इतिहासाचे एक पान. ४२

जिल्हा-काँग्रेसवर ताबा मिळवण्याच्या दृष्टीनं श्री. भाऊसाहेब सोमण यांनी आपला एक माणूस ठरवला होता; परंतु यशवंतराव वगैरे कराड भागांतील तरुणांनी आपल्या एका तरुण कार्यकर्त्यांबद्दल आग्रह धरला. काँग्रेस ही सामान्य शेतक-यांची असावी असा या गटाचा आग्रह असून, त्या दृष्टीनं त्यांनी येडें-निपाणी गावचे पांडू मास्तर यांचं नांव अध्यक्षपदासाठी निश्चित केलं. ही निवडणूक कराडला व्हायची होती. कोयनेच्या काठावरील एक निवान्त जागा त्यासाठी ठरवण्यांत आली. निवडणुकीच्या निमित्तानं जिल्हा-काँग्रेसमध्ये वैचारिकदृष्टया. धोरणात्मक स्वरुपाचे दोन गट निर्माण झाल्यानं आणि तडफदार तरुण या निवडणुकीच्या रिंगणांत उतरुन जिद्दीनं काम करुं लागल्यानं जिल्ह्यांत कांहीसं चितेचं वातावरण निर्माण झालं. निवडणुक सुरळीत पार पडेल की नाही, अशी शंका कांहीजण व्यक्त करुं लागले. विशेषत: साता-यांतील नेत्यांना या शंकेनं अधिक धेरलं. पण ठरल्याप्रमाणे सभा झाली आणि ती सुरळीत पार पडली. या सभेंत भाऊसाहेब सोमणांचे उमेदवार श्री. व्यंकटराव पवार हे निवडून आले. श्री. नाना पाटील यांचा भाऊसाहेब सोमण यांना पाठिंबा होता. त्यांनी आपली शक्ति श्री. व्यंकटराव पवार यांच्या पाठीशीं उभी केली. कराडच्या मंडळींना आणि स्वत: यशवंतरावांनाहि हें अनपेक्षित होतं; पण सभेचा निर्णय त्यांनी मान्य केला आणि जिल्हा-काँग्रेसचं दप्तर श्री. पवार यांच्या स्वाधीन केलं. त्या तरुण वयांतहि पक्षाची शिस्त पाळण्याचा आदर्शच त्यांनी या निमित्तानं आपल्या सर्व सहका-यांसमोर ठेवला. स्वत: अवमानित झालेले असतांहि काँग्रेस-पक्षाचं प्रेम आणि शिस्त
पाळायची हा त्यांचा शिरस्ता तेव्हापासूनचा आहे. पराभूत झालेल्या गटानं शिस्तीनं पराभव पचवला, कोणत्याहि प्रकारे हलकल्लोळ माजवला नाही, हें पाहून सातारकर मंडळीहि आश्चर्यचकित झाली. कराडची मंडळी संघटनेची शिस्त इतकी पवित्र मानतात, हा अनुभव त्यांना नवीन होता. अनुभवांतून अंगी समंजसपणा निर्माण झाल्याचीं उदाहरणं असूं शकतात; परंतु यशस्वी राजकारण करण्यासाठी सातारकरांना उपजत समंजसपणाची प्रचीति यशवंतरावांनी या निमित्तानं आणून दिली. जिल्हा-काँग्रेसचं दप्तर तरुण गटाच्या स्वाधीन होतं तें हातांतून गेलं तरी कुणी निराश बनले नाहीत किंवा काँग्रेसच्या कामापासून यत्किंचितहि ढळले नाहीत. याचा प्रत्यय कायदेमंडळाच्या निवडणुकीच्या वेळीं आला. कायदेमंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवार ठरवतांनाहि जिल्ह्यांत कांहीसा संघर्ष निर्माण झाला. काँग्रेस-संघटनेवर त्या काळांत उच्चभ्रू मंडळी अधिकार सांगत असत आणि अधिकार गाजवत असत. निवडणुकीची संधि येतांच जिल्ह्यांतल्या मान्यवरांनी उमेदवार हा सुशिक्षित, शक्य तर वकीलवर्गांतली असावा, असा विचारप्रवाह सोडून दिला. पण जिल्ह्यांतल्या तरुणवर्गांचंहि एक मत होतं. उमेदवार हा तरुण, १९३० च्या प्रत्यक्ष चळवळींतून आलेला असावा. असं तरुणांचं मत होतं. त्यामागे सबळ कारणहि होतं. निवडणुकांचा फायदा प्रतिक्रियावादी लोकांनी घ्यायचा, त्याचा उपयोग करुन घ्यायचा, हें त्या काळांत घडत असे. रावसाहेब, रावबहादूर, सरकारी नोकरदारवर्ग असा