इतिहासाचे एक पान. ४६

रॉय यांनी कार्यकर्त्यांपुडे संघटनेचं जें चित्र उभं केलं ते मोठं आकर्षक होतं. म. गांधी, पं. जवाहरलाल नेहरु यांच्या कार्याचं, व्यक्तिमत्त्वाचं व विचाराचं आकर्षण तर यशवंतरावांना होतंच, पण रॉय यांची प्रत्यक्ष भेट होण्यापूर्वी त्यांचे लेख, त्यांचे विचार हेहि त्यांनी वाचलेले असल्यामुळे रॉय यांच्यासंबंधी त्यांच्या मनांत अलीकड स्थान निर्माण झालं होतं. रॉय हे लेनिनवादी होते, प्रत्यक्ष क्रांतीच्या लढ्यांतलं त्यांचं जीवन होतं आणि काँग्रेसमार्फतच काम करायचं म्हणून ते काँग्रेसमध्ये आले होते. श्री. ह. रा. महाजनी हे त्या वेळीं जिल्हा-काँग्रेसचे चिटणीस होते व ते रॉयवादी बनले होते.  काशीनाथ देशमुख, लक्ष्मणशास्त्री जोशी, आत्माराम पाटील, भय्याशास्त्री वाटवे, राघुअण्णा लिमये,वामनराव कुलकर्णी, असा हा सर्व मित्र-परिवार होता. यांच्यापैकी राघुअण्णा लिमये रॉयवादी बनले नाहीत. श्री देशमुख कट्टर गांधीवादीच राहिले. ते काँग्रेस सोशालिस्ट झाले. असें असलें तरी, त्यामुळे या मंडळींच्या कामांत आणि मैत्रींत कधी बाध आला नाही. रॉय यांच्याशी हिंदुस्थानांतील निरनिराळ्या प्रश्नांबाबत जेव्हा चर्चा होत त्या वेळीं रॉय यांच्याकडून व्यक्त होणारी मतं त्यांना अधिक योग्य वाटत असत. स्वातंत्र्यलढ्याबद्दलहि चर्चा होत असे. आपण चळवळ करतों, सत्याग्रह करतों, तुरुंगांत जातों, पण शेवटीं हा लढा आपण जिकणार कसा, असा या तरुण मंडळींचा रॉय यांना सवाल असे. स्वातंत्र्याचा लढा वाढणार कसा, याचं व्यावहारिक उत्तर रॉय यांच्याकडून त्यांना हवं होतं. या प्रश्नाचं उत्तर म्हणून स्वातंत्र्याच्या चळवळीचं जें चित्र या तरुणांसमोर रॉय यांनी मांडलं त्यानं या मंडळींना आकर्षन घेतलं. रॉय यांचं म्हणणं असं की, आपली स्वातंत्र्याची चळवळ म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची रचना बनली पाहिजे. कामगारांची संघटना, शेतक-यांची संघटना, प्रत्येक गावाची संघटना, असं हें वाढत राहिलं पाहिजे. संघटना अशी प्रभावी बनली पाहिजे की, प्रत्येक गाव म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचं एक घटक बनलं पाहिजे. हें गाव इतकं समर्थ  होईल आणि तें स्वत:च म्हणेल की, आम्हीच सरकार आहोंत. रॉय यांचे क्रांतिकारी विचार आणि रशियन राज्यक्रांतीच्या इतिहासांतील अशा प्रकारच्या स्वातंत्र्याच्या क्रांतीचा संदर्भ. यामुळे ही मंडळी भारावून गेली.

