इतिहासाचे एक पान. २७९

पंतप्रधानपदाच्या वारसाच्या या चढाओढींत सर्व मुख्य मंत्र्यांनी मोठीच महत्त्वाची कामगिरी बजावली. त्या सर्वांनी अनौपचारिक बैठक घेऊन आपला संपूर्ण पाठिंबा इंदिरा गांधी यांनाच देण्याचा निर्णय केला. मोरारजींनीहि पाठिंबा मिळवण्याच प्रयत्न सुरू ठेवलाच होता. अखेर प्रत्यक्षांत जेव्हा मतदान झालं त्या वेळीं इंदिरा गांधी यांनाच प्रचंड बहुमत प्राप्त झालं आणि बहुसंख्याकांच्या सहकार्यानं इंदिरा गांधीच पंतप्रधानपदी आरूढ झाल्या.

पंतप्रधानपद हस्तगत करतांच पहिल्याच फेरींत इंदिरा गांधी यांनी आपला स्वतंत्र बाणा सिद्ध केला. केंद्रीय मंत्रिमंडळाचा त्यांनी जो संच तयार केला त्यामुळे कामराज हे कांहीसे अस्वस्थ बनले. इंदिरा गांधी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळांत नव्या रक्ताला प्रवेश दिला होता. यशवंतराव चव्हाण, सी. सुब्रह्मण्यम्, अशोक मेहता यांचाहि त्यांत समावेश होता. इंदिराजी आणि कामराज यांच्यांत पुढच्या काळांतहि, प्रसंगा-प्रसंगानं, इंदिराजींनी केलेल्या कांही महत्त्वाच्या निर्णयामुळे मतभेद रुंदावत राहिले.

पंतप्रधानपदाच्या त्या निवडणुकीच्या वेळीं यशवंतरावांनी मात्र फार मोठ्या जोखमीची आणि महत्त्वाची भूमिका बजावली हें सत्य होय. या जबाबदारींतून मोकळं होतांच त्यांनी संरक्षण-मंत्रालयाच्या दैनंदिन कामाला वाहून घेतलं.

परंतु नाट्यपूर्ण घटना घडणं हा यशवंतरावांच्या जीवनाचा विशेष आहे. संरक्षण-मंत्रालयांतलं त्यांचं काम सुरळीतपणानं सुरू असतांनाच एक दिवस त्यांना तें सोडून केंद्रीय गृहखात्याची जबाबदारी स्वीकारावी लागली. राष्ट्राच्या जीवनांत आणीबाणीचा क्षण निर्माण झाला आणि पोलादी मनगटानं परिस्थितीशीं सामना करण्याची वेळ प्राप्त झाली की त्या कामाची जबाबदारी यशवंतरावांकडे आल्याचीं उदाहरणं स्वातंत्र्योत्तर काळांत एकामागोमाग एक घडलीं आहेत. आताहि तेंच घडलं.

यशवंतराव त्या वेळीं कोचीनला, नाविकदलाचीं प्रात्यक्षिकं पहाण्यासाठी म्हणून निघाले होते. कोचीनच्या मार्गावर त्यांचा मुंबईत एक दिवस मुक्काम ठरला होता. त्यानुसार ते मुंबईत आले आणि त्याच रात्री त्यांची प्रकृति अचानक गंभीर बनली. इतकी की, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करावी लागणार होती. अल्सरचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्याच रात्रीं मग त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यांत आली.

विश्रांतीसाठी त्यांना आता मुंबईत थांबणंच क्रमप्राप्त होतं. त्यांची विश्रांति सुरू होती, परंतु दर पांच वर्षांनी होणा-या सार्वत्रिक निवडणुका समोर आल्या होत्या. त्यासाठी महाराष्ट्रांतल्या उमेदवारांची निवड करायची होती. मुंबईतल्या नरीमन पॉइंटवरील ‘रिव्हिएरा’ या त्यांच्या निवासस्थानीं ते विश्रांति घेत असल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश-काँग्रेसनं मग त्याच ठिकाणीं बैठक जमवली. उमेदवार निवडीचं हें काम ८ नोव्हेंबरपर्यंत सुरू होतं. यशवंतराव हे उमेदवार-निवडीच्या कामांत व्यग्र असतानांनाच दिल्लीहून त्यांना एक संदेश मिळाला. गृहमंत्रिपदाची जबाबदारी यशवंतरावांनी स्वीकारावी असा पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मानस असल्याचा हा संदेश होता.

सरंक्षणमंत्रिपद स्वीकारण्याचा संदेश पूर्वी त्यांना असाच फोनवरून मुंबईत मिळाला होता. आता चार वर्षांनंतर, गृहमंत्रिपद स्वीकारण्याबाबतहि तसंच घडलं. या दोन्ही घटनांमधील साम्य मोठं विलक्षण आहे. संरक्षणमंत्रिपद यशवंतरावांनी सांभाळावं अशी खुद्द पंतप्रधान पं. नेहरूंची इच्छा असूनहि, त्या वेळीं टी. टी. कृष्णम्माचारी आणि बिजू पटनाईक यांनी त्यास खो घालण्याचा प्रयत्न केला. आताहि पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मानस स्पष्ट असतांहि स. का. पाटील यांनी हें घडण्यास कट्टर विरोध दर्शवला, तर पंतप्रधानांना कामराज यांची समजूत पटवून त्यांचा विरोध शांत करावा लागला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org