इतिहासाचे एक पान. २७३

भारताच्या सैन्यानं, पंजाबमध्ये युद्धाची दुसरी आघाडी उघडून लोहोरच्या दिशेनं मुसंडी मारली आहे असं यशवंतरावांनी ६ सप्टेंबरला लोकसभेंत घोषित करतांच लोकसभेनं टाळ्यांचा कडकडाट करून या निर्णयाचं स्वागत केलं. त्या निर्णयानं आणि लष्करानं दाखवलेल्या मर्दमुकीनं सा-या देशांतच एक प्रकारचं चैतन्य निर्माण झालं. भारताच्या सैन्यानं आता भक्कम असा आक्रमक पवित्रा घेतला होता. स्वातंत्र्यानंतर भारतीय जनतेला त्याचं प्रथमच दर्शन घडलं होतं. त्यापूर्वी १९६२ च्या नेफाच्या लढाईंत आणि नंतर पाकिस्तानशीं झालेल्या कच्छच्या रणांतील लढाईंत देशाला असं दृश्य दिसलं नव्हतं. लष्कराच्या आक्रमक पवित्र्यामुळे मग देशांत अभिमानाचं आणि आत्मविश्वासाचं चैतन्य सर्वत्र निर्माण झालं.

लाहोरच्या रोखानं उघडलेल्या आघाडीचं उद्दिष्टहि स्पष्ट होतं. लाहोरचं संरक्षण करणा-या इचोगिल कॅनॉलचा कबजा हें तें उद्दिष्ट होतं; आणि त्याच रोखानं गुरुदासपूर अमृतसर आणि फिरोजपूर आघाड्यांची आगेकूच होत राहिली. ४७ मैल लांब, १५ फूट खोल आणि १४० फूट रुंदीचा इचोगिल कालवा म्हणजे लाहोर शहरा भोवतालचा दुर्लघ्य असा खंदकच आहे. कांही ठिकाणीं हा कालवा लाहोरपासून ९ मैल अंतरावरून वाहतो, तर कांही ठिकणीं हें अंतर तीन मैलांचंच आहे. या कालव्याच्या पूर्व-किना-यापर्यंत धडक मारण्याचं उद्दिष्ट भारताच्या सैन्याला ठरवून देण्यांत आलं होतं. लाहोंरची तीन बाजूंनी कोंडी केल्यानं, पाकच्या लष्कराचं सारं लक्ष लाहोरच्या रक्षणावरच केंद्रित होणार होत. पाकच्या उद्दाम युद्धखोरीला पायबंद बसायचा आणि त्या सैन्याची भारताच्या रोखानं सुरू असलेली धांव गोठवायची, तर भारताच्या सैन्याला आपलं उदिष्ट पूर्ण करावं लागणारच होतं. त्याच बरोबर छांबमध्ये सियालकोटचा ताबा करून पाकिस्तानचं आणखी एक आक्रमक केंद्र नेस्तनाबूत करणं हें दुसरं उद्दिष्ट ठरवण्यांत आलं होतं.

त्यानुसार ७ सप्टेंबरलाच छांबमधील सैन्यानं सियालकोटच्या रोखानं चाल केली. त्यासरशी पाकिस्तानला अखनूरच्या रोखानं उघडलेली आघाडी थांबवून, सियालकोटच्या रक्षणासाठी धांव घ्यावी लागली. परिणामीं काश्मीर गिळंकृत करण्याचं पाकचं स्वप्न उद्ध्वस्त झालं.

भारतानं लाहोरच्या रोखानं मुसंडी घेतांच आंतरराष्ट्रीय क्षेत्रांत मात्र कमालीची चिंता निर्माण होऊन धांवपळ उडाली. ब्रिटन, इराण, तुर्कस्तान, इंडोनेशिया यांनी तर भारताच्या निषेधाचा आवाज उठवला. रशिया मात्र सावध होता. त्यांनी आपली समतोल प्रतिक्रिया व्यक्त केली. पाकिस्तानवर चाल करून जातांच भारताचा निषेध करण्यासाठी सरसावलेलं ब्रिटन, पाकिस्ताननं सरळ सरळ आक्रमण केलं तेव्हा मात्र मूग गिळून स्वस्थ होतं. ब्रिटनच्या या वृत्तीबद्दल भारतांत मात्र सर्वत्र संताप निर्माण झाला.

पंजाबमध्ये आघाडी उघडून, लाहोरवर चाल करून जाण्याचा भारताच्या मुत्सद्देगिरीनं पाकिस्तान मात्र पार गडबडून गेलं, त्यांच्या तें ध्यानींमनींहि नव्हतं. भारताच्या लष्करानं आपलं सर्व सामर्थ्य पंजाबमध्ये उभं करून, दिल्लीला पोंचण्याचं पाकिस्तानचं स्वप्न धुळीला मिळवलं. इचोगिल कॅनॉलच्या काठावरील डोगराई (अमृतसर विभाग) खेमकरण, (फिरोजपूर विभाग) आणि बर्की (गुरुदासपूर विभाग) इथपर्यंत भारताच्या सैन्यानं आघाडी मारून लाहोरची तिन्ही बाजूंनी कोंडी करण्यांत यश संपादन केलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org