इतिहासाचे एक पान. २८५

परंतु अमृतसरमध्ये यशवंतरावांच्या मताचा अर्थ कसा लावला गेला असेल तो असो; नंतरच्या दहाच मिनिटांत, दिल्लीला बातमी येऊन धडकली की, सरकारनं संत फत्तेसिंग यांच्या मागणीस मान्यता दिल्यानं, संत फत्तेसिंग यांनी उपोषणाची समाप्ती केली आहे!

पी. टी. आय्. च्या टेलीप्रिंटरवरून आलेलं हें वृत्त वाचून यशवंतरावांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. एवढ्या तडकाफडकी घटना घडल्या आहेत त्या अर्थी कांही तरी समजुतीचा घोटाळा झाला असला पाहिजे हें निश्चित, असंच यशवंतरावांचं मन सांगूं लागलं. अस्वस्थ मनानं त्यांनी लगेचच पंजाबच्या मुख्य मंत्र्यांशीं संपर्क साधला आणि “नेमकं काय घडलं” अशी विचारणा केली. त्यावर “मी समक्ष येऊनच सांगतो” एवढंच मुख्य मंत्र्यांनी सांगितलं.

दुस-या दिवशीं मुख्य मंत्री ग्यानी गुरुमुंखसिंग मुसाफिर यशवंतरावांना भेटले.

“फोनवर तुम्हांला मीं जे सांगितलं तें तुम्ही बरोबर ऐकलंत ना?” – यशवंतरावांनी मुख्य मंत्र्यांना विचारलं.

“तुमचं म्हणणं मी नीटपणानं ऐकलं ....पण त्यांना सांगतांना दुसरंच सांगितलं – खोटं सांगितलं” – मुख्य मंत्री. शिखांचं म्हणून जें कांही राजकारण असतं त्यामध्ये असं करावं लागतं असा खुलासाहि मुख्य मंत्र्यांनी केला आणि संत फत्तेसिंग यांनी आता उपोषणाची समाप्ती केलेली असून, आता त्या वाटेला ते जाणार नाहीत असा निर्वाळाहि दिला.

मुख्य मंत्र्यांसारख्या जबाबदार असामीकडून असं कांही घडेल याची कल्पनाहि यशवंतरावांच्या मनाला शिवली नव्हती. मुसाफिर यांना त्यांनी तसं बोलूनहि दाखवलं. यशवंतरावांना त्यांनी तसं खोटं बोलणं मान्य नव्हतं. त्यांना तें आवडलं नव्हतं म्हणून “तुम्ही कशासाठी हें केलंत?” असं मुसाफिरांना विचारलं.

“मी केलंय खरं, तुम्हांला आता माझं जें कांही करायचं तें करा. मला हवं तर फाशी द्या... परंतु पंजाबला मी एका फार मोठ्या संकटांतनं वांचवलं आहे, हें मात्र खरं.” मुसाफिर यांनी एका दमांत यशवंतरावांना ऐकवलं.

प्राप्त परिस्थितींत मुसाफिर यांना एवढंच करतां येणं शक्य असावं, असा मग यशवंतरावांनी त्यापासून बोध घेतला. सरदार हुकमसिंग यांनाहि दोषी धरण्यांत अर्थ नव्हता. सरकारनं मागण्या मान्य केल्या आहेत असं मुसाफिर यांनी सांगितलं होतं, त्यामुळे पुढची जबाबदारी आता त्यांची होती. परंतु पंजाबचं प्रकरण तूर्तास मिटलं होतं.

गृहमंत्रालयांत पोंचल्यापासूनचा पहिला संपूर्ण महिना हा असा, एकामागून एक घटनांनी आव्हान देणारा ठरला. विद्यार्थ्यांचा दिल्लीतला मोर्चा, जगद्गुरु शंकराचार्याचं उपोषण आणि संत फत्तेसिंग यांची आत्मार्पणाची प्रतिज्ञा या तीन आव्हानांना यशवंतरावांनी ज्या शर्थीनं आणि मुत्सद्देगिरीनं तोंड दिलं त्यामुळे त्यांची पक्षांतली आणि सरकारमधली प्रतिमा कमालीच तेजस्वी बनली. लोकसभेच्या दोन्ही सभागृहांत त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचं एक आगळंच दर्शन घडवलं होतं – देशांतल्या जबाबदार वृत्तपत्रांनी त्या संदर्भात त्यांची स्तुतीच केली. त्या पहिल्या महिन्यांतली परिस्थिति इतकी स्फोटक होती की, अन्य एखाद्या अगदी ‘सीझण्ड’ मंत्र्याच्याहि चिंध्या उडण्याची शक्यता होती. परंतु यशवंतरावांनी अतिशय शांतपणानं, समतोल राखून, खुबीनं पण समजूतदारपणानं सर्व परिस्थिति काबूंत ठेवली आणि या किंवा त्या बाजूनं कोणालाहि किंचितहि खळखळ करण्यास वाव ठेवला नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org