इतिहासाचे एक पान. ३३६

निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित झाला. परंतु काँग्रेस-पक्षानं उमेदवाराची यादी मात्र पुढे जानेवारीच्या अखेरीस जाहीर केली. कांही उमेदवारांची नांवं तर फेब्रुवारींत जाहीर केलीं. अन्य विरोधी पक्षांच्या उमेदवाराच्या याद्या अगोदरच जाहीर झाल्या होत्या. संघटना काँग्रेसनं मग या निवडणुकींत व्यत्यय निर्माण करण्याच्या हेतूनं काँग्रेसच्या निवडणूक-चिन्हाचा वाद उकरून काढून सर्वोच्च न्यायालयापर्यंत धांव घेतली. काँग्रेसनं त्यामुळे पक्षाच्या बैलजोडीच्या चिन्हांत बदल केला आणि आठवड्याभरांत 'गाय-वासरूं' हे चिन्हा निश्चित करून त्याचाच प्रचार सुरु केला.

या निवडणूक-प्रचाराच्या दौ-यांत यशवंतरावांनी लोकांना दोन मूलभूत विचारांवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं. त्यांनी सांगितलं की, देशांतल्या बहुसंख्य लोकांची स्थिती ज्यामुळे सुधारेल असा काँग्रेसचा कार्यक्रम मतदारांपुढे आहे आणि दुसरा, देशांत संस्थानिक असावेत, सर्व क्षेत्राची मक्तेदारी रहावी आणि देशाचा विचार प्रतिगामी भूमिकेंतून करावा असा एक कार्यक्रम आहे. मतदारांनी यांतल्या कोणत्या कार्यक्रमाची निवड करायची हें या निवडणुकीचं आव्हान आहे. दिल्लींतल्या कॅनॉट सर्कसवर झालेल्या निवडणूक-प्रचाराच्या सभेंत त्यांनी इंदिरा गांधीच्या नेतृत्वाचं महत्त्व सांगितलं आणि हुकूमशहा म्हणून त्यांच्यावर करण्यांत येणा-या टीकेचा समाचार घेतला.  त्यांनी सांगितलं की, त्या हुकूमशहा असत्या तर, चौदा महिने मुदत शिल्लक असतांना लोकसभा अगोदरच बरखास्त करून आपल्या पुरोगामी धोरणासाठी, लोकांची मान्यता मिळवण्यासाठी निवडणुकीच्या फंदांत त्या पडल्या नसल्या. हुकूमशहा हा आपल्या हेतूच्या सिद्धीसाठी हातांत बंदूक घेऊनच उभा रहातो. लोकांकडे जाऊन त्यांची मान्यता मिळवण्यासाठी त्यांना आवाहन करण्याच्या मार्गाचा अवलंब करत नसतो.

या निवडणुकांमध्ये देशांत स्थिर स्वरुपाचं मध्यवर्ती सरकार अस्तित्वांत आणण्याचं आवाहन मतदारांना सर्वत्र करण्यांत आलं. किंबहुना मुदतपूर्व निवडणुकांचा तोच प्रमुख हेतु होता. महाराष्ट्रांतील काँग्रेस-पक्ष हा स्थिर आणि भक्कम पवित्र्यांत उभा होता. या निवडणुकांत लोकसभेच्या ४४ जागांपैकी महाराष्ट्र काँग्रेसनं ४३ जागा जिंकल्या. स्वत: यशवंतराव हे सातारा मतदार-संघातून विरोधी उमेदवारापेक्षा १ लक्ष ७१ हजार मतं अधिक मिळवून विजयी झाले.

या निवडणुकांच्या वेळीं महाराष्ट्रांत शिवसेनेनं काँग्रेसला आव्हान दिलं होतं. मुंबईतील निवडणूक-प्रचाराच्या यशवंतरावांच्या सभा उधळून लावण्याचाहि शिवसेनेनं प्रयत्न केला. किंबहुना त्यांच्यासमोर शिवसेना झिंदाबाद आणि 'चव्हाण चले जाव' अशा घोषणा केल्या. निवडणुकांनंतर सेना-प्रमुख बाळ ठाकरे यांनी तर, यशवंतरावांची मुंबईतील शिवाजी पार्कवर सभा होऊं दिली जाणार नाही शी दमदाटीच केली; परंतु शिवसेनेचं हें आव्हान स्वीकरून यशवंतराव खास विमानानं दिल्लीहून मुंबईला आले आणि निवडणूक-विजयाच्या शिवाजी पार्कवरील सभेला हजर राहिले. शिवसेनेनं या सभेवर बहिष्कार घाला, असं जनतेला आवाहन केलं होतं; परंतु या सभेला तीन लाखांवर लोक उपस्थित राहिले आणि ही एक ऐतिहासिक सभा ठरली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org