जो प्रतिगामीवर्ग स्वातंत्र्य-चळवळीच्या बाजूनं कधी उभा नसायचा, तो अशा निवडणुकांच्या वेळीं आघाडीवर राहून सत्ता ताब्यांत ठेवण्याचा लाभ उठवत असे. ही प्रथा नाहीशी व्हावी आणि चळवळींत जे प्रत्यक्ष उडी घेतात, काम करतात, हालअपेष्टा भोगतात, त्यांना कामाची वेगळ्या प्रकारची आणखी संधि मिळावी आणि मिळणा-या सत्तेचा उपयोग सामान्य माणसाचं जीवन सुधारण्यासाठी व्हावा, तो मार्ग मोकळा व्हावा असं तरुण गटाला वाटत होतं. दुस-या मताच्या या कार्यकर्त्यांनी आपला दृष्टिकोन जिल्ह्यांतल्या मान्यवरांना पटवून देण्याचा परोपरीनं प्रयत्न केला; परंतु तरुणांनी सुचवलेले उमेदवार श्री. आत्माराम पाटील यांना उमेदवार म्हणून स्वीकारण्यास मान्यवरांचं मन तयार नव्हतं. किंबहुना उमेदवार कोण असावा हा प्रश्न त्यांनी प्रतिष्ठेचा बनविला आणि त्यांतून मग अंतर्गत संघर्ष वाढत राहिला.

जिल्हा-पातळीवर या वादाचा निर्णय होत नाही असं जेव्हा निश्चित झालं, तेव्हा ज्येष्ठ काँग्रेस-नेत्यांपर्यंत हें गा-हाणं न्यावं आणि आपला दृष्टिकोन स्पष्ट करून त्याला मान्यता मिळवावी असा विचार तरुण गटामध्ये बळावला. १९३० नंतरच्या काळांत आत्माराम पाटील हे बहुजन-समाजाचे प्रतिनिधी म्हणून नेतृत्व करीत होते. या आपल्या प्रतिनिधीला जिल्ह्याचा प्रमुख पुढारी बनवला पाहिजे अशी महत्त्वाकांक्षा तरुण गटांत निर्माण झालेली होती. यशवंतराव हे त्यांचे सहकारी, त्यांच्या बरोबरीनं सर्व कामांत भाग घेत होते. आत्माराम पाटील यांच्या पुढारीपणावर, कायदेमंडळाच्या निवडणुकांच्या निमित्तानं शिक्कामोर्तब करण्याच संधि आलेली असतांना, जिल्ह्याचं परंपरावादी मान्यवर नेतृत्व मात्र ते मान्य करण्यास तयार नव्हते. अखेर स्थानिक स्वरुपाच्या वाटाघाटीमध्ये निराशा प्राप्त झाल्यानं. काँग्रेस-श्रेष्ठांसमोर जाऊन, त्यांना वस्तुस्थिती सांगावी आणि न्याय मिळवावा ही कामगिरी यशवंतरावांकडे सोपवण्यांत आली. ठरल्याप्रमाणे एक दिवस यशवंतराव पुण्यात दाखल झाले आणि महाराष्ट्र-काँग्रेसचे नेते श्री. शंकरराव देव यांच्याशी त्यांची चर्चा केली. श्री. केशवराव जेधे यांच्यासमोरहि बाजू मांडली. कार्यकर्त्यांचा दृष्टिकोन निवेदन केला, इच्छा सांगितली. ज्येष्ठांनी ऐकून घेतलं; श्री. जेधे कांहीसे अनुकूलहि दिसले, पण निर्णय कुणीच दिला नाही. श्री. शंकरराव देव आणि सातारा जिल्ह्यांतील मान्यवर नेते मंडळी यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय चळवळींतले प्रारंभापासूनचे नेते असलेल्या मंडळींचा विचार घेणं त्यांना आवश्यक वाटलं असावं. त्यामुळे निर्णय कांही होऊ शकला नाही आणि यशवंतरावांना दुख-या मनानंच सातारला परतावं लागलं. जिल्ह्यांत पोंचल्यावर पुन्हा चर्चा सुरु झाली.  कार्यकर्ते स्वस्थ रहाण्यास व घडेल तसं पहात बसण्यास तयार नव्हते. खल सुरु राहिला आणि त्यांतून यशवंतरावांनी मुंबईला जावं, सरदार पटेल यांना भेटावं आणि कार्यकर्त्यांची भावना सांगावी असा विचार ठरला. मुंबईपर्यंतच्या खर्चाची जमवाजमव मग करण्यांत आली आणि न्याय मिळवून घेण्याच्या कामगिरीवर यशवंतरावांची रवानगी पुन्हा करण्यांत आली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org