इतिहासाचे एक पान. ३७

दहा-वीस मुलांचे म्होरके ते बनले होते. १९३० सालीं चळवळींत प्रत्यक्ष भाग घेण्याचं ठरवून, त्याचा प्रारंभ त्यांनी टिळक हायस्कूलमधल्या लिंबाच्या झाडावर झेंडा लावून झेंडावंदनाच्या कार्यक्रमापासून सुरु केला. हे म्होरके असल्यानं बरोबर कांही मित्रहि असत. यशवंतरावांचे हे उद्योग वाढत चालले तसं शिक्षणखातं जागं झालं. एक दिवस शिक्षणाधिका-यांनी यशवंताला या झेंडावंदनाच्या उपक्रमाबद्दल जाब विचारला. "कुणाच्या परवानगीनं झेंडावंदन करतोस?" या शिक्षणाधिका-याच्या प्रश्नाला विद्यार्थी यशवंतानं, स्वयंस्फूर्तीनं करतो असं चोखं उत्तर दिलं. हायस्कूलचे हेडमास्तर द्विवेदी हे राष्ट्रीय वृत्तीचे होते आणि त्यांची या उपक्रमास गुप्त संमतीहि होती. शिक्षणाधिका-यांना यशवंताच्या तोंडून द्विवेंदींचं नांवच वदवायचं होतं. पण तसं घडलं असतं तर, टिळक हायस्कूलला टाळा लागणार होता. सरकारधाजिण्या शिक्षणाधिका-याचा तोच हेतु होता. परंत यशवंतानं तो तोहमत धैर्यानं स्वत:वर घेतल्यानं, शिक्षणाधिका-याचा मुखभंग झाला आणि त्याचबरोबर टिळक हायस्कूलवरील संकटहि टळलं; परंतु या गंभीर घटनेनं विद्यार्थी यशवंताला मात्र तुरुंगाची वाट धरावी लागली.

१९३०-३२ चा काळ हा चळवळीचाच काळ होता. शाळेंत शिकत असतांनाच एक दिवस या तरुणांनी कराड म्युनिसिपालिटीवर राष्ट्रीय झेंडा लावायचा आणि गावांत चळवळीचीं पत्रकं चिकटवायचीं, असा बेत ठरवला. त्याचं पुढारीपण अर्थातच तरुण यशवंताकडे होतं. बेत पक्का झाला, आणखी झाली आणि एके दिवशी 'वंदे मातरम्' च्या घोषणा करीत म्युनिसिपालिटीवर त्यांनी राष्ट्रीय झेंडा फडकवला. हें घडतांच गावांत खळबळ उडाली. चलवळीचा जोर सर्वत्र वाढलेला असल्यानं ब्रिटिश सरकार खवळलं होतं. म्युनिसिपालिटीवर राष्ट्रीय झेंडा आणि गावांत सर्वत्र चळवळीला प्रेरणा देणारीं पत्रकं पसरतांच नोकरशाहीनं दडपशाही सुरु केली. सर्वत्र धरपकड करण्याला त्वरेनं प्रारंभ झाला. त्यांमध्ये तरुण यशवंताचाहि क्रमांक लागला आणि परिणामीं शिक्षाहि ठोठावण्यांत आली. शाळेंतल्या विद्यार्थ्यास शिक्षा सांगितली जातांच शिक्षकवर्गहि गडबडला. कारण त्या वेळीं कुणावर तोहमत येईल याची कांहीच शाश्वति नव्हती. शिक्षा सांगण्यांत आली त्यानंतरचा तिसरा दिवस. शिक्षा झालेल्यांची रवानगी पुण्याला येरवडा तुरुंगांत व्हायची होती. यशवंताला भली अठरा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यांत आली होती.  त्या वेळी शाळेंतले एक शिक्षक यशवंताच्या घरी गेले आणि मुलाला भेटण्यासाठी विठाईला घेऊन आले. फौजदारसाहेबांनी मग पोलिस-पहा-यांत त्या मायलेकरांची भेट घडवली. यशवंताला पहातांच माउलीचे डोळे पाण्यानं भरले. लहान पोर आणि अठरा महिन्यांची शिक्षा-आईचं मन पिळवटून निघालं. मग मास्तर त्यांचं सांत्वन करुं लागले. आणि यशवंताकडे बघून म्हणाले, "हें पहा, फौजदारसाहेब दयाळु आहेत, माफी मागितली तर सोडून देऊं म्हणतात."

मास्तरांच्या तोंडचे माफीचे शब्द ऐकले मात्र; विठाईच्या डोळ्यांतील अश्रु कुठल्या कुठे गेले. "काय बोलतां मास्तर, माफी मागायची ?" त्या माउलीनं मास्तरांना तिथल्या तिथे फटकारलं आणि मुलाला म्हणाली, "माफी मागायचं कारण नाही. तब्बेतीची काळजी घे म्हणजे झालं. परमेश्वर आपल्या पाठीशीं आहे. " आणि माउली उठून निघूनहि गेली. तरुण यशवंताच्या आयुष्यांतला हा एकच क्षण, लहानशीच घटना. मास्तरांच्या सल्ल्याप्रमाणे माफी मागून हा तरुण चळवळ्या सुटलाहि असता, पण भावी आयुष्यांत मग कुठे तरी फेकला गेला असता आणि जन्मभर माफीच मागत रहावी लागली असती. आईचा स्वाभिमान मनांत बाळगूनच तरुण यशवंतानं येरवड्याला उंबरा ओलांडला आणि त्याच स्वाभिमानानं शिक्षा भोगून परत आला. तुरुंगांत शिक्षा भोगून हा तरुण परतला तेव्हा सा-या कराडची छाती अभिमानानं फुगली होती. पण याचं खरं श्रेय होतं विठाईला. आईच्या खंबीर मनाला. पुत्र-प्रेमाच्या जाळ्यांत अडकवून ठेवून तें माफीचं नाटक पूर्ण झालं असतं तर यशवंताची राष्ट्रभक्ति, चळवळ आणि पुढारीपण कदाचित् तिथेच खुरटलं असतं. पण तसं घडायचं नव्हतं. मातेच्या हातून तसं घडावं असा संकेत नव्हता. कधीहि न पुसल्या जाणा-या या आठवणींतूनच तरुण यशवंताचं राजकीय चरित्र आणि राजकीय चारित्र्य पुढे घडत राहिलं. १९३२ सालची ही घटना. देशासाठी त्याग करण्याचा पहिला धडा, मातेकडूनच त्यांना या प्रसंगानं मिळाला. स्वत:च्या-मनाची तयारी करुनच, विद्यार्थिदशेंत असतांना त्यांनी देशसेवेचं व्रत मान्य केलं होतं. केवळ भावनेला बळी पडून बुलेटिन्स वांटण्याच्या किंवा झेंडा लावण्याच्या कामास ते प्रवृत्त झालेले नव्हते. त्यामागे एक निश्चित तात्त्विक बैठक होती; आणि त्यासाठी मातेचा आशीर्वादहि आता लाभला होता. देशांतल्या स्वातंत्र्यलढ्याच्या वातावरणानं, गांधी-नेहरुंच्या विचारानं त्यांना खेचलं होतं. सामाजिक परिस्थितीचं आव्हान तर समोर होतंच.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org