इतिहासाचे एक पान. २७६

परंतु युद्धसमाप्तीबरोबरच भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनाचीहि समाप्ति होईल, शत्रु-राष्ट्राशीं शांततेचा सलोखा करत असतांना ते स्वत:च चिरशांततेंत विलिन होतील याची कुणालाहि कल्पाना नव्हती. तथापि नियतीचा न्याय कांही वेगळाच !

शांतता-करारावर सह्या झाल्यावर शास्त्रीजींनी पाहुण्यांसमवेत रात्रीं खाना घेतला आणि विश्रांतीसाठी ते आपल्या दालनांत पोंचले. १० जानेवारीची ती रात्र. शास्त्रीजी विश्रांति घेत होते. दुस-या दिवशीं त्यांना भारताच्या राजधानीकडे – दिल्लीकडे निघायचं होतं. परंतु काळाच्या मनांत कांही निराळंच होतं. त्यांना आपल्या साम्राज्यांत घेऊन जाण्यासाठी काळ त्यांच्या दालनांत अगोदरच पोंचला होता आणि नेमक्या क्षणाची वाट पहात थांबला होता. तो विविक्षित क्षण येतांच काळानं त्यांना अलगद उचललं ! हृद्यविकाराचा झटका येण्याचं निमित्त !!

शास्त्रीजींच्या समवेत यशवंतरावहि ताश्कंदमध्ये त्या वेळीं होते. शास्त्रीजींच्या दालनापासून थोड्याफार अंतरावरील दुस-या दालनांत ते रात्रीच्या वेळीं विश्रांति घेत होते. शास्त्रीजी अस्वस्थ आहेत असं त्यांना समजतांच ते शास्त्रीजींच्या दालनांत कांही मिनिटांतच पोंचलें. परंतु तोंपर्यंत सारं संपलं होतं. काळानं आपला हेतु साधाला होता. शास्त्रीजींच्या निष्प्राण पार्थिव देहाचंचं दर्शन यशवंतरावांना झालं.

घनघोर युद्धांत शत्रूवर विजय मिळवणारे शास्त्रीजी काळावर मात्र विजय मिळवूं शकले नाहीत. आजवर कुणालाच तो मिळवतां आलेला नाही !

शास्त्रीजींचं देहावसान, भारताच्या बाहेर, रशियांत ताश्कंदमध्ये व्हावं असंच त्यांच्या ललाटावर लिहिलं गेलं असल्यास न कळे ! पण तसं आता घडल होतं. सा-या जगालाच त्यामुळे धक्का बसला. भारत आणि भारतांतील जनता तर दु:खावेगानं कोसळली. या जनतेला आता शास्त्रीजींच्या पार्थिव देहाचंच दर्शन घ्यावं लागणार होतं.

शास्त्रीजींचा पार्थिव देह विमानांत ठेवून मग यशवंतराव भारतांत परतले. त्यांचा जिवाभावाचा मित्र, आणि ज्यांच्या सहवासांत, स्नेहभावानं, आत्मीयतेनं राष्ट्रासाठी काम केलं असा ‘माणूस’ असलेला भारताचा सुपुत्र हरपला होता. युद्धांतल्या विजयाचा आनंद शास्त्रीजी आपल्याबरोबर घेऊन गेले होते. मागे राहिल्या फक्त आठवणी ! भारतीयांना आता त्यावरच अश्रु ढाळावे लागणार होते.

भारताचे समर्थ संरक्षणमंत्री म्हणून यशवंतरावांची प्रतिमा या युद्धाच्या निकालानं उजळ बनली होती आणि त्यांना अमाप लोकप्रियता लाभली होती. लष्करांतले अधिकारी आणि जवान यांचं नेतृत्व त्यांनी ज्या आपुलकीनं केलं त्यामुळे यशवंतरावांबद्दल त्या सर्वांच्या अंत:करणांत सार्थ अभिमानाच्या भावना होत्या. युद्धसमाप्ती नंतर लष्करांतील जवानांसाठी अधिकाधिक सुखसोयी निर्माण करून देण्याचा आणि त्यांच्या हातीं अत्याधुनिक शस्त्रास्त्रं देण्याचा निर्णय त्यांनी केल्यामुळे तर जवानांच्या मनांत या संरक्षणमंत्र्याबद्दलचा जिव्हाळा पराकोटीचा वाढला.

लष्करांतील अधिकारी आणि जवान या सर्वांनीच युद्धकाळांत पराक्रमाची शर्थ केली होती, लष्करी डावपेंचांचं आणि राष्ट्रप्रेमाचं दर्शन घडवलं होतं. त्याबद्दल यशवंतरावांचं मनहि त्यांच्याविषयीच्या अभिमानानं भरून गेलं होतं. संरक्षणमंत्री या नात्यानं यशवंतरावांनी समग्र भारतांत सतत दौरे करून भारतीय लष्कराबद्दल लोकांमध्ये अभिमान निर्माण केला होता. प्रत्यक्ष युद्ध सुरू असतांना तर या सर्व जवानांच्या मनांत त्यांनी धर्मनिरपेक्षतेचं बीज रुजवलं. भारतीय जवानांचं राष्ट्रप्रेम आणि प्रामाणिकपणा हा संशयातीत असून या देशांत लष्कराकडून बंड होण्याची कदापि शक्यता नाही, असा यशवंतरावांनी ठाम विश्वासच व्यक्त केलेला आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org