इतिहासाचे एक पान. २७१

निर्णय करण्याचा क्षण आता आला होता. “आता या क्षणालाच हा निर्णय करायला हवा का?” – यशवंतरावांचा एक प्रश्न.

“हवाईहल्ला करण्याची हीच आता नेमकी वेळ आहे.” – सरसेनापति.

“ठीक आहे, द्या धडक.” – चव्हाण.

निर्णय झाला. पंतप्रधानांशीं सल्लामसलत करायला वेळच नव्हता. यशवंतरावांनी स्वतःच्या जबाबदारीवरच तो ऐतिहासिक निर्णय केला. त्या लढाईचा इतिहास असं सांगतो की, यशवंतरावांनी एका क्षणांत दिलेल्या त्या निर्णयानं, भारत हा आंतरराष्ट्रीय युद्धांत फेकला गेला. तोच हा निर्णय, की ज्यामुळे काश्मीर वांचलं आणि पाकिस्तानला भारताच्या युद्धनीतीचं दर्शन घडलं.

भारताचं हवाईदल सज्जच होतं. संरक्षणमंत्र्यांची आज्ञा मिळतांच क्षणार्धांत विमानं झेपावलीं आणि त्यांनी आपलं ईप्सित साध्य केलं. पॅटन रणगाडे जम्मूच्या रोखानं आग ओकत चालले होते. भारतीय लष्करी विमानांनी, त्या रणगाड्यांवर, तोफखान्यांवर निकराचा हल्ला चढवला आणि त्यांचा मार्ग उद्ध्वस्त करून त्यांची आगेकूच रोखली. यशवंतरावांनी आज्ञा केल्यापासून अर्ध्या तासांत, सूर्य मावळण्यापूर्वी हा पराक्रम घडून आला. सरसेनापतींनी या पराक्रमाचं महत्त्व मग संरक्षणमंत्र्यांपर्यंत पोंचवलं. ते आपल्या कार्यालयांत सचिंत बसूनच होते.

यशवंतरावांनी हवाईहल्ल्यासंबंधी केलेला निर्णय अर्ध्या तासानंतर पंतप्रधान शास्त्रींना निवेदन केला. हे दोघे नेते त्या वेळीं मनोमन एकजीव बनले होते. खेमकरण यशवंतरावांचा निर्णय शास्त्रीजींनी मग उचलून धरला आणि पुढच्या काळांत, लोकसभेंतहि त्याचं त्यांनी समर्थनच केलं.

भारताच्या हवाईदलानं, त्यांना नेमून दिलेली कामगिरी चोखपणानं बजावली हें खर; परंतु पाकिस्तानचं हवाईदलहि झोपलेलं नव्हतं. किंबहुना भारताकडून हवाईहल्ला होण्याचा अडाखा पाकनं बांधला होता. त्यामुळे भारताचीं लष्करी विमानं पॅटन रणगाड्यांवर घोंगावूं लागतांच पाकच्या हवाईदलानंहि झेप घेतली. पहिल्या दिवशीं त्या हवाई लढाईंत, परिणामी भारताला आपलीं चार विमानं गमवावीं लागलीं. युद्धाचं स्वरूप जोंपर्यंत गनिमांच्या कटकटीपुरतं मर्यादित होतं तोंपर्यंत त्या युद्धांत विमानदलाची मदत भारतानं घेणं सयुक्तिक नव्हतं. भारतानं आपली हवाईदलाची सज्जता करून ठेवलेलीच होती. परंतु प्रश्न होता त्यासाठी क्षण निर्माण होण्याचा ! पाकिस्तानचे रणगाडे आंतरराष्ट्रीय सीमा-रेषा ओलांडण्याचं धाडस करून प्रत्यक्ष काश्मीरच्या-भारताच्या भूमीवर उतरतांच, नेमका तो क्षण सरसेनापतींनी पकडला आणि संरक्षणमंत्र्यांच्या अनुमतीनं हवाईदलाचा उपयोग करण्याचा हेतु तडीस नेला.

भारतानं हवाईहल्ला करून पॅटन रणगाडे उद्ध्वस्त करतांच पाकिस्तानचे नेते संतप्त बनले. झुल्पिकारअल्ली भुट्टो यांनी आपला जिभेचा पट्टा सोडून भारताच्या संरक्षणमंत्र्यांची शाब्दिक हेटाळणी केली. यशवंतरावांनी छांबमधील भारताच्या शौर्याची माहिती लोकसभेंत निवेदन केली होती त्यामुळे तर भुट्टोंचं पित्त अधिकच खवळलं. पाकिस्ताननं युद्धाचं क्षेत्र विस्तृत बनवल्याबद्दल चव्हाणांनी त्यांना दोष दिला होता. भारताचे संरक्षणमंत्री, पाकिस्तानवर लांडग्यासारखे तुटून पडले असले, तरी पाकिस्तान म्हणजे कांही शेळी-मेंढी नव्हे, याची जाण संरक्षणमंत्र्यांनी ठेवावी अशी भुट्टो यांची दर्पोक्ति होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org