इतिहासाचे एक पान. २७८

प्रकरण - २२
----------------

शांततेचा करार करून यशवंतराव दिल्लीला परतले तेव्हा त्या वेळचे गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांनी शास्त्रीजींच्या पश्चात् त्यांची पंतप्रधानपदाचीं सूत्रं हंगामी स्वरूपांत स्वीकारलीं होती. हंगामी पंतप्रधान म्हणून पंतप्रधानपदाच्या गादीचे आपणच आता खरे वारस आहोंत अशी त्यांची मनोमन भावना निर्माण झाली होती.

परंतु त्याच वेळीं पंतप्रधानपदावर मोरारजी देसाई हेहि डोळा ठेवून आहेत याची त्यांना कल्पना नसावी. पं. नेहरूंच्या देहावसानानंतर मोरारजींची संधि हुकली होती. त्यामुळे आता ते हें सर्वोच्चपद हस्तगत करण्यासाठी टपून होते. त्यांना ही संधि हातची घालवायची नव्हती. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली.

के. कामराज हे त्यावेळीं अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. शास्त्रीजींच्या निधनाचं वर्तमान येतांच त्यांनी भावी पंतप्रधानपदाच्या संदर्भात विचारविनिमय सुरूहि केला होता. मद्रासमध्येच त्यांनी आपल्या सहका-यांना चर्चेसाठी बोलवलं होतं.

पंतप्रधानपद हें इंदिरा गांधी यांच्याकडे सोपवावं असं मत कामराज यांनी आपल्या सहका-यांना सांगूनहि ठेवलं होतं. तसा पुढेमागे कांही प्रसंग निर्माण झाल्यास इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदावरून दूर करण्यास विशे, कष्ट पडणार नाहीत, असा कामराज यांचा इंदिरा गांधींची निवड करण्यामागील हेतु होता.

पंतप्रधानपदासाठी त्या वेळी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण आणि मोरारजी देसाई या नांवांची चर्चा मग होत राहिली. यशवंतरावांची प्रतिमा त्या वेळीं खूपच उंचावली होती; परंतु कामराज यांची अशी समजूत झाली होती की, यशवंतराव चव्हाण हे पोलादी पुरुष असून, काँग्रेस कार्यकारिणीच्या सल्ल्याचा ते सर्वकाळ आदर करतीलच असं नव्हे. तरी पण, महाराष्ट्राचे त्या वेळचे मुख्य मंत्री वसंतराव नाईक यांनी आपल्या मनानं चव्हाण यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली होती. तें घडवण्यसाठी इतरांचं साहाय्य मिळवण्याचाहि त्यांनी मनापासून प्रयत्न सुरू ठेवला.

दरम्यान या निवडणुकींतले दोन प्रतिस्पर्धी, इंदिरा गांधी आणि यशवंतराव यांच्यांत आपसांत चर्चा होऊन दिलजमाई झाली. यशवंतरावांनी त्यांना आपली भूमिका स्पष्टपणें, मोकळ्या मनानं सांगितली की, पंतप्रधान बनण्याची तुमची इच्छा असेल आणि अन्य नेते मंडळी त्या बाबतींत सहकार्य देत असतील, पाठिंबा देणार असतील, तर मी स्वतः या निवडणुकीच्या मैदानांतून बाजूला आहे असं निश्चित समजा. इतकंच नव्हे तर, माझीं सर्व मतं तुम्हांलाच मिळतील. इंदिरा गांधी यांनी हें सर्व ऐकलं आणि त्या शांत राहिल्या. या चर्चेच्या वेळीं त्यांनी, यशवंतरावांप्रमाणे आपली स्वतःची भूमिका सांगितली नाही किंवा यशवंतराव ती निवडणूक लढवणार असतील, तर आपलाहि हाच पवित्रा राहील, असा शब्द उच्चारला नाही.

यशवंतरावांचा आपल्याला संपूर्ण पाठिंबा आहे याची मात्र इंदिराजींना खात्री झाली आणि त्यांनी तसं पत्रकारांना सांगितलंहि. आम्ही दोघे एकमेकांच्या विचारानंच पावलं टाकीत आहोंत असंहि त्यांनी स्पष्ट केलं. एक गोष्ट मात्र स्पष्ट होती की, यशवंतरावांचा सर्वतोंपरी पाठिंबा मिळाल्यानं इंदिराजींचा मार्ग आता बराचसा मोकळा झाला होता. सिंडिकेट काँग्रेसचे नेते मात्र, विशेषतः अतुल्य घोष यांचा इंदिराजींना मुळईच पाठिंबा नव्हता. कामराज यांनी मात्र या वेळीं मोठीच कामगिरी बजावली. सिंडीकेटमधल्या नेत्यांचा विरोध असूनहि संसदीय काँग्रेस-पक्षाचा आणि निरनिराळ्या राज्यांतल्या काँग्रेसच्या मुख्य मंत्र्यांचा पाठिंबा त्यांनी इंदिरा गांधींच्या पाठीशीं उभा करण्यांत यश मिळवलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org