इतिहासाचे एक पान. ५४

आता सा-यांचं लक्ष ७ ऑगस्टला, मुंबईत होणारं अधिवेशन आणि त्यांतून निर्माण होणारं आव्हान याकडे लागलं. ब्रिटिश सत्तेला ग्रहण लागण्याची वेळ समीप आली होती. ग्रहणापूर्वींचा वेध लागला होता. सरकारनं सगळीकडे हेरगिरीचं जाळं विणलं आणि धरपकडीची तयारी करून कुणाला कुठे बंद करायचं याचेहि निर्णय तयार करून ठेवले. पोलिसखात्यांत दोन्ही प्रकारचे लोक होते. काँग्रेस-कार्यकर्यांशीं दोस्ती करून माहिती काढणारे जसे होते, तसे सरकारी पातळीवर सुरू झालेल्या हालचालींची जाणीव देणारेहि होते. सरकरानं मात्र काँग्रेसशीं लढा देऊन चिरडून टाकण्याची जय्यत तयारी केलेली असतांनाच, काँग्रेस-कार्यकारिणीच्या ठरावांत बदल होणार नाही आणि काँग्रेसहि चिरडली जाणार नाही, असं गांधींनी ‘हरिजन’ मधून जनतेला आणि सरकारलाहि निवेदन केलं.

अखिल भारतीय काँग्रेसचं अधिवेशन ऑगस्टच्या ७ तारखेला मुंबईत सुरू व्हायचं होतं, तर क्रिप्ससाहेबांनी त्याच्या आदल्या दिवशी ६ तारखेलाच पुन्हा एकदा घोषणा केली की, “युद्ध संपतांच भारतांत स्वराज्य स्थापन होईल. याबाबत ब्रिटिश सरकारचा निर्णय कायम स्वरूपाचा आहे.” याचबरोबर काँग्रेस दडपली जाईल यासाठी जीनाहि सरकारला आंतून साहाय्य करत राहिले. बहुमताच्या जोरावर काँग्रसला हिंदु राज्य स्थापन करायचं आहे असं विष त्यांनी पसरवलं.

अशा वादळी वातावरणांतच काँग्रेसचं तें ऐतिहासिक अधिवेशन ७ ऑगस्टला मुंबईत सुरू झालं. त्याच्या अगोदर अनेक काँग्रेस-पुढारी आपापसांत चर्चा करत होते.

१९४१ ला वकिलीची सेकंड एल्एल्. बी. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर यशवंतराव कराडला परतले होते. वकिली सुरू करण्याच्या इराद्यानं ते आता कराडांत दाखल झाले; पण वकिलींत लक्ष नव्हतं. घोडेस्वारासारखं त्यांचं आयुष्य सुरू होतं. पूर्वींचीच धांवपळ सुरू होती. सातारा जिल्ह्यांतल्या प्रमुखांपैकी ते बनले होते. जिल्ह्यानं त्यांना नेता म्हणून मान्य केलं होतं. त्यामुळे गावोगाव रपेटी सुरू होत्या. आजवर संकटांशिवाय वांट्याला कांही आलं नव्हतं तरी पण कामाचं समाधान होतं. त्या जोरावरच संकटाचा डोंगर, द-या पार करून, चढउतारावरून धांवाधांव करून, ते सुखरूप राहिले होते. वकील होऊन परतले तेव्हा घरची काळजी वाढलेली होती. आजवर कुटुंबाकडे लक्ष दिलेलं नव्हतं. आता लक्ष द्यावं लागणार होतं. यशवंतरावांनी वकिली करून कांही मिळवावं अशी घरच्या लोकांची स्वाभाविक अपेक्षा होती. मुलगा वकील होऊन आला याचं विठाईला आणि बंधूंना फार मोठं समाधान मिळालं होतं. त्यांतूनच यशवंतरावांच्या विवाहाचे विचार घरांत सुरू झाले.

