इतिहासाचे एक पान. ३२

सरकारचा ससेमिरा मग यशवंतरावांच्या कुटुंबियांच्या मागे लागला आणि त्यांतच गणपतराव स्थानबद्धतेंत उडकले. त्याच वेळीं ज्ञानोबाचं निधन झालं आणि गणपरावांना क्षयानं पछाडलं. औषधासाठी मग त्यांना, मिरजेच्या दवाखान्यांत ठेवण्यांत आलं. १९४५-४६ चा तो काळ. असेंब्लीच्या पहिल्या निवडणुकीचे नगारे वाजूं लागले होते. ही निवडणूक यशवंतरावंनी लढवावी असा मित्रांचा आग्रह होता; परंतु गणपतराव आजारी, स्वत:ची पत्नी आजारी, आर्थिक ओढाताण, अशा परिस्थितींत यशवंतराव निवडणुकीपासून दूर होते.पण त्या आजारीपणांतहि, अंथरुणावरुन गणपतरावांनी आपली इच्छा सांगितली, किंबहुना आदेशच दिला. त्यामुळे यशवंतरावांना निवडणुकीला उभं रहावं लागलं. या पहिल्याच निवडणुकींत ते यशस्वीहि झाले. गणपतरावांना कमालीचं समाधान झालं आणि त्या आजारी अवस्थेंत मोठा झालेला यशवंतराव त्यांना दिसूं लागला. मनाशीं ते कांही जुळणी करात होते, पण पुढचं खरं मोठेपण पहाण्याचं, आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण झाल्याचं समाधान गणपतरावांना मिळवून देण्याचं नियतीच्या मनांत नव्हतं. निवडणूक झाली, यशवंतराव विजयी झाले, नुकतंच कुठे पुढचं पाऊल टाकतात न टाकतात तोंच गणपतरावांच्या आजारानं उचल खाल्ली आणि १९४७ मध्ये ते इहलोक सोडून गेले. मागे राहिली त्यांची चार मुलं. अशोक, दादा आणि विक्रम हे तीन मुलगे आणि एक मुलगी. श्री. बाबूराव काळे यांची पत्नी सौ. लीला ही गणपतरावांची मुलगी. या मुलांचं संगोपन, शिक्षण करण्याची जबाबदारी मग यशवंतरावांच्याकडेच आली. मातोश्री विठाई आणि यशवंतरावांच्या पत्नी सौ. वेणूबाई यांनी स्वत:च्या मुलांप्रमाणे या लहानग्यांचा सांभाळ केला. शिक्षण दिलं, मोठं केलं. गणपतरावांचा सर्वांत धाकटा मुलगा राजा (विक्रम), एम.बी.बी.एस्.ची परीक्षा उत्तीर्ण होऊन ज्या दिवशीं डॉक्टर झाला त्या दिवशीं आनंद व्यक्त करण्यासाठी गणपतराव आपल्यांत नाहीत याची तीव्रतेनं जाणीव होऊन यशवंतरावांच्या काळजांत कालवाकालव झाली. डोळ्यांत पाणी उभं राहिलं. गणपतरावांच्या कर्तृत्वाचा, निर्भेळ प्रेमाचा आणि वडीलकीचा ठसा यशवंतरावांच्या मनावर निरंतरचाच कोरलेला आहे. बळवंतरावांच्या अकालीं निधनानंतर, वडील भावाचा - गणपतरावांचा त्यांना मोठाच आधार होता. गणपतरावांनीहि त्यांना कधी वडिलांची ताटातूट झाल्याचं भासूं दिलं नव्हतं. परंतु एकमेकांचं सुख एकमेकांनी पहावं असं दोघांच्याहि दैवात नव्हतं. गणपतरावांच्या निधनानं विठाईवर तर आकाशच कोसळलं. थोरला मुलगा ज्ञानोबा, त्यापूर्वींच काळानं ओढून नेला होता आणि आता दुसरा मुलगा गणपतराव ! विठाईनं अनेक संकटांशी आजवर सामना केला, पण गणपतराव गेल्याच्या दु:खानं या माउलीचं मन फाटून गेलं. विठाईला यशवंत आणि यशवंताला विठाई असंच त्या कुटुंबात आता राहिलं होतं. या मुलांच्या लहानपणी आपलीं हीं तिन्ही बाळं, अंजिराचीं लहान झाडं, तीं मोठी होतील, त्यांना मधुर फळं येतील अशी स्वप्नं या माउलीनं पाहिली होतीं. यांतलीं दोन झाडं आता उन्मळून पडलीं होतीं आणि यशवंताच्या रुपानं एकमेव झाड या माउलीसमोर उभं होतं. यशवंता शिकला, वकील झाला, निवडणुकींत विजयी झाला, मोठा झाला हें सुखाचं वातावरण पसरलं होतं, पण त्याच वेळीं दाराबाहेर उभं असलेलं दु:ख घरांत आलं होतं. बाहेर सुख तेव्हा घरांत दु:ख आणि घरांत सुख तेव्हा बाहेर दु:ख, हें चव्हाणांच्या घरांतलं रहाटगाडगं असंच फिरत राहिलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org