इतिहासाचे एक पान. ४५

यशवंतरावांना या नव्या गटाचं आकर्षण निर्माण झालं. घडलं तें असं की, यशवंतराव हे कायदेमंडळाच्या निवडणुकीसाठी, त्यांचे उमेदवार आत्माराम पाटील यांच्या प्रचारासाठी, गावोगाव दौरा करत होते. काँग्रेसच्या निवडणूक-प्रचारासाठी श्री. एम्.एन्. रॉय हेहि हिंदुस्थानचा दौरा करत होते. रॉय हे महाराष्ट्राच्या दौ-यावर असतांनाच यशवंतरावांची व त्यांची भेट घडून आली. पुढे सातारा येथे रॉय आणि चव्हाण यांच्यांत, ध्येय-धोरणाच्या संदर्भांत, सखोल चर्चा झाली. महाराष्ट्रांत रॉय यांच्या विचाराचा झेंडा खांद्यावर घेतलेल्यांचा गट निर्माण झालेला होताच. सातारच्या भेटीमध्ये तरुण यशवंतरावांचे विचार आणि संघटनेंतील कामाचे अनुभव रॉय यांनी शांतपणें, काळजीपूर्वक ऐकून घेतले. बहुजन-समाजाच्या परिस्थितीचा सखोल अभ्यास, संघटनेद्वारे त्यांच्यांत जागृति करण्याचा प्रयत्न, चळवळीच्या प्रवाहांत प्रत्यक्ष सामील करून घेण्याचा उपक्रम आणि पुढे मागे. या समाजाला सत्तेच्या केंद्रस्थानीं जाण्यासाठी संधि उपलब्ध करुन देण्याची जिद्द या संबंधांतील या तरुणाचे निर्भेळ विचार आणि बिनतोड युक्तिवाद ऐकल्यानंतर रॉय प्रभावित झाले. फैजपूर काँग्रेस-अधिवेशनांत रॉय यांनी स्वत:च या विचाराचा प्रबंध मांडला होता. रॉय आणि यशवंतराव यांचा सांधा या चर्चेंतून जमून गेला. सामाजिक क्रांतींतील शेतकरीवर्गाचं स्थान आणि राजकीय क्रांतीचं तंत्र या संदर्भांतहि सविस्तर चर्चा झाली होती आणि यशवंतरावांनी आपली भूमिका स्पष्टपणे सांगितली होती.

रॉय यांच्या नेतृत्वाखाली निश्चित स्वरुपाचा सामाजिक क्रांतीचा कार्यक्रम यशवंतरावांच्या मनांत तयार होत होता. त्याच वेळी या दोघांची तासगाव येथे आयोजित करण्यांत आलेल्या रॉय गटाच्या परिषदेंत १९३८ मध्ये भेट झाली. किंबहुना यशवंतरावांनीच या परिषदेचा पुढाकार घेतला होता. मार्क्सवादावर आधारलेल्या एम्. एन्. रॉय यांच्या मानवतावादाचा अभ्यास त्यांनी पूर्वीच केला होता. या अभ्यासामुळे सामाजिक व राजकीय प्रश्नांची मीमांसा करण्याची शक्ति त्यांना पुढच्या काळांत प्राप्त झाली. मार्क्सवाद हा कांही ठोकळेबाज सिद्धान्त नसून वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक प्रश्नांचा शास्त्रीय अभ्यास करण्याची मार्क्सवाद ही एक पद्धति व तत्त्वज्ञान आहे ; या दृष्टिकोनांतून रॉय हे साम्यवादाकडे पहात होते. बहुजन-समाजांत जन्मलेले यशवंतराव जन-जीवनाशीं एकरुप झाले होते. शिक्षणामुळे, वाचनामुळे, तुरुंगांत निरनिराळ्या नेत्यांशी झालेल्या चर्चेमुळे, जीवनाचा अन्वयार्थ लावण्याची योग्यता त्यांच्यांत निर्माण झाली होती. रॉय यांच्या सामाजिक क्रांतीच्या विचारानं त्यामुळेच त्यांना खेचून घेतलं.

तासगावला रॉय यांची परिषद झाली त्या वेळी रॉय यांनी काँग्रेसमधील पर्यायी क्रांतिकारी नेतृत्वाचं मूळ धरलं होतं. गांधीप्रणित मार्गापेक्षा त्यांचे चळवळीचे मार्ग आणि ध्येय वेगळीं होतीं, पण रॉय यांचं प्रस्थ वाढत राहिलेलं पाहून महाराष्ट्र-काँग्रेस अस्वस्थ बनली. म. गांधीच्या नेतृत्वाच्या मुळावर हे रॉयवादी आणि त्यांची चळवळ आली आहे असं लक्षांत येतांच त्यांनी तासगावची परिषद उधळून लावण्याचे बेत रचले; आणि परिणामीं तासगावच्या परिषदेंत गोंधळ उडवून दिला. काँग्रेसमधील उजव्या गटाच्या मंडळींनी नाना पाटील आणि त्यांचेच साथीदार त्यासाठी हाताशी धरले आणि त्यांनी नेमून दिलेली कामगिरी यशासांग पार पाडली. परिषद उधळली गेली तरी रॉय डगमगले नाहीत. त्यांनी त्याच दिवशीं, कार्यकर्त्यांची एक खाजगी बैठक घेतली आणि सविस्तर चर्चा केली. यशवंतराव या खाजगी बैठकील उपस्थित होते आणि त्यांनी चर्चेंत भाग घेऊन आपली भूमिका सांगितली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org