इतिहासाचे एक पान. ३१९

मतदानानंतरचे चार दिवस अशा प्रकारे पक्षांतर्गत ओढाताण सुरु राहिली होती. अखेर २० ऑगस्टला या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन वराहगिरी व्यंकटगिरी हे विजयी झाले. रेड्डींच्या आणि त्यांच्या मतांतील अंतर तसं कमी होतं. पण रेड्डी पराभूत ठरले होते. या निवडणुकीमुळे सिंडिकेटचे पाठीराखे खवळले आणि दुस-याच दिवशीं ७० काँग्रेस-खासदारांनी निजलिंगप्पांना भेटून पंतप्रधान इंदिराजी जगजीवनराम आणि फक्रुद्दीन अलि अहंमद यांची पक्षांतून हकालपट्टी करावी अशी मागणी केली. त्या निवडणुकींतील काँग्रेस-उमेदवाराच्या पराभवास हे सर्वजण कारणीभूत आहेत असा त्यांचा आरोप होता. शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत निजलिंगप्पा हे आतुर बनलेलेच होते. त्यामुळे त्यांना अधिक कांही समजून सांगण्याची गरजच नव्हती. कामराज आणि मोरारजी देसाई यांनी त्यांना तशी फूस होतीच.

दुस-या गोटांत मात्र निराळंच कांही घडत होतं. पंतप्रधानांच्या पाठीराख्यांनी २४८ काँग्रेस-खासदारांनी २३ ऑगस्टला काँग्रेसचे माजी अध्यक्ष डी. संजीवय्या यांच्या निवासस्थानीं एक बैठक घेऊन इंदिरा गांधींच्या नेतृत्वास आपला पाठिंबा व्यक्त केला. पंतप्रधानांनी काँग्रेसला नवी दिशा दाखवून पक्षाची उंची वाढवली आहे आणि सामाजिक व आर्थिक कार्यक्रमाच्या दृष्टीनं पक्ष आणि जनता यांतील अंतर कमी केलं आहे, असं मत या बैठकींतील ठरावांत व्यक्त करण्यांत आलं.

गिरी विजयी झाल्यानंतर मात्र पक्षांतर्गत समोरासमोर सुरू झालेल्या ओढाताणीमुळे दोन्ही गोटांत अस्वस्थता माजली होती. पक्ष दुभंगण्याची धास्ती सर्वांनाच वाटूं लागली होती; परतु पक्षांतील ऐक्य टिकवण्यापेक्षा पक्षांत शिस्त निर्माण करण्याच्या काळजीनंच सिंडिकेटला पोखरलं होतं. त्यांतूनच मग पंतप्रधान आणि त्यांचे दोन सहकारी जगजीवनराम व फक्रुद्दीन अलि अहंमद यांच्याविरुद्ध करायच्या कारवाईचं स्वरूप कोणतं असावं याची चर्चा करण्यासाठी निजलिंगप्पा यांनी २५ ऑगस्टला कार्यकारिणीची बैठक आयोजित केली.

प्रक्षोभक वातावरणांतच ही बैठक त्या दिवशी सुरू झाली. पंतप्रधानांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यांत येणार, असेच अंदाज अगोदर व्यक्त होत राहिले होते.  निजलिंगप्पा यांचं प्राथमिक स्वरुपाचं बोलण सुरू होऊन आता मुख्य विषयावर चर्चा सुरू होणार तोंच यशवंतराव पुढे सरसावले. सभासदांना उद्देशून त्यांनी आवाहन केलं की, आपण एवढ्या संकटाच्या परिस्थितींतून गेल्यानंतर, आता तरी निदान सर्वांनी एकत्र यावं यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यशवंतरावांनी हें आवाहन केलं खरं, पण एकत्र येण्याचा मार्ग काढायचा तयारींत होते. त्यांनी ठरावाचा एक मसुदाच तयार ठेवला होता. कार्यकारिणीसमोर तोच त्यांनी वाचून दाखवला.

या ठरावांत कोणाला बोट शिरकवतां येईल अशी त्यांत जागाच ठेवण्यांत आली नव्हती. स.का. पाटील यांनी सुद्धा 'ठराव ठीक आहे' असं म्हटलं. परंतु लगेच एक पुस्ती जोडली की, काँग्रेस-अध्यक्षांनी जनसंघ आणि स्वतंत्र पक्ष यांच्याशीं चर्चा केल्याबद्दल जे दोषारोप केले गेले आहेत त्याचा कार्यकारिणीनं परामर्श घेतला पाहिजे. कांही सदस्यांनी लगेच या सूचनेला उचलून धरलं. त्यावर चर्चा होऊन अखेरीस विरोधी पक्षाशीं चर्चा करण्यामागे अध्यक्षांचा कांही खास हेतु नव्हता असं गृहीत धरून, त्यांना मग दोषमुक्त ठरवण्यांत आलं. त्यानंतर यशवंतरावांनी सादर केलेल्या ठरावांत किरकोळ एक-दोन शब्दांचा बदल करून त्यासहि एकमतानं मान्यता देण्यांत आली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org