इतिहासाचे एक पान. ३१७

निजलिंगप्पा यांचं यावर उत्तर असं मिळालं की, निवडणुकांच्या वेळीं सर्वच मतदारांशी आपणांस संपर्क ठेवावा लागतो. त्याच्याहि पुढे त्यांचं म्हणणं असं की, विरोधकांचा पाठिंबा मिळवण्याचा हेतु, काँग्रेस-पक्षांत कांही फाटाफूट अपेक्षित आहे म्हणून नव्हे तर निवडणुकीबाबत दक्ष राहिलं पाहिजे म्हणूनच विरोधकांशी चर्चा करण्यांत आली आहे. काँग्रेसमध्ये कांही दुफळी निर्माण झाली आहे किंवा नजीकच्या काळांत तशी ही होईल असं वाटत नाही.

या सर्व गोंधळाच्या, राजकीयदृष्ट्या अनिश्चिततेच्या आणि पक्षनिष्ठेला तडागेलेल्या वातावरणांत यशवंतरावांचं मन संदिग्ध अवस्थेत हेलकावे खात राहिलं होतं. त्यांतच १२ ऑगस्टला कामराज यांनी यशवंतरावांना बोलावून घेतलं आणि त्यांचा रेड्डींना पाठिंबा मिळवण्याच्या संदर्भांत बोलणीं केलीं. यशवंतरावांनी रेड्डींना आपला पाठिंबा असल्याचं त्यांना सांगितलं; परंतु त्याचबरोबर काँग्रेसमधील दोन्ही गटांनी यासाठी एकत्र राहून दुफळी टाळण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. यशवंतरावांनी त्याच दिवशी इंदिरा गांधी यांचीहि भेट घेतली आणि रेड्डी यांना दिलेलं आपलं वचन कायम असल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर पक्षांतर्गत निर्माण झालेला तंटा नाहीसा होण्याच्या दृष्टीनं कांही मार्ग शोधून काढा, असंहि त्यांनी इंदिराजीना सुचवलं.

परंतु या निवडणुकीनंतर पंतप्रधानपदावरून आपल्याला हुसकून लावण्याचा सिंडिकेटचा पक्का निर्णय झालेला आहे याबद्दल इंदिराजींची खात्री झाली होती. त्यांनी मग १३ ऑगस्टला निजलिंगप्पांना एक पत्र लिहून, काँग्रेस -अध्यक्षांनी जनसंघ आणि स्वतंत्र पक्षांशीं संधान बांधल्यानं, निरनिराळ्या राज्यांतील काँग्रेस-आमदारांमध्ये कमालीची चीड निर्माण झालेली असून, पक्षानं संजीव रेड्डी यांच्या उमेदवारीला दिलेल्या मान्यतेला आता कांही अर्थ उरलेला नाही असं कळवून टाकलं.

त्यानंतरहि या दोघांमध्ये पत्रापत्री होत राहिली. १५-१६ ऑगस्टच्या पत्रांत तर मतदारांना या निवडणुकींत कुणाला मतदान करायचं यासंबंधी मोकळीक असावी अशी मागणी पंतप्रधानांनीच केली. निजलिंगप्पांनी या मागणीबाबत खेद व्यक्त केला. पंतप्रधानांना पाठवलेल्या उत्तरांत त्यांनी असंहि नमूद केलं की पंतप्रधानांनी आपल्या पक्षातर्फे निश्चित केलेली उमेदवारी मान्य करून उमेदवारी-अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी केल्यानंतर, त्यांनीच विरोधी उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं उदाहरण इतिहासांत कधी घडलेलं नाही.

पक्षांतर्गत अशी ही झटापट सुरु असतांनाच १६ ऑगस्ट हा राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा दिवस उगवला आणि त्या दिवशीं दिल्लींतील लोकसभाभवनांतील सेंट्रल हॉलमध्ये आणि अन्य १७ राज्यांत मतदान पार पडलं.

मतदान संपतांच निरनिराळ्या राज्यांतील मतदान जाणून घेण्यासाठी निजलिंगप्पा व्यग्र बनले. सिंडिकेटच्या कार्यालयांत त्या संध्याकाळीं, आनंदाचं वातावरण पसरलं होतं. 'आम्ही जिंकली' हाच त्यांच्या चेह-यावरील भाव होता. सायंकाळी ६ वाजतां तर निजलिंगप्पा यांनी पुढचे बेत आखण्याच्या दृष्टीनं मोरारजी देसाई, स.का. पाटील, अतुल्य घोष, कामराज आणि चव्हाण यांना एका खास बैठकीसाठी पाचारण केलं; परंतु यशवंतराव या बैठकीसाठी उपस्थित राहिले नाहीत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org