तरी त्यासाठीहि संधी होती. कारण त्या काळांत वकिलाचा, डॉक्टरचा पेशा व्यवस्थित सांभाळणारे बव्हंशीं राजकारणी पुढारी म्हणून समाजासमोर असत. राजकारणाचा भक्कम आधार घेऊन यशस्वी वकील बनणारेहि होते. परंतु यशवंतरावांनी आपली वाटचाल लहानपणापासूनच काँग्रेस कार्यकर्ता म्हणून सुरू केली होती. वकिलीची सनद खिशांत आल्यानंतरहि पैसा मिळवून स्वत:चं आणि कुटुंबाचं नशीब उजळण्यापेक्षा, जनतेची वकिली करण्याचाच पेशा अखंडपमएं पत्करला.

राजकीय क्षेत्रांत, वरकरणी किंवा दिखाऊ क्रांतिकारकांचा, कंठाळी पुढा-यांचा एक वर्ग असतोच. हीच खरी देशभक्ति अशी त्यांची सोयिस्कर समजूत असते. प्रवाहाविरूद्ध पोहत राहून, पुरांतून पार होणारा विरळा; यशवंतरावांनी बुद्धि पुरस्सर याच मार्गानं जाण्याचं ठरवलं आणि त्याच वाटें ते निघाले. कुटुंबांत उपासमार सुरू होती, एका भावाला शिक्षण मिळां म्हणून दुसरा भाऊ बेलिफाची नोकरी करूं लागला होता. एक भाऊ स्वत: शिक्षणाला वंचित झाला होता. वृद्ध आई हाच ज्यांच्या कुटुंबाचा आधार, आणि जीव घेऊन जाणा-या आजारीचीं संकटं घरांत मुक्कामाला आलेलीं, अशा कुटुंबांतला, कर्ता, सुशिक्षित तरूण, सुखानं कालक्रमणा करण्याचा मार्ग सोडून काटेरी मार्ग पत्करतो यापरतं त्यागाचं जीवन तें कोणतं! पुढच्या काळांत यशवंतरावांवर संधिसाधूपणाचा आरोप करण्यास अनेकजण पुढे सरसावले. माणसाच्या एकूण प्रवृत्तीला तें शोभणारं असलं तरी बुद्धिवादी असा टिळा धारण करून मतलबी राजकारण करणा-या वर्गाला यशवंतरावांच्या या आदर्शानं धक्का पोंचणं स्वाभाविकच ठरतं. समाजजीवनांत आणि राजकारणांत बिदिली माजवायची आणि विशिष्ट वर्गाचं हित साध्य करायचं, तर यशवंतरावांना संधिसाधुपणाचा आरोप चिकटवण्याशिवाय या वर्गाला गत्यंतरच उरत नाही. काँग्रेसचा कार्यकर्ता आणि पुढारी बनणं म्हणजे दारिद्र्य, यातना आणि सुळावरची पोळी अशी ज्या काळांत परिस्थिति होती त्या काळांत यशवंतरावांनी स्वत:च्या आणि कुटुंबाच्या स्वास्थ्याच्या स्वार्थ बाजूला ठेवून, लोकसेवेचं सतीचं वाण पत्करलं. जीवनाच्या या कालखंडांत टाकीचे घाव सहन करण्याची त्यांची कसोटी लागून गेली आणि त्यांतूनच व्यक्तिमत्त्व घडत राहिलं.  

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org