सत्याग्रह सुरू झाल्यानंतर देशांत कांही तरी घडूं लागलं आहे एवढं समाधान यशवंतरावांना मिळालं आणि कांही तरी करण्यासाठी इकडे-तिकडे धांवणारं मन स्थिर बनलं. मनाच्या या अवस्थेंतच परीक्षेला बसायचं ठरलं आणि १९४० सालीं फर्स्ट एल्एल्. बी. एकदा पदरांत पडली. पुढे सेकंड एल्एल्. बी. चा विचार सुरू झाला असतांनाच, पुन्हा साता-यानं मनाला खेचलं. सातारा जिल्हा-काँग्रेसच्या अध्यक्षपदाचीं सूत्र यशवंतरावांनी सांभाळावींत असा कार्यकर्त्यांचा आग्रह सुरू झाला. त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारी सांभाळतां सांभाळतांच त्यांना सेकंड एल्एल्. बी. ची परीक्षा पूर्ण करावी लागली. यशवंतराव वकील झाले ते १९४१ सालांत!
१९४१ साल हें राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय क्षेत्रांत अनेक उलथापालथींनी भरलेलं वर्ष आहे. १९४० च्या अखेरीस काँग्रेसनं सत्याग्रह स्थगित केला होता, तरी १९४१ च्या प्रारंभापासून पुन्हा सत्याग्रहाचा डोंब उसळला. मौ. आझाद यांना पकडल्यापासून त्याची सुरुवात झाली. त्यांना अठरा महिन्यांची शिक्षा सुनावण्यांत आली. या वर्षाच्या प्रारंभालाच मुसलमान पुढा-यांना कंठ फुटला आणि सर्व प्रांतांत व केंद्रांत संमिश्र मंत्रिमंडळं असावीत असा बूट त्यांनी काढला. इंग्रजहि तेंच बोलूं लागले. जीना मुत्सद्देगिरीचीं दुटप्पी निवेदनं करूं लागले. समाजवादी पक्ष सत्याग्रहापासून दूर राहिला. रॉय यांचा पक्ष सरकारचा पुरस्कार करूं लागल्यानं युद्ध-समितींतल्या अनेक जागा त्यांच्या पदरांत पडल्या. सुभाषबाबूंना तुरुंगांत डांबलं होतं. त्यांची जामिनावर सुटका होतांच ते घरांतून गुप्त झाले. सुभाषबाबूंचा तपास हाच एक विषय त्या काळांत इंग्रजांना डोकेंदुखीचा ठरला. मॅजिस्ट्रेटनं त्यांना पकडण्याचं वॉरंट काढलं, पण वॉरंट बजावण्यासाठी सुभाषबाबू त्या वेळीं कधींच कुणाला दिसले नाहीत. नंतरहि दिसले नाहीत. पुढे एका वर्षांनं, १९४२ मध्ये जर्मनींतून लोकांनी त्यांचा आवाज रेडिओवरून ऐकला. ब्रिटिश सरकार आपली यंत्रणा युद्धासाठी राबवण्यास सर्व प्रकारचा आटापिटा करूं लागलं होतं. संरक्षण-खर्चात कित्येक कोटींची वाढ झाली आणि सैन्य-संख्या पांच लाखांवर पोंचली. इकडे सरकारनं गांधींची सर्व बाजूंनी कोंडी केली होती. हरिजन बंद पडल्यानं प्रचाराचं साधन संपलं होतं. त्यांच्या निवेदनांना अन्य वृत्तपत्रं थारा देत नव्हतीं. जीना आपली पाकिस्तानची मागणी मुसलमान समाजांत खालपर्यंत पोंचविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. हिंदुमहासभेचे नेत त्याविरुद्ध गंभीर आवाज उठवत राहिले. दरम्यान जागतिक युद्धाचा परिसर आफ्रिकेपर्यंत येऊन पोंचला. त्यामुळे साम्राज्याच्या रक्षणासाठी हिंदी फौजा ब्रिटिशांनी मध्यपूर्वेत रवाना केल्या. तिथल्या लढाईंत अनेक हिंदी जवानांनी रक्त सांडलं, पण त्याच्या बदल्यांत अमेरीनं फक्त भारतांतल्य संस्थानिकांची पाठ थोपटली. सत्याग्रह सुरू होता, पण कांही ठिकाणीं सत्याग्रह्यांना न पकडण्याची युक्ति अवलंबण्यांत येऊं लागली. तडजोडीला कुठे अवसर मिळत नव्हता; उलट जीनासाहेबांच्या धोरणामुळे तडजोड दूर जात होती. इंग्रजांनाहि तेंच हवं होतं. अगोदर पाकिस्तान आणि मग स्वातंत्र्य हा जीनांचा ध्यास होता. श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्याला कणखर विरोध दर्शविला, पण उपयोग झाला नाही. बादशहा गफारखान यांनींहि पाकिस्तानची कल्पना राष्ट्रद्रोही असल्याचं सांगून दोन्ही जमातींनी एकत्र यावं असं आवाहन केलं तें फुकट गेलं.
हिंदुस्थानांत राजकीय क्षेत्रांत हा बेबनाव निर्माण झालेला असतांनाच तिकडे युद्धाचं स्वरूप घनघोर बनलं होतं. इथल्या तुरुंगांतले सत्याग्रही खितपत पडलेले आणि बाहेर कसला उठाव नाही, चैतन्य नाही, अशी सर्वत्र धुकं पसरल्यासारखी अवस्था निर्माण झाली होती. कम्युनिस्ट फक्त क्रांतीची भाषा बोलत होते, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदूंच्या संस्कृतीचं संघ-शाखेवर संरक्षण करत राहिला होता. तिकडे युद्धांत फ्रान्स संपला होता आणि जर्मनी पोलंडवर चालून गेला होता. एक वर्षाच्या आंत सर्व युरोपमध्ये त्यानं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि १९४१ च्या मध्यावर जर्मनीनं रशियावर तोफा डागल्या. इंग्लंड मग रशियाच्या मदतीला धांवलं. या परस्पर-सहकार्याबाबतच राजकीय विचारवंतांत वादळ निर्माण झालं आणि त्याचा अन्वयार्थ लावण्यांत देशोदेशींच्या बुद्धिमंतांच्या बुद्धीला चालना मिळाली. दरम्यान जपान व रशिया यांच्यांत तटस्थेचा करार घडून आला होता. आणि साम्राज्यशाहीच्या विरोधांत जपानचं आरमार पॅसिफिक समुद्रांत उतरलं. अमेरिका तटस्थ होती, ण जर्मनीनं उत्तर-समुद्रांत पाय ठेवतांच अमेरिका सावध झाली. हिटलरच्या अमलाखाली सारा युरोप आल्यानं अमेरिकेचा व्यापार बुडाला होता. त्या संदर्भांत मग अमेरिका भारताकडे पाहूं लागली. चर्चिल-रूझवेल्ट यांनी एकत्र बसून जगांतील स्वातंत्र्य व लोकशाही याबद्दल एक सनद जाहीर केली, पण ही सनद भारताला लागू नाही, हें मुत्सद्दी चर्चिलच्या मुखांतून मागोगा बाहेर पडलं. परंतु भारताचा प्रश्न जागतिक स्तरावर पोंचला असून, त्या पातळीवरूनच आता तो सोडवला जाईल अशी आशा भारतीय मनाला वाटण्यास या सनदेचा आणि एकूण युद्ध-परिस्थितीचा लाभ झाला.