यशवंतरावांच्या मंत्रिमंडळांत समावेश कां असावा यासंबंधांतील ग्रामीण भागांतील जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना या वेगळ्या होत्या; आणि त्या भावनांची खेर यांनी कदर करावी, असा त्यांचा आग्रह होता. परंतु खेरांची राज्यकारभाराची पठडी वेगळी. मागणीचा आदर करायचा म्हणून केवळ त्यांनी चव्हाणांना एक मामुली जागा दिली इतकंच. ही जागा स्वीकारल्यानं किंवा अव्हेरल्यानं यशवंतरावांच्या मन:-स्थितींत आणि परिस्थितींत कांही बदल घडून येणारा नव्हता. परंतु यशवंतराव हे ऐतिहासिक घटनांवरून बोध घेणारे, व्यवहारवादी. राजकारणांत गुंतागुंतीचे डाव खेळत रहाण्याची नेत्यांची चाल त्यांच्या परिचयाची होती. खेर यांनी आपल्यासाठी एक सामान्य जागा देऊं केली आहे यामागील डावाची जाणीव त्यांना झाली असली पाहिजे. कारण ती जागा देऊन खेरांनी आपली सुटका करून घेतली होती. देऊं केलेली जागा चव्हाणांनी स्वीकारली तर ठीकच, न स्वीकारली तर, मीं व्यवस्था केली होती, पण चव्हाणांनीच ती नाकारली, असं सांगण्यास त्याना संधि मिळणार होती. त्या दृष्टीनं यशवंतरावांनी शासनाच्या मुख्य प्रवाहांत, एक सामान्य जागा असली तरी आंत रहाण्याचा निर्णय केला हें योग्यच झालं. राजकारणाच्या आणि राजकीय क्षेत्रांतील भावी वाटचालीच्या दृष्टीनं यशवंतरावांनी केलेला युक्तीचा वापर शंभर टक्के बरोबरच होता असं ऐतिहासिक घटनांवरून सिद्ध झालं.
खेर-मंत्रिमंडळांत मोरारजी देसाई हे गृहमंत्री होते. यशवंतरावांची नेमणूक मोरारजींच्या खात्याकडे झाली. मोररजी हे त्यांचे साहेब.
मोरारजींकडील त्यांची नेमणुकीची घटना ही एक योगायोगाची घटना म्हणावी लागेल. खेर त्यांनी भेटीला बोलावलं होतं म्हणून ते त्यांच्या कार्यालयांत उपस्थित झाले होते. परंतु त्या वेळीं खेरांच्याकडे आणखी कोणी मंडळी भेटीसाठी आली होती त्यामुळे यशवंतरावांना बसून रहाणं भाग पडलं. असा बराच वेळ गेला. दरम्यान मोरारजींची भेट घ्यावी म्हणून सहज ते त्यांच्या कार्यालयांत गेले. यशवंतरावांना पहातांच मोरारजींनी आपुलकीनं विचारपूस केली आणि पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून, गृहखात्याकडेच दाखल कां होत नाही, असं विचारलं. चव्हाण यांना पार्लमेंटरी सेक्रेटरीपद देण्यासंबंधांत खेर-मोरारजी यांच्यांत अगोदर चर्चा झाली असली पाहिजे. मोरारजींनी चव्हाणांना गृहखात्याकडे दाखल होण्याचा सल्ला दिला त्यांतूनहि तेंच सिद्ध झालं. मोररजींच्या म्हणण्याला यशवंतरावांनी तिथेच होकार दिला आणि अशा प्रकारे मुख्य मंत्री खेर यांच्या कार्यालयांत दाखल होण्यासाठी आलेले चव्हाण हे मोरारजींच्या खात्यांत पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून रूजू झाले.
मोरारजी आणि यशवंतरावांचे संबंद चांगले होते. साहेब आणि त्यांचे नोकर यांच्यातील त्या काळांतील संबंधासारखे ते नव्हते. मोरारजी हे ब्रिटिश अमदानींतील साहेब. साहेबीपणाची, ‘बॉस’ म्हणून वागण्याची, ब्रिटिश अमदानींत विशिष्ट पद्धत असे. नोकराकडे पहाण्याची विशिष्ट दृष्टि असे. वागण्याची वृत्तीहि वेगळी असे. पण हे संबंध तसे नव्हते. मोरारजींनी यशवंतरावांना राज्यकारभार कसा पहावा याचे कांही धडे देण्याच मनाचा मोठेपणा दाखविला असं नव्हे. मोरारजी हे स्वत: राज्यकारभारनिपुण होते; परंतु यशवंतरावांनी तें नैपुण्य अशा पद्धतीनं संपादन केलं की, मोरारजींनाही त्याची जाणीव होऊं दिली नाही. राजकारणांतले हे दोन लढवय्ये एकमेकांचा अंदाज मात्र घेत होते. यशवंतरावांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणांत अनेक कुस्त्या जिंकल्या होत्या. डावाप्रमाणेच प्रतिडावाचं कसबहि त्यांना अवगत होतं. मोररजींच्या तालमीत, डाव आणि प्रतिडाव घटवण्यास आणि त्यांत तरबेज होण्यास त्यांना चांगलीच संधि मिळाली. हें सर्व परस्पर-मैत्रीचे, शहाणपणाचे, समाधानाचे संबंध शाबूत राखून बिनबोभाट सुरू राहिलं.
मोरारजी आणि यशवंतराव यांच्यामध्ये त्या वेळीं तुलनाच होऊं शकत नव्हती. मोरारजी हे राज्यकारभारांतील मुरब्बी, तर यशवंतराव तिथे नव्यानं दाखल झालेले. पण यशवंतराव हे आपल्या वांट्याला आलेलं काम कर्तव्य- बुद्धीनं पार पाडत असल्यानं मोरारजींचा त्यांनी थोड्या अवधींतच विश्वास संपादन करण्यांत यशव मिळवलं. प्रत्येकजण प्रत्येकाला वापरून घेत होतं, पण तें दोघांपैकी कुणालाहि कधी खटकलं नाही. वस्तुत: नवा शिकाऊ मनुष्य जास्तींत जास्त शिकून घेण्यासाठी घडपडत असतो आणि त्याच वेळीं तो ज्याच्या हाताखालीं काम करतो तो मुरब्बी, तुसडेपणानं त्याला दूर ठेवण्याचा कटाक्षानं प्रयत्न करीत असतो. सरकारी किंवा खाजगी, सर्वच क्षेत्रांतील नवीनांना या अनुभवांतून जावं लागतं. पण इथे कांही वेगळं घडत होतं. मोरारजींच्या कारकीर्दींत यशवंतरावांना नमुनेदार राज्याकारभाराचे धडे मात्र मिळाले. राज्यकारभाराचा नव्यानं अनुभव घेणा-या राजकीय कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं या अनुभवाचं मोल मोठं होतं. पोलिस-यंत्रणा, नागरी-पुरवठा, वन-खातं, होमगार्ड इत्यादि खात्यांच्या कारभारांतील बारकावे यशवंतरावांनी या काळांत सूक्ष्मपणानं अवगत करून घेतले.