रॉय आणि त्यांच्या भोवती निर्माण झालेली गोतावळ काँग्रेसमध्ये राहूनच या विचारांचा पाठपुरावा करत होती. आपल्या ध्येयपूर्तींसाठी काँग्रेस-संघटनेचाच उपयोग होईल या भावनेनं ते काँग्रेसला धरून होते. परंतु स्वत: यशवंतरावांची भूमिका वेगळी होती. ते ख-या अर्थानं काँग्रेसचे होते. काँग्रेस-संघटनेला त्यांच्या मनांत पहिल्या क्रमांकाचं स्थान होतं. रॉय यांच्या आकर्षक विचारसरणीनं ते भारावले होते आणि सामाजिक क्रांतीचा विचार काँग्रेसनं टोकाला जाऊन स्वीकारला असता, तर त्याचं कदाचित् त्यांनी स्वागतहि केलं असतं; परंतु लो. टिळक, म. गांधी, पं. जवाहरलाल नेहरु यांनी दाखविलेल्या दिशेनं वाटचाल करीत ते काँग्रेसच्या चळवळीत दाखल झाले होते आणि या नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्याला समाजवादाच्या दृष्टीनं मार्गदर्शन करुन, लढ्याचा पाया अधिक विस्तुत बनवला होता.  साम्राज्यवादीविरोधी चळवळीचं स्वरूप या लढ्याला प्राप्त झालं होतं आणि यशवंतरावांनी सर्व सामर्थ्यानिशी त्यांत स्वत:ला झोकून दिलं होतं. त्यामुळे रॉय यांचं व्यक्तिमत्त्व आणि विचार याचं त्यांच्या मनांत जरी आकर्षण निर्माण झालं तरी म. गांधी आणि पं. नेहरु यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पगडा कमी झाला नव्हताच. त्या दृष्टीनं १९३० ते १९४१ हा त्यांच्या जीवनांतील काळ हा वैचारिक अंतविरोधाचा ठरला. मनासमोर अनेक प्रश्न निर्माण होत होते आणि समाधान कशांतच मिळत नव्हतं.

याच वेळीं दुसरं महायुद्ध सुरु झालं होतं. रॉय यांनी महायुद्धविषयक धोरणासंबंधी जे विचार व्यक्त केले त्यांतून रॅडिकल काँग्रेस-जनांमध्ये मतभेद वाढूं लागले. रॉय यांचा काँग्रेसशींहि धोरणात्मक मतभेद झाला. राष्ट्रवादी भावना ज्यांच्या मनांत ठाम होत्या त्यांचे आणि रॉय यांचे वैचारिक मतभेद सुरु झाले. ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध सुरु असलेला हिंदुस्थानांतील लढा हा युद्धकाळांत चालू ठेवणं योग्य नव्हे असं रॉय यांचं सांगणं असे. त्यांचं म्हणणं असं की, जागतिक लोकशाहीचं संरक्षण झालं तरच वसाहतींचा आणि भारताच्या स्वातंत्र्याचा लढा यशस्वी होईल. हिटलरनं हुकूमशाहीसाठी सुरु केलेल्या युद्धामुळे जागतिक लोकशाही संकटांत सापडली आहे आणि या युद्धाच्या शेवटीं ब्रिटिश साम्राज्यशाहीचा आर्थिक पायाच ढासळून जाईल म्हणून दोस्तांना विजय मिळाला तरी साम्राज्यशाही विलसायच जाईल. अशास्थितींत भारतीय स्वातंत्र्यलढा हा महत्त्वाचा राहिला नाही. तो जिंकण्यासाठी प्रथम जागतिक लोकशाहीचा लढा जिंकला पाहिजे अशी रॉय यांनी भूमिका मांडण्यास प्रारंभ केला. ब्रिटिशांविरुद्ध, ते केवळ महायुद्धांत अडकलेले आहेत म्हणून, त्यांच्याविरुद्ध हिंदुस्थानांत उठाव करायचा नाही, या श्री. रॉय यांच्या मताबद्दल बरेच मतभेद निर्माण झाले. रॉय हे आत्मविश्वासानं सांगत होते, पण त्यांची मीमांसा सर्वांनाच मान्य होत नव्हती. ज्यांना हा विचार पटला ते त्यांच्याबरोबर राहिले. ज्यांचा मतभेद होता ते रॉय यांच्यापासून बाजूला झाले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org