सरदार पटेल हे त्या वेळीं मुंबईस आपल्या मुलाच्याच घरीं रहात असत. एवढ्या मोठ्या पुढा-यास भेटावं कसं आणि बोलावं कसं, या विवंचनेंतच अखेर यशवंतराव भेटीसाठी म्हणून चिठ्ठीद्वारे सरदारांपर्यंत पोंचले. यशवंतराव त्या वेळीं बी. ए. च्या वर्गांतले विद्यार्थी होते. ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांना भेटण्याचा आणि चर्चा करण्याचा अनुभव संग्रहीं नव्हता, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मुंबईला येण्याचं धाडस तर केलं होतं. भेटीसाठी चिठ्ठी आंत गेली पण कांही हालचाल दिसेना. असा बराच वेळ गेला. सरदारांशीं भेट होऊन चर्चा घडण्याचं लक्षण दिसेना. तरी पण मनाचा हिय्या करुन तिथेच बसून रहाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. असा बराच वेळ गेला आणि मग पटेलांनी बोलावलं, कुठलें, कोण, कशासाठी आलांत वगैरे चौकशी त्यांनी केली. भीड चेपून जेवढं सांगतां येणं शक्य होतं तेवढं यशवंतरावांनी सांगितलं. आपण एक बहुजन-समाजांतील कार्यकर्ते असून कॉलेजमधील विद्यार्ती आहोंत हेंहि त्यांनी सांगितलं. सरदारांनी सर्व ऐकलं. पटेल हे गंभीर स्वभावाचे आणि चेह-याचे नेते. कुणाची बाजू ऐकतांना त्यांच्या चेह-यावरील गांभीर्य आणखीनच वाढत असे. गंभीरपणानं सातारच्या या तरुणाचं म्हणणं त्यांनी ऐकलं. पण निर्णय, हो नाही अन् नाही असाहि नाही. नेत्यांच्या मनाचा थांगपत्ता क्क्चितच लागतो. त्यांतून सरदार तर मोठे मुत्सद्दी. सरदारांच्या मनाचा आणि निर्णयाचा थांगपत्ता यशवंतरावांना लागणं शक्यच नव्हतं. भेटलो आणि बोललों एवढंच समाधान मिळवून यशवंतरावांना सातारला परत फिरावं लागलं.
यशवंतराव सातारला परतले तेव्हा उमेदवारांची नांवं अधिकृतपणें जाहीर होण्यास थोडे दिवस उरले होते. प्रयत्न करुनहि हुकमी यश न मिळाल्यानं कार्यकर्ते निराश बनले होते. काय करावं हें कुणालाच कांही सुचत नव्हतं. पण आश्चर्य असं की, पुढच्या चार-पांच दिवसांत अधिकृत उमेदवारांची जीं नांवं जाहीर झालीं त्यामध्ये आत्माराम पाटील यांचं नांव झळकलं. कार्यकर्त्यांनी पहिली फेरी तर जिंकली. पण खरा प्रश्न निर्माण झाला तो आत्माराम पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच !
काँग्रेसमध्ये त्या काळांत सुख-स्वास्थ्य लाभलेले लोकच राजकारण करत असत. तेच आघाडीवर असत. सातारा जिल्ह्यांतहि असे लोक बरेच होते. काँग्रेस-विरोधी-पक्षांत ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी होते. कूपर हे त्या वेळीं जिल्ह्यांतलं एक बंड प्रस्थ होतं. आत्माराम पाटील हे सरंजामदार, सरदार या वर्गांतले नव्हते; पण त्यांनाच उमेदवार म्हणून निवडणुकींत यशस्वी करायचं होतं. जिल्ह्यांतले मान्यवर नेते आपापल्या ठिकाणीं स्वस्थ होते. त्यांच्या हातांतून तरुणांनी उमेदवारी हिसकावून घेतली होती. साहजिकच ते दुखावले होते. यशवंतरावांचा आणि बरोबरच्या तरुणांचा एवढया मोठ्या निवडणुकीचा तो पहिलाच अनुभव. प्रचाराचं रान उठवायचं होतं, पण पैसा नव्हता. साधनं अपुरीं होतीं. होते फक्त कार्यकर्ते. या कार्यकर्त्यांची जिद्द दांडगी होती. मिळेल त्या साधनानं सारा जिल्हा प्रचारकार्यानं त्यांनी दणाणून सोडला. सर्वत्र जम बसवला, आपुलकी निर्माण केली आणि बहुजन-समाजांत तळापासून जागृति केली. परिणाम असा झाला की, आत्माराम पाटील यांच्यावर मतदारांनी मतांचा पाऊस पाडला. सातारा जिल्ह्यांत त्या वेळीं जे उमेदवार निवडणुकीला उभे केले होते, त्या सर्वांमध्ये आत्माराम पाटील यांना अधिक मतं तर मिळालींच शिवाय महाराष्ट्रांतहि सर्वाधिक मतं मिळवणारे ते मानकरी ठरले. संघटना-कौशल्य, राजकीय धोरणापणा आणि समयोचित वक्तृत्व यांबाबत यशवंतरावांची त्या वेळी कसोटीच लागून गेली. त्यांच्या चातुर्यामुळे यश हस्तगत करणं शक्य झालं. यशवंतरावांच्या सामाजिक आणि राजकीय कर्तृत्वाची भविष्यवाणीच या यशानं सातारा जिल्ह्याला ऐकवली. जिल्ह्यांतल्या मान्यवर नेत्यांनाहि याची जाणीव झाली असावी. उमेदवारीच्या संघर्षावरुन एकमेकांची मनं फाटली होती. विजयामुळे कार्यकर्ते बेभान होण्याचा प्रसंग होता. तसं घडलं असतं तर जिल्ह्यांतल्या संघटनेच्या चिरफळ्या होऊन त्या सांधण्यांतच पुढचीं कांही वर्षं खर्ची पडलीं असती. परंतु तसं घडलं नाही. आत्माराम पाटील यांच्या विजयाचं महत्त्व जिल्ह्यांतल्या धुरिणांनी जोखलं. राष्ट्रीय चळवळीची आणि काँग्रेसची शक्ति बहुजन-समाजांत तळापर्यंत पोंचली आहे आणि तें कार्य तरुणांनी केलं आहे याचा साक्षात्कार या निवडणुकीन त्यांना घडविला होता. त्यामुळे त्यांनी स्वत:ला सावरलं आणि सारे कार्यकर्तेहि सावरले गेले. भाऊसाहेब सोमणांसारख्या मुत्सद्यानं तर कार्यकर्त्यांच्या पाठीशीं आपला आशीर्वाद उभा केला. निवडणूक आणि नंतरची दुसरी फेरीहि यशवंतरावांनी अशा प्रकारे जिंकली.