इतिहासाचे एक पान. २६९

पाकिस्तानच्या कटाचा पूर्व-सुगावा भारत सरकारला लागलेला होता. त्यामुळे पाकिस्तानचे पुढचे पवित्रे कसे पडतील याचा अंदाज बांधून कोणत्या पवित्र्यावर कोणता उतारा करायचा यांच्या विविध योजना व पर्यायी योजना आखल्या गेल्या होत्या.

गनिमांची घूसखोरी सुरू झाल्यापासून भारतांत मात्र सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली होती. लोकसभेंत आणि वृत्तपत्रांतून त्यासंबंधी तीव्र प्रतिक्रिया उमटूं लागल्या. केंद्रीय मंत्रिमंडळांतल्या कांही मंत्र्यांना आणि ज्येष्ठ लष्करी अधिका-यांना भारताच्या बाजूची संरक्षण-सिद्धतेची, प्रति-आक्रमणाच्या तयारीची माहिती होती हें खरं, परंतु सर्वसामान्य जनता मात्र चिंताग्रस्त बनली होती. नेफामध्ये पत्करलेला पराभव लोकांच्या स्मरणांत अद्याप टिकून होता आणि भारताच्या लष्कराबद्दल, अधिका-यांच्या कर्तृत्वाबद्दल लोक साशंक होते. स्वतः कृष्णमेनन यांना सुद्धा पाकिस्तानच्या आक्रमणाची धास्ती निर्माण झाली होती आणि त्यांनी ती चव्हाण यांना खाजगतांत बोलूनहि दाखवली.

ही सर्व परिस्थिति लक्षांत घेतां, देशांतल्या जनतेचं मनोधैर्य शाबूत राखण्याच्या दृष्टीनं आणि घूसखोर गनिमांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून तातडीनं कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली. स्वतः संरक्षणमंत्री आणि त्यांचे सल्लागार हेहि आता याच निर्णयाशीं पोंचले होते. आक्रमकांना थोपवण्याचा प्रभावी मार्ग म्हणून शत्रूच्या हद्दींतल्या लष्करी तळावर प्रभावी धडक देणंच आवश्यक ठरलं होतं. त्या दृष्टीनं मग चव्हाण यांनी कारगिल आणि उरि विभागांतल्या युद्धबंदी-रेषा भागाला ऑगस्टच्या दुस-या आठवड्यांत भेट देऊन पहाणी केली आणि तिथल्या पहाणीनंतर, सरहद्दीचं कडक रक्षण करण्याविषयी लष्कराला त्यांनी जरूर त्या सूचना देऊन त्यांना आवश्यक ते अधिकारहि दिले. त्यानुसार १५ ऑगस्टलाच भारतीय सैन्यानं युद्धबंदी-रेषा पार करून कारगिल भागांतली तीन प्रमुख ठाणीं हस्तगत करण्यापर्यंत मजल मारली.

पाकिस्तानचं लष्करहि स्वस्थ राहिलेलं नव्हतं. त्यांनीहि युद्धबंदी-रेषा ओलांडून जम्मू क्षेत्रांतील भीमबार भागांत प्रवेश मिळवला होता. इतकं घडतांच भारताच्या सैन्यानं टिथवाल विभागांत समर्थपणानं धडक देऊन युद्धबंदी-रेषेच्या वायव्य-भागांतली दोन अतिशय मोक्याचीं ठाणीं जिंकून घूसखोरांचा प्रमुख मार्गच बंद करून टाकला. भारताच्या लष्करानं पाकिस्तानच्या हद्दींत पांच मैल आंत असलेलं हाजी-पीर-पास हें एक महत्त्वाचं ठाणंहि मोठ्या शौर्यानं हस्तगत केलं. यशवंतरावांनी मग संसदेसमोर निर्वाळा दिला की, भारताच्या लष्करानं चढाईचं धोरण स्वीकारून त्यामध्ये चांगलं यश संपादन केलं आहे.
हाजी-पीर-पासचा कबजा केलेला असल्यानं, शत्रूसैन्याचा लष्करी हालचाली करण्याचा महत्त्वाचा मार्गच रोखला गेला आहे. भारताच्या लष्कराकडून एवढ्या प्रचंड प्रमाणांत तडाखा दिला जाईल याची पाकिस्तानला कल्पना नव्हती; परंतु हाजी-पीर-पासमधील पराभवाचा धक्का पाकिस्तानला चांगलाच जाणवला. या पराभवाचा बदला घ्यायचा तर त्यांना प्रचंड बळानिशी भारतावर चाल करून यावं लागणार होतं. अर्थात् पाकिस्ताननं कुरापती काढण्याला प्रारंभ केला तो युद्धाच्या खुमखुमीनंच केला होता. पराभवाचा फटका बसतांच त्यांनी या संधीचा फायदा घेण्याचं ठरवलं आणि पूर्वयोजनेनुसार एका संपूर्ण ब्रिगेडच्या सामर्थ्यानिशी पाकिस्तानचं लष्कर चाल करून निघालं. काश्मीरमध्ये गनीम पाठवून पाकिस्ताननं सुरू केलेल्या चकमकींना त्यामुळे आता उघड उघड या दोन देशांमधील युद्धाचं स्वरूप प्राप्त होण्याची परिस्थिति निर्माण झाली – नव्हे प्रत्यक्ष युद्धच सुरू झालं.

कारण काश्मीरच्या दक्षिण-भागांत, भीमबार-छांब हद्दींत आंतरराष्ट्रीय आघाडी ओलांडून १ सप्टेंबरला पाकिस्तानचे रणगाडे प्रत्यक्षांत दाखल झाले आणि त्यांनी हल्ला चढवला. सुमारे एक तासभर पाकिस्तानी रणगाडे आग ओकत राहिले. युद्धबंदी-रेषा ओलांडूनहि अशाच प्रकारचा हल्ला पाकच्या सैन्यानं चढवला. छांबच्या उत्तरेच्या बाजूनं, जम्मूकडे जाणा-या मार्गावर जोराचे हल्ले चढवून पाकिस्ताननं युद्धाची अशी पहिली सलामी दिली. ही चढाई एवढी जोरदार आणि समर्थ होती की, पाकिस्तानच्या दोन ब्रिगेडस् त्यामध्ये सामील झाल्या होत्या. एका ब्रिगेडमध्ये ३ हजार सैनिक होते आणि १०० रणगाड्यांच्या आधारानं हें सैन्य आगेकूच करत होतं. या १०० रणगाड्यांत अमेरिकन बनावटीचे प्रचंड शक्तीचे ७० रणगाडे होते. पाकिस्तानची ही चढाई यशस्वी झाली असती तर जम्मू आणि काश्मीर हे भारतापासून अलग पडण्याची शक्यता होती, आणि तसं घडलं असतं तर भारताचे काश्मीरमधील हजारो सैनिक अलग पडले असते, कोंडींत सापडले असते. चढाईच्या पहिल्या दिवशीं भारतीय लष्करानं १ हजार सैन्यासह शत्रुसैन्याशीं प्राणपणानं मुकाबला करण्याची शर्थ केली, परंतु शत्रूच्या प्रचंड शक्तीनं त्यांना सहा मैल मागे रेटलं. चढाईच्या पहिल्यां दिवशीं तरी पाकच्याच गळ्यांत विजयश्रीनं माळ घातली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org