इतिहासाचे एक पान. २७७

पंडित नेहरूंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन १९६२ च्या नोव्हेंबरमध्ये यशवंतराव दिल्लीला दाखल झाले आणि त्यांनी संरक्षणमंत्रिपदाचीं सूत्रं स्वीकारलीं तो काळ देशाच्या दृष्टीनं आणीबाणीचा, संकटानं व्यापलेला असा होता. देशभक्तीशिवाय आपली अन्य कुठलीहि पात्रता नाही असं त्यांनी, नेहरूंना नम्रपणानं सांगितलं होतं. परंतु पं. नेहरूंनी विश्वासानं जी जबाबदारी सोपवितांच ते दिल्लींत दाखल झाले होते. आणि दिल्लीला पोंचल्यावर प्रारंभींच्या कांही महिन्यांत दिल्लीला ज्या घडामोडी झाल्या त्यामुळे मात्र ते बेचैन बनले होते.

परंतु संरक्षणखात्याच्या कारभारांत, यंत्रणेंत आणि प्रत्यक्ष लष्करामध्येहि आपण कांही इष्ट असे बदल घडवूं शकतों, वातावरणांत बदल करूं शकतों असं तिथे प्रत्यक्ष काम करतांना जेव्हां अनुभवास येऊं लागलं त्या वेळीं मात्र त्यांच्या ठिकाणीं आत्मविश्वास निर्माण झाला; त्यांचं मन स्थिर बनलं आणि त्यामुळे त्यांच्या हातून राष्ट्राला अभिमान वाटावा अशी सेवा घडली. देशाचं संरक्षण तर त्यांनी केलंच, पण त्याचबरोबर सेना आणि समाज यांमधील अंतर सांधणारा आणि सेना आणि समाज यांमध्ये सामरस्य निर्माण करणारा, ते दुवा ठरले.

संरक्षणमंत्री म्हणून जबाबदारीनं काम करतांनाच त्यांना भारताच्या आत्म्याचं दर्शन घडलं आणि भारतालाहि यशवंतरावांच्या हिमतीचा, कर्तृत्वाचा आणि राष्ट्रनिष्ठेबद्दलचा शोध लागला. संरक्षणखात्यांत यशवंतरावांनी चार वर्षे अहोरात्र व्यतीत केलीं; आणि १९६६ च्या नोव्हेंबरमध्ये, राष्ट्राची गरज म्हणून अधिक महत्त्वाच्या कामाचीं सूत्रं – गृहमंत्रिपदाचीं  सूत्रं स्वीकारण्याचा प्रसंग निर्माण झाला तेव्हा, जवानांची व आपली आता प्रत्यक्ष ताटातूट होणार म्हणून त्यांचं मन वियोगाच्या, दु:खाच्या भावनेनं भरून गेलं.

यशवंतराव हे भावनाप्रधान आहेत. संरक्षणखात्यांतील त्या चार वर्षांनी त्यांच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांत मोलाची भर घातली होती. संरक्षणमंत्रालयाचा त्यांनी निरोप घेतला तो असा भरल्या मनानंच !

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org