इतिहासाचे एक पान. ३३


--------

मनाच्या कोंडवाड्यांतून बाहेर पडून कांही तरी करावं असं यशवंतरावांचं मन हुंकार देत होतं. सभोवती सुरु असलेल्या राजकीय, सामाजिक चळवळीचा वेध ते घेतहि होते.  परंतु परिस्थितीचं कुंपण तोडून बाहेर पडावं लागणार होतं. त्यासाठी प्रसंगी अंग रक्तबंबाळ होणार होतं. बाहेरचं सामाजिक वातावरण स्वच्छ, शुद्ध राहिलेलं नव्हतं.  राजकीय चळवळीनं जागृत झालेला सातारा जिल्हा आता वेगळ्याच दिशेनं धांव घेऊ लागला होता. ब्राह्मणेतर-चळवळीची वावटळ तिथे उठली होती. तिचा एकांगी प्रचार झपाट्यानं वाढत होता. समाजासमोर जे विचार व्यक्त केले जात होते त्यामुळे मोठाच वैचारिक गोंधळ निर्माण झाला. ही चळवळ जोमांत असतांनाच लो. टिळकांच्याविरोधी बोलणं, लिहिणं हे उद्योग जाणतीं समजलीं जाणारीं माणसं करत होतीं. यशवंतरावांचं वाचन सुरु होतं. वस्तुत: हिंदुस्थानसमोर त्या वेळीं अनेक महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले होते. म. गांधी स्वातंत्र्यासाठीं सत्याग्रह व चळवळ पुकारत होते. क्रांतिकारक क्रांतीचा वणवा पेटवत होते. इंग्रज लोक देशभक्ताना तुरुंगांत बंद करत होते. या घटनांकडे जाणतीं माणसं लक्ष कां देत नाहींत याची हरहर तरुण यशवंतरावांच्या मनांत होती. त्यामुळेच सत्यशोधक-समाजाची चळवळ घरांत आणि अवतीं-भवतीं वाढत असूनहि स्वत: यशवंतराव त्यांत गुरफटले गेले नाहीत. ब्राह्मणेतर - चळवळीचं आकर्षण त्यांच्या मनांत कधीच निर्माण झालेलं नव्हतं. उलट क्रांतिकारकांचं क्रांतिकार्य, राष्ट्र-पुरुषांची चरित्रं, लोकमान्यांचं राजकारण, काँग्रेसच्या नेत्यांची शिकवण इत्यादींच्या गंभीर वाचनांन त्यांच्या मनाला विचाराची बैठक प्राप्त झाली आणि आपण कांही तरी करावं ही मनांतली हुरहूर वाढण्यांतच त्याचा परिणाम झाला.

देशांत असहकाराची चळवळ १९२१ पासूनच सुरु झालेली होती. नागपूरच्या अधिवेशनानं काँग्रेसची नवी घटना मंजूर करुन काँग्रेसच्या रचनेंत क्रांति केल्यानंतर काँग्रेस एक आटोपशीर व प्रभावी संघटना बनली. जिल्हे, शहर, तालुके व खेंडीं अशा पातळीपर्यंत काँग्रेस पोंचावी हा या नव्या रचनेचा हेतु होता. या नव्या रचनेमुळे काँग्रेसला अधिक प्रातिनिधिक स्वरुप आलं आणि सभासद-संख्या वेगानं वाढूं लागली. त्या काळांत सभासदत्वाची वर्गणी चार आणे ठेवली होती, पण ती सक्तीची नव्हती. काँग्रेसचीं उदिष्टं मान्य करणं आणि तिची तत्त्वं पाळणं एवढी पात्रता सभासद होण्यास पुरेशी होती. याचा परिणाम काँग्रेस कोट्यवधि गरीब जनतेपर्यंत पोचंण्यातं झाला. आणि हळूहळू काँग्रेस ही राजकारणाला समाजकारण बनवण्याचं साधन बनली. कांही विधायक उपक्रमहि काँग्रेसनं हातीं घेतले. टिळक-स्वराज्य-निधी सुरु करण्यांत आला व या निधींत सहा महिन्यांच्या आंत एक कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे सांपत्तिक स्थिती सुरक्षित बनली. गांधींच्या नेतृत्वाखाली एक अभिनव शस्त्रानं साम्राज्याशाहीशी लढा देण्याचा चंग आता काँग्रेसनं बांधला होता.

त्यांतूनच मग सर्वत्र बहिष्काराची लाट उसळली. ग्रामीण भागांत तर नव्या उत्साहानं चैतन्य खेळूं लागलं. देशाच्या कांही भागांत कर-बंदीची चळवळ सुरु झाली, तर कांही भागांत कामगारांनी संपाचं हत्यार उपसलं. विलायती कापडावर बहिष्कार घालण्यांत येऊन दारुची विक्री बंद करण्यांत आली; परंतु या सर्वोपेक्षांहि देशाच्या सर्व भागांत जनता खडबडून जागी झाली आहे हेंच सरकारला भयावह वाटत होतं. इंग्लंडचे युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भारत-भेटीवर काँग्रेसनं बहिष्कार घातला तेव्हा तर असहकाराच्या चळवळीचं यश उठून दिसूं लागलं. मुंबईंत आणि कलकत्त्यांत सार्वजनिक हरताळ पडले आणि मुंबईच्या सभेंत, चौपाटीवर स्वत: गांधींनीच विलायती कपड्यांची होळी केली. लोकांनी गो-या लोकांवर हल्लेहि केले आणि सर्वत्र दंगासुरु होतांच पोलिसांनी गोळीबार करुन अनेकांना यमसदनास पाठवलं. दडपशाहीचे उपाय योजून चळवळ मोडून काढण्यासाठी सरकारनं सर्व प्रकारच्या अमानुषतेचा अवलंब केला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org