इतिहासाचे एक पान. २७२

पाकिस्तानला आपल्या लष्करी सामर्थ्याचा अभिमान होता. सप्टेंबरच्या ३ व ४ तारखेला त्यांनी भारतीय हद्दींत जोराची मुसंडी मारण्यांतहि यश मिळवलं होतं. शक्तिशाली अशा सेबरजेट विमानांचा वापर त्यांना केला होता. भारतानं मात्र, स्थानिक बनावटीचीं, आकारानं लहान असलेल्या नॅट विमानांचाच उपयोग केला. परंतु भारताच्या या ‘नॅट’ नी ‘लहान मूर्ति पण थोर कीर्ती’ अशी बेमालून कामगिरी बजावून सेबरजेट सारख्या महान् शक्तीच्या विमानांचा फडशा पाडला.

हें घडलं तरी पाकिस्तानची राक्षसी महत्त्वाकांक्षा संपली नव्हती. अखनूरच्या रोखानं, पाकच्या सैन्यानं सुमारे २० मैलांची आघाडी मिळवली होती. ५ सप्टेंबरला तर जुरियन या खेड्याचा कबजा करून, तें आता अखनूरच्या टप्प्यांत पोंचल होतं. अखनूरचा भाग कबजांत घेतला की त्यांचं काम होणार होतं. काश्मीरमधील सैन्याचा आणि भारताचा संबंध तोडणं हें त्यांचं उद्दिष्ट होतं. अशा प्रकारे सेनेचा संबंध तुटला की जम्मू-काश्मीर मुक्त केल्याची घोषणा करण्यास त्यांना संधि मिळणार होती. काश्मीरमध्ये ज्या हेतूनं घुसखोर पाठवले होते तो हेतु साध्य होण्याची वेळ निकट आली आहे असंच स्वप्न पाकचे लष्करी अधिकारी पाहूं लागले होते. पाकचा लष्कर प्रमुख जनरल मुसा यानं तर, पाकच्या सैनिकांना चिथावण्यासाठी त्यांना सांगितलं की, “पहा, तुम्हीं आता भारताला चावा घेतला आहे. तुम्हांला आता, भारताचा संपूर्ण पाडाव करण्यासाठी ही कैची आवळावी लागेल. भारताचा पराभव तुम्ही निश्चित करणार आहांत. अल्ला तुमच्या पाठींशीं आहे.”

दरम्यान चीनचे परराष्ट्रमंत्री चेन-यी यांनी ४ सप्टेंबरला कराचीला धांव घेतली, भुट्टोशीं दिवसभर चर्चा केली आणि भारताचा पाकिस्तानवरील हल्ला परतवून लावण्यासाठी चीनचं साहाय्य देण्याचं आश्वासन देऊन ते परत गेले.

चीन-पाकिस्तानची अशी हातमिळवणी झाल्यामुळे या युद्धाला मग गहिरा रंग प्राप्त झाला. युद्धाची व्याप्ति वाढत राहिल्यानं राष्ट्रसंघाचे प्रमुख ऊ-थांट हेहि अस्वस्थ बनले होते आणि युद्धाची व्याप्ति वांढू नये यासाठी दोघांनाहि परावृत्त करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता. परंतु त्यांचं कांही ऐकावं अशा मन:स्थितींत भारत आणि पाकिस्तान दोघेहि नव्हते. चीन-पाकिस्तान सांधा जुळल्यामुळे भारतांत मात्र गडबड  उडाली होती. पाकिस्तानच्या जबरदस्त युद्धपिपासूपणाबद्दल लोकांकडून आणि वृत्तपत्रांतून संतप्त प्रतिक्रिया उमटूं लागल्या. भारत सरकार आणि संरक्षणमंत्री यांना आता लोकमताची दखल घ्यावीच लागणार होती.

पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती आणि भारताच्या भूमीचा कांही मैलापर्यंत कबजा  केला होता. काश्मीरचं स्वातंत्र्य धोक्यांत आलं होतं. पाकिस्तानचं लष्कर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह पुढे झेपावत राहिलं होतं. भारताच्या मुत्सद्देगिरीची कसोटी लागण्याचीच वेळ येऊन ठेपली होती. विचार करायलाहि फारशी फुसरत नव्हती. परंतु तातडीनं निर्णय मात्र करावा लागणार होता. पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांना आता पुन्हा एकदा ऐतिहासिक निर्णय करावा लागणार होता. दिल्लींत धांवपळ उडाली होती. वरिष्ठ लष्करी अधिका-यांशीं खलबत सुरू होतं. आणि त्यांतूनच अखेर भारतानं स्वसंक्षरणार्थ कारवाई करण्याचा तो निर्णय केला. ६ सप्टेंबरला त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होतांच पाकचा सारा कटच उद्ध्वस्त झाला. ज्या सामर्थ्यांच्या जोरावर पाकिस्तान आक्रमण करण्याला उद्युक्त झालं तें सामर्थ्यहि या एका निर्णयामुळे लुळं-पांगळं होऊन पडलं. विद्युत-वेगानं भारतानं आपलीं उदिष्टं साध्य केल्यानं या युद्धाचं सारं स्वरूपच बदललं.

हा निर्णय होता लाहोरवर लष्करी दबाव आणण्याचा आणि लाहोरच्या रोखानं, समर्थपणानं आणि झपाट्यानं चाल करून जाण्याचा ! निर्णय होताच भारताच्या सैन्यानं पंजाबमधील गुरूदासपूर, अमृतसर आणि फिरोजपूर अशा तीन बाजूंनी लाहोरवर टाच् रोवली आणि गरुडभरारीनं झेप घेतली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org