इतिहासाचे एक पान. २९१

१९६९ च्या सप्टेंबरमध्ये, गुजरातमध्ये अहमदाबादला दहा दिवस दंगल घडवून एक वेगळाच उच्चांक गाठण्यांत आला. अहमदाबादच्या दंगलींत ५०३ लोक ठार झाले आणि चार ते पांच कोटींची मालमत्ता भस्मसात झाली. १९६९ सालं हें स्वतंत्र भारताच्या इतिहासांतील जातीय दंगलींनी भरलेलं असं वर्ष ठरलं. गृहमंत्रालयाच्या दप्तरांत, त्या वर्षाच्या जातीय दंगलींची जी नोंद झालेली आहे त्यानुसार त्या वर्षी देशांत जातीय दंगलींचे एकूण ५१९ प्रकार घडले असल्याचं नमूद आहे. त्या अगोदरच्या वर्षापेक्षा दंगलींचं प्रमाण हें या वर्षी ५० टक्य्यांनी वाढलं. गुजरात, बिहार, पूर्व-बंगला, मध्यप्रदेश, केरळ, ओरिसा आणि उत्तर-प्रदेश या राज्यांना त्याची सर्वात अधिक झळ बसली.

या सर्व ठिकाणच्या जातीय दंगलीमागे जातीयवादी राजकीय पक्षांची एक विशिष्ट वृत्ति होती असं या सर्व घटनांचं विश्लेषण यशवंतरावांनी त्या वेळीं केलेलं आहे. देशांत जातीय तणाव निर्माण करून तो वाढवत ठेवण्यास जनसंघ हा प्रामुख्यानं जबाबदार असल्याचंहि त्यांनी सांगितलं. मुस्लिम धर्माचे लोक हे राष्ट्रद्रोही आहेत किंवा कमी राष्ट्रवादी आहेत, असा प्रचार जनसंघीयांनी सुरू ठेवला होता आणि मुस्लिमांचं भारतीकरण करावं यासाठी आघाडी उघडली होती. यशवंतरावांनी लोकसभेंतील चर्चेच्या वेळीं या वृत्तीचा परखडपणें समाचार घेतला. जनसंघाचे नेते बलराज मधोक यांनी ‘भारतीकरण’ या विषयावर एक पुस्तक लिहिलं होतं. त्याचाही उल्लेख यशवंतरावांनी केला आणि हा सारा प्रकार, इतिहासाचे विकृत चित्र निर्माण करण्याचा व्यर्थ प्रयत्न असल्याचं सांगितलं.

देशांतील जातीय दंगली अजूनहि शमल्या नव्हत्या. १९७० च्या मेमध्ये महाराष्ट्रांत भिवंडी आणि जळगांव या ठिकाणीं दंगल माजली. यशवंतरावांनी या दोन्ही गावांना भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. नंतरच्या काळांत तर देशांत ज्या ज्या ठिकाणीं जातीय दंगली झाल्या त्या सर्वच राज्यांत त्यांनी दौरे केले. केंद्रीय मंत्र्यानं, अशा कामासाठी दौरा करण्याचं त्या वेळीं प्रथमच घडलं.

जातीय दंगलीप्रमाणेच यशवंतरावांना आपल्या कारकीर्दीत आणखी एका समस्येला तोंड द्यावं लागलं. जातीयवादी भयंकर वृत्तीप्रमाणेच त्या काळांत, प्रांतवादाचं आणि भाषिकवादाचं भूत उठलं होतं. आसाम, बंगाल, ओरिसा आणि महाराष्ट्र या ठिकाणीं ह्या प्रांतवादांतून दंगली उसळल्या. महाराष्ट्रांत त्या काळांत शिवसेनेनं एक आगळीच चळवळ सुरू केली. ‘महाराष्ट्र हा फक्त महाराष्ट्रीय लोकांचा’ अशी त्यांची घोषणा होती आणि नोक-या असोत किंवा अन्य कोणत्या सोयी-सवलती असोत, त्या महाराष्ट्रांतील लोकांनाच अग्रहक्कानं मिळाल्या पाहिजेत या मागणीसाठी त्यांनी चळवळ आरंभली. या चळवळीला पुढे विकृत स्वरूप प्राप्त करून देऊन त्यांनी लुटालूट, जाळपोळ आदि मार्गाचा अवलंब केला.

इतकं घडतांच यशवंतरावांनी शिवसेनेच्या या प्रादेशिक, प्रांतीय वृत्तीवर कडाडून हल्ला चढवला. शिवसेनेवर उघडपणानं टीका करणारे, यशवंतराव हेच पहिले काँग्रेस-पक्षीय नेते होत. शिवसेनेची चळवळ ही हुकूमशाही वृत्तीची द्योतक आहे, असंच त्यांनी सांगितलं.

मुंबईतल्या एका सभेंत यशवंतरावांनी शिवसेनेवर झोड उठवलीच, शिवाय लोकसभेंतहि आपली भूमिका स्पष्ट केली आणि महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र काँग्रेसयांच्यापैकी कोणाचाहि शिवसेनेच्या हुकूमशाहीला आधार नाही, हेंहि स्पष्ट केलं. भिवंडी आणि कल्याण येथील जाती दंगलींना शिवसेनाच जबाबदार असल्याचं त्यांनी पुढे मुंबईतल्या एका जाहीर सभेंत स्पष्टपणें सांगितलं. भारताच्या मूलभूत भूमिकेशीं विसंगत आणि मानवतेच्या मूल्यांशींच शिवसेनेचा हा पवित्रा आहे असं त्यांचं मत होतं.

यशवंतरावांच्या टीकाकारांनी दिल्लींत त्या काळांत एक वेगळीच कुजबूज सुरू ठेवली होती. यशवंतराव हे शिवसेनेचे पाठीराखे आहेत अशी ती कुजबूज होती. शिवसेनेच्या प्रवृत्तीचे ते कट्टर विरोधक आहेत याची मुंबईतील लोकांना चांगली जाण होती; परंतु यशवंतरावांची दिल्लींतली प्रतिष्ठा आणि स्थान हें ज्यांना खुपत होतं त्यांनी त्यांची बदनामी करण्यासाठी म्हणून अशा खोट्या प्रचाराचा आश्रय घेतला होता. शिवसेनेच्या संदर्भात त्यांनी जाहीर सभांतून जे विचार व्यक्त केले होते किंवा शिवसेना-प्रमुख यशवंतरावांच्यासंबंधी जाहीर सभांतून जे बोलत होते ते सर्व, यशवंतरावांचा दृष्टीकोन सिद्ध करण्यास वस्तुतः पुरेसं होतं; परंतु पत्रकारांनीहि त्या काळांत यशवंतरावांवर अन्याय केला. शिवसेनेच्या विरोधी ते ज्या वेळीं बोलले ते पत्रकरांनी महत्त्वाचं मानलं नाही, परंतु लोकसभेमध्ये, शिवसेनेच्या संदर्भात यशवंतरावांवर टीका करणारं जें बोललं गेलं त्याला मात्र पत्रकारांनी प्रमुख स्थान दिलं. यशवंतरावांचं हे दुर्दैव म्हटलं पाहिजे!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org