२ जूनला यशवंतराव विवाहबद्ध झाले त्या वेळी, नजीकच्या काळांत कांही दिव्य घडणार आहे याची चव्हण-कुटुंबाला कल्पाना नव्हती. नव-वधूला तर नव्हतीच नव्हती. विवाह होऊ महिना-दोन महिने होतात तोंवर राजकीय प्रांगणांत परिस्थितीचे ढग जमा होऊं लागले. जूनमध्ये विवाह झाल्यानंतर यशवंतराव संसार आणि वकिली यांमध्ये स्थिर होण्याचा विचार करत असतांनाच, पुढच्याच महिन्यांत, जुलैंत वर्धा इथें काँग्रेस-कार्यकारिणीनं ब्रिटिशांना अखेरचं आव्हान देणारा ठराव केला आणि मुंबई अधिवेशनाचं प्रस्थान ठेवलं. त्याबरोबर यशवंतरावांनाहि मुंबईच्या अधिवेशनासाठी प्रस्थान ठेवणं क्रमप्राप्तच होतं. त्या दृष्टीनं कार्यकर्त्यांची तयारी सुरू झाली. विवाह-बंधनानं यशवंतरावांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला होता; पण मन स्थिर नव्हतं. तें पुढंच कुठे तरी धांवत होतं. क्षणांत आनंद, क्षणांत खिन्न, तर क्षणांत विमनस्क, अशी मनाची विलक्षण घालमेल उडाली होती. कांही तरी करावं लागेल याची मात्र मनांत निश्चिति होती. त्या अवस्थेंतच ते मुंबईला अधिवेशासाठी पोंचले. काशीनाथ देशमुख, चंद्रोजी पाटील, वसंतराव पाटील, वि. सा. पागे, स्वामी रामानंद असे किती तरी कार्यकर्ते मुंबईला या अधिवेशनासाठी रवाना झाले.
मुंबईतलं हें ऐतिहासिक अधिवेशन गोवालिया टँकच्या मैदानांत झालं. पहिली काँग्रेस मुंबईला १८८५ सालीं याच मैदानांत भरली होती. अधिवेशनांत पहिल्याच दिवशीं ७ ऑगस्टला वर्ध्याच्या बैठकींत संमत झालेला ठराव, चर्चेसाठी ठेवण्यांत आला. पं. जवाहरलाल नेहरू यांनी हा ठराव मांडला आणि ठरावाची पार्श्वभूमि सविस्तर सांगितली. ठरावामागे संकुचित राष्ट्रवादाची भूमिका नसून त्याची पार्श्वभूमि आंतरराष्ट्रीय आहे; ही मागणी मान्य केल्यास सारं आंतरराष्ट्रीय राजकारणच बदलेल असं त्यांनी स्पष्ट केलं. ब्रिटिशांचा भारताला विरोध हा ब्रिटिश जनतेच्या हिताविरुद्ध असून, इंग्लंडचं मंत्रिमंडळ विपरीत बुद्धीनं विचार करत आहे. ईग्लंडनं १९३९ मध्येच आमच्या मागणीचा विचार केला असता, तर आज त्यांच्यावर जी आपत्ति आली आहे ती आली नसती. अदूरदृष्टी आणि नालायकी इंग्लंडइतकी कुणीं दाखविली नसेल. भारत दारिद्र्यांत खितपत आहे आणि तो आता जागृत झाला आहे. चीनहि आता जागृत झाला आहे. आम्ही आता लढणार आहोंत. हा लढा निकाली लढा असून अखेरच्या श्वासापर्यंत चालेल, असंहि नेहरूंनी ठामपणें सांगितलं. ठरावाची जी भाषा आहे, शब्द आहेत, त्यापेक्षा लोकांच्या भावना शतपटीनं अधिक तीव्र आहेत अशीहि जाणीव त्यांनी दिली. मौलाना आझाद, म. गांधी यांच्या भाषणांपेक्षा नेहरूंच्या भाषणानं वातावरण गंभीर बनलं असतांनाच सरदार पटेल यांनी ठरावाला दुजोरा देणारं भाषण केलं आणि ब्रिटिशांच्या राजकीय नीतीवर सडेतोड प्रहार केला. या ठरावावर अधिवेशनांत चर्चा सुरू होण्यापूर्वी गांधींनी आणखी कांही गोष्टी स्पष्ट केल्या. या लढ्याबद्दलची भूमिका त्यांनी सांगितली आणि जी विफलता निर्माण झाली आहे त्यावर ‘छोडो भारत’ हाच एकमेव उपाय आहे अशी गर्जना त्यांनी केली. नेत्यांचीं भाषणं संपल्यानंतर पहिल्या दिवशींचं अधिवेशन तहकूब झालं. दुस-या दिवशीं ठरावावर पुन्हा चर्चा झाली. अच्युतराव पटवर्धन, आचार्य नरेंद्र देव, डॉ. लोहिया, सरदार प्रतापसिंग आदींनी ठरावाला भरघोस पाठिंबा दिला. पं. जवाहरलाल नेहरू यांचं उत्तराचं भाषण झालं आणि ८ ऑगस्टला हा ऐतिहासिक ठराव अधिवेशनानं संमत केला. गांधींनी या लढ्याचं नेतृत्व ‘मी घेत आहें’ असं सांगितलं आणि मीं काँग्रेसला प्रतिज्ञाबद्ध केली आहे, ‘करूं अगर मरूं’ ही ती प्रतिज्ञा आहे, असा गांधींनी पुन: पुन्हा प्रतिज्ञेचा उच्चार केला. अधिवेशन रात्रीं दहाला संपलं आणि ‘करेंगे या मरेंग’, ‘चले जाव’ अशा घोषणा मनाशी घोळवत सर्वजण अधिवेशनाच्या मंडपांतून बाहेर पडले.
स्वातंत्र्याचा लढा आता निकराचा बनला. १८५७ च्या स्वातंत्र्य-युद्धानंतर, हिंदुस्थाननं स्वातंत्र्यासाठी एवढं रौद्र स्वरूप प्रथमच धारण केलं होतं. इंग्रज त्या वेळी तलवार, बंदुका, तोफा यांनी लढले होते, तर आताची लढण्याची त्यांची तयारी वेगळी होती. अधिवेशन संपल्याच्या दुस-याच दिवशीं सरकारनं गांधी, नेहरू, पटेल, मौलाना असे पहिल्या रांगेचे पुढारी उचलले. सा-या देशांतच धरपकड झाली. अधिवेशनास गेलेले कार्यकर्ते गावोगाव परततील तेव्हा त्यांना शक्य तर रस्त्यांतच किंवा ते आपल्या गावीं पोंचतांक्षणींच अटक करण्याची तयारी सर्वत्र झाली होते. ‘करेंगे या मरेंग’ असं गांधींनी सांगितलं होतं त्यामुळे ठिकठिकाणी चढाईचं धोरण स्वीकारायचं अशीच जिद्द लोकांमध्ये निर्माण झाली होती. पहिल्या रांगेचे पुढारी उचलल्यानं या निकराच्या लढ्याचं नेतृत्व जनतेनं आपल्याकडेच घेतलं.