हें सारं सुरु होतं. निवडणूक जिंकली होती, तरी यशवंतरावांच्या मनांतली राजकीय विचारांची खळखळ थांबलेली नव्हती. १९३४ मधअये काँग्रेस समाजवादी -पक्ष स्थापन झाला त्या वेळीं त्याकडे ते सुरुवातीला आकर्षिले गेले होते. या पक्षांत अच्युतराव पटवर्धन, एस.एम्. जोशी, ना. ग. गोरे अशीं कर्ती माणसं होतीं. त्यांच्याबद्दल यशवंतरावांच्या मनांत आदरहि होता. परंतु त्या पक्षाची कामाची पद्धत, त-हा पाहिल्यानंतर ते तिथे फार काळ रमले नाहीत. समाजवादाच्या चळवळीबद्दल यशवंतरावांनी आपल्या मनांत विचारांची कांही जुळणी केली होती. समाजवादाची चळवळ ही समतेची चळवळ म्हणून सुरु होत आहे. हें त्यांना उमजलं होतं. स्वातंत्र्याची चळवळ ही इंग्रजांचं राज्य घालवण्यापुरती मर्यादित नाही, समाजांतील विषमता दूर केली पाहिजे, समत निर्माण केली पाहिजे, नवीन समाज-रचना आणखी पाहिजे हा चळवळीसंबंधीचा मनांत पक्का विचार झाला होता. पं. जवाहरलाल नेहरु यांनी फैजपूर काँग्रेसमध्ये आणि आत्मचरित्रांतहि समाजवादाचा विचार स्पष्टपणें मांडला असल्यानं पंडितजींच्या नेतृत्वाचा ठसा यशवंतरावांच्या मनावर टिकून राहिला होता.
पं. नेहरुंनी स्वातंत्र्याच्या चळवळीचं विश्लेषण ऐतिहासिक संदर्भांत केलं होतं. समाजवादाचा, धर्म-निरपेक्षतेचा (सेक्युलॅरिझम) विचारहि त्यांनी स्पष्ट मांडला होता. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची चळवळ ही केवळ स्वातंत्र्याची चळवळ नाही, तर इतिहासांत साम्राज्यशाहीवादी दृष्टि आहे आणि त्याचा फायदा घेऊन जी आर्थिक कुरघोडी केली जात आहे, आर्थिक शोषण घडत आहे, सामाजिक शोषण होत आहे, त्यांतून बाहेर पडायचं तर स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे; एका अर्थानं साम्राज्यवादाविरुद्ध जो लढा आहे त्याचा एक भाग म्हणून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा लढा आहे हें पंडितजींचं विश्लेषण त्यांच्यासमोर होतं. काँग्रेसच्या चळवळीचं आकर्षण त्यांच्या मनाला निरंतरचं चिकटून राहिलं तें त्यामुळेच.
समाजवादाच्या चळवळींत ते टिकले नाहीत हें खरं, पण १९३६-३७-३८ च्या सुमारास एम् एन् रॉय यांच्या विचारांनी त्यांच्या मनाची पकड घेतली आणि रॉय यांच्या रॅडिकल काँग्रेस-जनांच्या मेळाव्यांत यशवंतराव कांही काळ दाखल झाले. एम् . एन्. रॉय हे प्रदीर्घ तुरुंगवासाची शिक्षा भोगून १९३६ च्या अखेरीला बाहेर आले होते. रॉय हे मूळचे आंतरराष्ट्रीय कम्युनिझमचे बोट धरुन त्या धोरणानं चालणारे. परंतु कम्युनिस्टांची अति डावेपणाची प्रवृत्ति पुढे पुढे रॉय यांना मानवेनाशी झाली. हिंदुस्थानांत ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध काँग्रेस-संघटना ही म.गांधींच्या नेतृत्वाखाली जागरुकपणें चळवळ करीत होती आणि हिंदुस्थानांतील जनता या चळवळीच्या पाठीशीं प्रचंड शक्तीनं उभी आहे याची जाणीव रॉयना होती. साम्राज्यवादाविरुद्ध सुरु असलेल्या या चळवळीनं विश्वरुप धारण करायचं, तर काँग्रेसमध्ये त्यासाठी पर्यायी नेतृत्व असलं पाहिजे, तसं नेतृत्व निर्माण झालं पाहिजे, यावर त्यांचा भर होता. असं नेतृत्व, काँग्रेस-अंतर्गतच निर्माण झालं, तर म. गांधीचं नेतृत्व बाजूला पडेल आणि मग ब्रिट्रिश सरकारवर संघटितपणें निकराचा हल्ला करणं शक्य होईल; इतकंच नव्हे तर, सरकारच्या कच्छपीं असलेल्या वर्गालाहि मग त्राही भगवन् करण्याचा, वठणीवर आणण्याचा हेतु साध्य होईल, अशी त्यांची धारणा होती. समाजांतील विषमता दूर करणं हेंहि त्याना या चळवळीद्वारे अभिप्रेत होतं. तुरुंगांतून सुटल्यानंतर हें ध्येय समोर ठेवूनच रॉय हे काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसची चळवळ ही एक विशिष्ट दिशेनंच पुढे रेटत न्यायची हा हेतूनंच ते त्यांत दाखल झालेले असल्यानं, त्यांनी कांही योजना निश्चित केल्या आणि त्या योजनांच्या पूर्ततेसाठी काँग्रेसांतर्गतच एक वेगळा गट स्थापन केला. रॅडिकल काँग्रेस-जन या नांवानं हा गट स्थापन झाला होता.