इतिहासाचे एक पान. २९२

गृहमंत्री या नात्यानं, देशांत यशवंतरावांची प्रतिमा पोलादी पुरुष अशी जरी निर्माण झालेली होती, तरी पण ते स्वतः मात्र मनांतून समाधानी नव्हते. यशवंतरावांचा मुळचा पिंड हा वैचारिक असल्यानं, देशांत असंतोषाचं, गोंधळाचं वातावरण जें निर्माण होत रहातं त्याच्या कारणांचा मूलभूत शोध घेतला पाहिजे, असं त्यांचं मन त्यांना सांगूं लागलं. असंतोष निर्माण झाला, दंगल झाली किंवा एखादी चळवळ सुरू झाली, तर केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामापुरतंच त्यांना आपलं लक्ष केंद्रित करतां येणं शक्य नव्हतं; तो त्यांचा पिंड नव्हता. त्या अर्थानं विचार केला, तर यशवंतरावांसारख्या वैचारिक नेत्याच्या कामाचं क्षेत्र गृहमंत्रालय हें नव्हंतंच! गृहमंत्रालयांत काम करतांना मनाचा एक वेगळाच पिंड बनवावा लागतो. यशवंतरावांचा मनःपिंड हा प्रत्येक घटनेकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनांतून पहाण्याचा आणि त्याचं विश्लेषण करण्याचा असाच बनलेला असल्यानं, गृहमंत्री म्हणून काम करतांना हा दृष्टीकोन बदलणं त्यांना कठीण होतं. त्यामुळे देशांत घडून गेलेल्या आणि घडणा-या प्रत्येक घटनेची मीमांसा त्यांनी आपल्या मनाशीं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून तर केलीच, शिवाय त्याच्या सामाजिक परिणामांचा विचारहि त्यांनी केला. प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशीं जी सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीची कारणपरंपरा होती त्याचा शोध त्यांनी घेतला आणि त्यांतून निघालेल्या निष्कर्षावर त्यांनी आपलं धोरण ठरवलं आणि तें राबवलं.

यशवंतरावांना या पद्धतीनं अभ्यास करण्याची गरज भासली याचं कारण उघड होतं. पूर्व-बंगालमध्ये १९६७ मध्येच शेतीच्या प्रश्नावरून नक्षलवाद्यांनी आंदोलन आरंभल होतं. डाव्या कम्युनिस्टांनी या आंदोलनाचं मार्गदर्शन १९६६ पासून सुरू ठेवलं होतं. १९६७ च्या निवडणुकीनंतर डाव्या कम्युनिस्ट पक्षानं हें भयंकर आंदोलन प्रत्यक्ष सुरू करण्याचा निर्णय केला. या निवडणुकीनंतर काँग्रेस सरकारच पूर्व बंगालमध्ये सत्तेवर येईल अशी त्यांची अटकळ होती. परंतु आश्चर्य असं घडलं होतं की, त्या निवडणुकीच्या निकालानं, डाव्या कम्युनिस्ट पक्षाचाच तिथल्या सरकारांत वांटा निर्माण झाला होता. तरी पण कलकत्त्यांतील डाव्या कम्युनिस्ट पक्षांतल्या नेत्यांच्या मनाविरुद्ध जाऊन दार्जिलिंग जिल्ह्यांतील सिलीगुरी भागांत नक्षलवाद्यांनी उठाव केला. अतिडाव्यांच्या या आंदोलनानं त्या काळांत ‘नक्षलाइट’ असा एक नवा शब्दच शब्दकोशांत दाखल केला. नक्षलवाद्यांनी चीनशीं जवळीक साधली होती आणि त्यांच्या दंगलीचं, चळवळीचं तंत्रहि चिनी पद्धतीचंच होतं. भारताच्या सीमा-भागांत त्यांनी ती चळवळ वाढवल्यानं त्याला मग राजकीय महत्त्व प्राप्त झालं.

१९६७ मध्ये नक्षलवाद्यांच्या चळवळीला सशस्त्र बंडाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. ज्या भागांत ही चळवळ सुरू होती तिथे भूमिहीन शेतकरी, आदिवासी यांचीच वस्ती अधिक होती. त्या भागांतले जमीनदार या लोकांना शेतीसाठी लागणारं बीं-बियाणं, बैल, अवजारं, पोटाला अन्न वगैरे देत असत; परंतु शेतांत तयार झालेलं पीक मात्र स्वतः घेऊन जात असत. ७० टक्के तयार पीक हें जमीनदारच नेत असत. नक्षलवाद्यांनी हा प्रश्न हातांत घेतला आणि जमिनदारांकडील जमिनी काढून घेऊन त्यांनी त्या भूमिहीन शेतक-यांना वांटण्याला सुरुवात केली.

त्यांतून २ मार्च १९६७ ला पहिली ठिणगी पडली. याच दिवशीं पूर्व-बंगालमध्ये डावे कम्युनिस्ट सत्तेवर आले होते. मे महिन्यांत या चळवळीनं उग्र रूप धारण केलं. पोलिस आणि भूमिहीन शेत-मजूर यांच्यांत चकमकी सुरू झाल्या आणि पहिल्याच दिवशीं एक पोलिस व सात आदिवासी ठार झाले. एवढं घडतांच त्या भागांतील कायदा आणि सुव्यवस्थाच संपुष्टांत आली आणि सर्वत्र अनागोंदीचं साम्राज्य सुरू झालं.

त्या पुढच्या दोन महिन्यांत तर पूर्व-बंगालचे मुख्य मंत्री अजय मुखर्जी यांनीच असमर्थतता प्रगट केली. अति डाव्यांनी आता दहशतीचं साम्राज्य सुरू केलं होतं आणि दहशतीनं, गुंडगिरीनं भल्याभल्यांना शरणागति पत्करायला लावली जात होती. नक्षलबारीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला असल्याचं यशवंतरावांनीहि नंतर लोकसभेंत सांगितलं आणि कुठल्याहि परिस्थितींत सरकार ही बंडाळी काबूंत आणील असं आश्वासन दिलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org