इतिहासाचे एक पान. ३२०

ठराव संमत होतांच यशवंतरावांनी नि:श्वास सोडला. पक्षाच्या ऐक्यावर निर्माण झालेलं एक भयंकर संकट परतवतां आलं याचं त्यांना समाधान वाटत होतं. परंतु नंतरच्या काळांत ज्या घटना घडत गेल्या त्यांनी मात्र यशवंतरावांचं तें समाधान चुकीचं होतं हेंच सिद्ध केलं. एक गोष्ट मात्र खरी की, चव्हाणांच्या त्या ठरावाचं इंदिराजींनी स्वागत केलं. त्यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की, काँग्रेस-पक्ष आपापसांत तडजोड करण्याला समर्थ असून, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या, पक्षाकडून ज्या अपेक्षा आहेत त्या यापुढच्या काळांतहि आता प्रतिबिंबित होत रहातील. आता सर्व संपलं. दोन गटांत निर्माण झालेला तात्कालिक झगडा चव्हाणांच्या मध्यस्थीच्या आणि शांतता-ठरावानं आता थांबला आहे.

पक्षामध्ये आता ज्यामुळे दुरावा निर्माण होईल असं कुणी कांही बोलूं नये किंवा कृति करूं नये असं निजलिंगप्पा यांनी कार्यकारिणीच्या त्या बैठकींत सांगितलं होतं. कारण जी कांही टीका करायच होती. पंतप्रधानांना दोषी ठरवायचं होतं. त्यांना हुकूमशहा म्हणायचं होतं, तें या बैठकींत निजलिंगप्पा आणि स.का. पाटील यांनी अगोदरच बोलून घेतलं होतं.

राष्ट्रपतिपदाची निवडणूक संपल्यानंतर यशवंतरावांवरील वचनपूर्तीचं तें ओझं आता निघून गेलं होतं. आणि आता ते नि:संदिग्धपणें पंतप्रधानांच्या पाठीशीं उभे राहिले होते तरी सुद्धा यशवंतरावांनी त्या अगोदरच्या काळांत पक्षाचं ऐक्य संकटांत असतांना, जें कार्य केलं आणि भूमिका स्वीकारली त्याबद्दल अजूनहि कोणी टीकाकार त्यांना सवाल करत राहिले होते आणि 'कुंपणावर बसणारे' म्हणून बोट दाखवत होते. चव्हाणांची स्थिती मात्र त्या काळांत एकाकी पडल्यासारखी झाली होती. मनांतून ते दु:खी होते.

पंतप्रधान आणि त्यांचे दोन सहकारी यांच्याविरुद्ध शिस्तभंग करण्याची कृति यशवंतरावांच्या मध्यस्थीमुळे तूर्तास बाजूला पडली होती, तरी त्यामुळे यशवंतरावांच्या मध्यस्थाच्या भूमिकेला पूर्णविराम मिळाला होता असं नव्हे; कारण सिंडिकेटचा आक्रमक पवित्रा अजून कायम होता. कार्यकारिणीनं ऐक्याच्या ठरावाला मान्यता दिली होती पण त्यामुळेच सिंडिकेटच्या नेत्यांचं पित्त खवळलं होतं आणि या ठरावाला सुरुंग कसा लावलां येईल यासाठी ते संधि शोधत होते; आणि पंतप्रधानांच्या नियोजित तामिळनाडूच्या दौ-यानं त्यांना ही संधि मिळवून दिली.

कामराज आणि सुबह्मण्यम् यांच्यांत त्या वेळीं बेबनाव निर्माण झाला होता सुब्रह्मण्यम् हे आपल्या विरुद्ध काँग्रेस-कार्यकर्त्यांना फितवतात आणि आपल्याला अलग पाडण्याचा उद्योग करतात, असा कामराज यांचा आक्षेप होता. तो राग मनांत ठेवून पंतप्रधानांसाठी तामिळनाडूच्या दौ-याची केलेली व्यवस्था उधळून लावण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. कारण या दौ-याची व्यवस्था सुबह्मण्यम् यांनी पुढाकार घेऊन केलेली होती. या दोघांमधील मतभेद इतके विकोपाला गेले की, पंतप्रधानांच्या त्या नियोजित दौ-याच्या कांही दिवस अगोदरच सुब्रह्मण्यम् यांनी प्रदेश-काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सिंडिकेटच्या नेत्यांवर विशेषत: कामराज यांच्यावर त्यांनी कठोर टीका केली. कामराज यांच्या मनांतील पंतप्रधानांसंबंधीच्या प्रतिकूल मताला आता मत्सराचं स्वरुप प्राप्त झालं आहे, असा त्यांचा स्पष्ट आरोप होता.

नजीकच्या काळांत अन्यत्र जे भयंकर स्फोट होणार होते त्याची रंगीत तालीमच जणू कांही मद्रासमध्ये सुरू झाली होती. उत्तर-प्रदेशमध्येहि मुख्यमंत्री सी.बी.गुप्ता  आणि कमलापति त्रिपाठी यांच्यांत चकमकी सुरू झाल्या होत्या. गुप्ता हे सिंडिकटेप्रणीत मुख्यमंत्री होते. अन्य राज्यांतूनहि प्रतिहल्ला चढवण्याची तयारी होत असल्याची चिन्ह उमटूं लागली होतीं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org