इतिहासाचे एक पान. २६७

भारत-पाकिस्तान दरम्यान युद्धबंदी-रेषेचा भंग आणि पाकिस्तानच्या लष्करी कुरापती हें सातत्यानं सुरू राहिल्यानं भारतांतलं लोकमत संतप्त बनलं. भारतानं पाकच्या सरहद्दीवर लष्करी कारवाई जलद गतीनं करावी अशीच लोकांची मागणी होऊं लागली. या संदर्भांत यशवंतरावांचं मत असं होतं की, पाकिस्तानचं आक्रमण समर्थपणें थोपवून शिवाय आगेकूच करण्याइतका भारत समर्थ आहे याची पाकिस्तानला प्रचीति आल्याशिवाय, त्या राष्ट्राचे आक्रमणाचे उद्योग थांबणार नाहीत.

कच्छच्या बाबतींत युद्धबंदीचा करार झाल्यानंतर पाकिस्तानच्या वृत्तींत बदल घडेल आणि शांततेचं वातावरण निर्माण होईल, अशी भारत सरकारची कल्पना होती. गंभीर स्वरूपाच्या लष्करी हालचाली करण्याचे मनसुबे पाकिस्तानकडून होणार नाहीत असंहि वाटत होतं; परंतु भारताच्या या कल्पनेला धक्का बसला होता. भारतामध्ये घूसखोर पाठवून गनिमी काव्यानं हल्ले चढवण्याची योजना पाकिस्ताननं १९६५ च्या मेमध्येच शिजवली होती. आणि या योजनेनुसार त्या वर्षाच्या ऑगस्टमध्ये घूसखोरांची पहिली तुकडी काश्मीरमध्ये मोठ्या संख्येनं उतरली. गनिमांनी काश्मीरचा ताबा घ्यायचा आणि ताबा मिळतांच क्रांतिकारकांनी आझाद काश्मीरचा प्रशासकीय कारभार सुरू करायचा अशी एक धाडशी योजनाहि रावळपिंडीनं तयार केली होती. ऑगस्टच्या ९ तारखेला पाकिस्ताननं तसं एक वृत्तहि जाहिर करून टाकलं. काश्मीरमध्ये त्यासाठी एक गुप्त आकाशवाणी-केंद्र उभारलं आणि काश्मीरच्या जनतेनं गनिमांना सहकार्य द्यावं असा प्रचारहि आकाशवाणी-केंद्रावरून सुरू केला. दक्षिण-भारतीय, शीख, रजपूत यांना फितवण्यासाठीहि हें प्रचार-केंद्र राबवलं जात होतं.
मात्र या कृत्याशीं पाकिस्तानचा कांही संबंध नाही असंहि भासवण्यांत येत होतं. काश्मीरमधील मुजाहिदांना पाकिस्तानचं सहकार्य असून अल्ला त्यांच्या पाठीशीं आहे असा प्रचाराचा एकूण रोख होता.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यांत संरक्षणमंत्री यशवंतराव हे विजगापट्टमच्या नौदल-केंद्राची पहाणी करण्यासाठी गेले होते; परंतु ते विजगापट्टमला पोंचतात न पोंचतात तोंच त्यांना दिल्लीला ताबडतोब परतण्याचा संदेश मिळाला. पंतप्रधान शास्त्रीजींनीच त्यांना ताबडतोब परत येण्यास सुचवलं होतं. या वेळपर्यंत पाकिस्तानी घूसखोर भारताच्या हद्दींत घुसले होते.

देशासमोर आता गनिमी काव्याच्या युद्धाचं नवं आव्हान उभं होतं. ९ ऑगस्ट पर्यंत ३ हजार गनीम युद्धबंदी-रेषा ओलांडून भारताच्या हद्दींत पोंचले होते. काश्मीर मधील पूंछजवळच्या मंडी गावावर त्यांनी कबजा केला होता. मंडीवर चार दिवस त्यांचाच कबजा होता. मग मात्र भारताच्या लष्करानं त्वरा करून बारामुल्ला या गावाजवळ रात्रीच्या वेळीं मोठ्या संख्येनं गनीम पकडले. ८ ऑगस्टला श्रीनगरपर्यंत मजल करून, श्रीनगरमध्ये ८ ऑगस्टला होणा-या निदर्शनांत सामील होण्याचा गनिमांचा डाव होता. शेख अब्दुल्ला यांची काश्मीरच्या पंतप्रधानपदावरून हकालपट्टी करून त्यांना अटक केली त्याला त्या दिवशीं एक वर्ष पूर्ण होणार होतं आणि त्यानिमित्तच श्रीनगरमध्ये निदर्शनं व्हायचीं होतीं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org