यशवंतरावाचं मन मात्र दुसराच शोध घेत राहिलं. त्यांच्या एका हातांत होता राष्ट्रीय झेंडा आणि दुस-या हातांत होती वकिलीची सनद. वकिली करून कांही अर्थार्जन तर करणं आवश्यकच होतं, परंतु देशांत जें घडत होतं त्याकडे सातारा जिल्ह्यांतला नेता या दृष्टीनं अधिक लक्ष द्यावं लागत होतं. वर्धा इथे काँग्रेस-कार्यकारिणीनं केलेला ठराव, मुंबईचं अधिवेशन आणि त्यांतून निर्माण होणारी परिस्थिति यांचा विचार प्रमुख बनला होता. काँग्रेसशी त्यांचं लहान वयांतच लग्न लागलं होतं. विठाईचं मन मात्र यशवंताला संसाराच्या बोहल्यावर चढवण्यासाठी आतुर बनलं होतं. त्यामुळे वकील मुलासाठी वधूची निवड हाच त्यांचा ध्यास राहिला. सूनमुख पहाण्याइतकं मातेच्या मनाला अन्य सुख तें कोणतं असणार! अन् एक दिवस तो योग जमला. फलटणच्या मोरे-घराण्याला कराडच्या चव्हाणांच्या स्थळाची माहिती मिळाली होती. मोरे यांना चार मुली व एक मुलगा. दोघींचे विवाह झालेले होते आणि तिसरी कन्या वेणू हिचा विवाह व्हायचा होता. मोरे हे बडोदें संस्थानांत खाजगीकडे नोकरी करत होते; परंतु नुकतेच ते निवर्तले होते. त्यांच्या पत्नीहि निवर्तल्या होत्या. चार बहिणी आणि एक भाऊ, असा मोरे-घराण्यांतला परिवार. वेणूबाईंचे मेव्हणे श्री. निकम यांच्याकडून चव्हाणांच्या स्थळाची माहिती त्यांना समजली होती. नवरदेव हे वकील आहेत, उमदे आहेत त्याचबरोबर राजकीय चळवळे आहेत, पुढारी आहेत परंतु घरची परिस्थिति बेताची आहे, ही सर्व माहिती  श्री. निकम यांनी सांगितली होतीच. आर्थात् विवाहाच्या गाठी प्रत्येकाच्या जन्मवेळींच  बांधलेल्या असतात, त्याप्रमाणेच घडतं. परिस्थिति ही दुय्यम ठरते. एक दिवस वधू पहाण्याचा कार्यक्रम निश्चित झाला. हा कार्यक्रम साता-यांत. चव्हाण-कुटुंब वधू पहाण्यासाठी सातारला पोंचलं. यशवंतरावांचे मित्र कै. के. डी पाटील हे बरोबर होते. मुलगी पाहिली. मुलीला प्रश्न विचारण्याचं काम के. डी. पाटील यांनीच केलं. नवरदेव वकील बनले होते, पण त्यांनी उलट-तपासणी घेतली नाही. वेणूबाई दिसायला सोज्वळ, नीटनेटक्या, रूपाने सुरेख, वडिलांची रहाणी संस्थानांत झाल्यानं खानदानी ढंग. याच बैठकींत मुलीची पसंती झाली अन् विवाह निश्चित झाला. २ जून १९४२ ही विवाहाची तिथीहि निश्चित झाली. विवाह-स्थळ कराड ठरलं आणि ठरल्याप्रमाणे कराडला विवाह-सोहळा पार पडला. यशवंताचे दोनाचे चार हात झाले. सूनमुख पाहिलं याचा विठाईला परमानंद झाला. कराडांत हा विवाह मोठ्या थाटानं झाला. शेकडो लोक त्यासाठी उपस्थित राहिले. एवढा मोठा विवाह-सोहळा त्या काळांत कराडांत प्रथमच झाला. कु. वेणूबाई मोरे माप ओलांडून सौ. वेणूबाई चव्हाण बनून चव्हाणांच्या घरांत दाखल झाल्या. वकील झालेले यशवंतराव आता संसारी झाले आणि चव्हाणांचं घर सुखावलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org