फितुरी हा हिंदुस्थानला मिळालेला शापच आहे. हिंदुस्थानला अशी फितुरी जागोजाग नडली आहे. १८५७ च्या स्वातंत्र्य-युद्धांत फितुरी झाशीच्या किल्ल्याच्या बुरुजावर पोंचली आणि झाशीचा बुरुज ढासळला. त्याचं इंग्रजांनी तिला पुण्यांतल्या शनिवीरवाड्यावर पाठवली अन् वाडा कोसळला. फितुरीनं घात केला नाही असा लढा हिंदुस्थानांत झाला नसेल. तीच फितुरी आता बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्यांत फलटणला पोंचली. तिनं यशवंतरावांचा घात केला. त्यांच्या एका नातेवाईकानंच ही पुण्याई पदरीं बांधावी हे त्यांतलं आणखी एक दुदैव! पूर्वी किती तरी फितुरांचा कडेलोट झाला असेल, त्यांना तोफेच्या तोंडी देण्यांत आलं असेल, हत्तीच्य पायाखाली चिरडलं असेल किंवा हातपाय तोडून, डोळे फोडून हालहाल केले असतील, पण हरळीच्या मुळीप्रमाणे फितुरीची मुळी जिवंतच राहिली आहे. थोडा ओलावा मिळाला की तिला कोंब फुटतो. आजअखेर हें सुरूच आहे. मोठ्या माणसांचे मार्ग फितुरीच्या काट्यांनी भरलेलेच असतात. काटा काढायचा आणि पुढे जायचं असाच हा प्रवास सुरू रहातो. समाजांतल्या फितुरांचा बंदोबस्त करण्यांत सातारा जिल्ह्यांतले कार्यकर्ते तिकडे दहशतीच्या मार्गाचा अवलंब करत होते आणि त्याच वेळीं खाल्लेल्या अन्नाला जागणारे सरकारी नोकर स्वतःची तुंबडी भरण्यासाठी देशाला सुळावर चढवण्याचं शौर्य प्रगट करत होते. पण चळवळ्यांना त्याची फिकीर नव्हती. आपणाला मरावं लागेल एवढाच विचार करून चळवळींसाठी ते सिद्ध झालेले होते. यशवंतरावांना तुरुंगांत घालून पोलिसांनी आता चव्हाण-कुटुंबांतील तुरुंगभरतीचं चक्र पूर्ण केलं. सौ. वेणूबाईंना पूर्वीच अटक झाली होती. बंधु गणपतराव तुरुंगांतच होते आणि यशवंतरावांचा सोळा वर्ष वयाचा भाचा, बाबू कोतवाल यासहि पोलिसांनी पकडलं होतं. पत्नी, भाऊ आणि भाचा तुरुंगांत असतांना कुटुंबांतल्या लोकांना धीर देण्याचं काम यशवंतराव भूमिगत राहून अधूनमधून करत होते आणि आता तेहि गजाआड गेले.
१९४२ ते १९४७ सालापर्यंत चव्हाण-कुटुंबांत हा ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. १९४३ मध्ये स्थानबद्धतेंत ठेवलेल्या गणपतरावांना १९४४ सालांत मुक्त करण्यांत आलं. त्यांना अटक झाली त्या वेळीं ते कराड-नगरपालिकेचे सभासद होते. तुरुंगांतून सुटका होतांच त्यांनी पुन्हा सार्वजनिक कामांत स्वतःला गुंतविलं. यशवंतराव तुरुंगांत होते, सौ. वेणूबाईंची प्रकृति यथातथाच होती, घरांत फक्त चार लहान मुलं. प्रपंचाची ओढाताण सुरूच होती आणि याच वेळीं गपणतरावांना क्षयानं पछाडलं. मध्यप्रदेशांत शेती करण्यासाठी गणपतराव गेले ते आजारी होऊनच परत आले होते. विजापूरच्या तुरुंगांतहि नोकरशाहीनं त्यांचे हाल केले आणि त्याचा प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला. क्षयाची बाधा झाल्यानं औषधासाठी त्यांना मिरजेच्या दवाखान्यांत ठेवण्यांत आलं, पण प्रकृति अधिकच ढासळत गेली. यशवंतराव तुरुंगांत गेले तेव्हा सौ. वेणूबाई आजारीच होत्या. त्या चिंतेंत ते असतांनाच गणपतरावांची प्रकृति ढसळल्याचं, त्यांना क्षयाची बाधा झाल्याचं यशवंतरावांना समजली तेव्हा मग कुटुंबाच्या काळजीनं ते १९४५ मध्ये पॅरोलवर सुटून बाहेर आले.
तुरुंगांतून ते बाहेर आले तेव्हा चळवळ संपलेली नव्हती. परंतु बंधु आजारी असल्यानं त्या वेळी त्यांच्या मनाचा ओढा कुटुंबाचं स्वास्थ पहाण्याकडे राहिला. कुटुंबांतील वाढत्या जबाबदारीमुळे अर्थार्जन करणं आता आवश्यकच होतं. त्यामुळे त्यांनी कराडांत वकिली सुरू करण्याचं ठरवलं. कुटुंबाला आता त्यांचाच आधार होता. आतापर्यंत कुटुंबाच्या स्वास्थाकडे लक्ष दिलं नव्हतं त्याची मनाला खंत होती. वर्ष-दीड वर्ष घराकडे लक्ष देणं क्रमप्राप्तच होतं. त्यामुळे राजकारणांतले प्रश्न जबाबदारीनं आपल्याकडे घ्यायचे नाहीत असं त्या काळांत त्यांनी मनाशीं ठरवलं. असं ठरवलं तरी त्यांना राजकारणापासून दूर ठेवण्यास लोकांची तयारी नव्हती. या ना त्या कारणासाठी त्यांना राजकारण करावंच लागलं. शरीरानं ते कराडला, पण मन मात्र मिरजेला बंधूंच्या आजाराकडे, असा हा काळ गेला. आठवड्यांतून दोन दिवस त्यांना मिरजेला जावं लागत असे. कराडांत सार्वजनिक काम सुरूच होतं. श्री. शंकरराव करंबेळकर यांनी याच काळांत कराडांत शिवाजी एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. यशवंतरावांनाहि त्यांनी बरोबरीनं कामास घेतलं. त्यामुळे सोसायटी, सोसायटीचं हायस्कूल, हास्कूलसाठी इमारत-असं एक नवं व्यवधान सुरू झालं. महाराष्ट-काँग्रेसच्या बैठकी पुणें-मुंबईला होत असत; त्यासाठीहि पुणें-मुंबईला जावं लागे. त्यामुळे कुटुंबाकडे लक्ष देत असतांनाहि त्यांचा राजकीय कार्याशीं संपर्क कायमच राहिला.