इतिहासाचे एक पान. २६०

यशवंतराव अमेरिकेत पोचले त्यापूर्वीच्या आठवड्यांत बंगलोरच्या हिंदुस्थान एरोनाँटिक कारखान्यात तयार झालेलं एच् एफ् – २४ हे अत्यंत प्रभावी, वेगवान, बाँबफेकी विमान भारतीय हवाईदलाकडे जमा झालं होतं. या नव्या शक्तिमान विमान-बनावटीच्या तांत्रिक कौशल्याचा, यशवंतरावांनी मुक्तकंठानं गौरव केला आणि भारतांतले तंत्रज्ञ हे आंतरराष्ट्रीय क्षेत्रांतील तंत्रज्ञांच्या तोडीस तोड असल्याचंच आता सिध्द झालं आहे, असा अभिप्रायहि व्यक्त केला. जर्मन तंत्रज्ञ डाँ. कुर्ट टंक यांच्या सहकार्यानं हे नवं शक्तिशाली विमान तयार झालेलं होतं.

अमेरिकेच्या भेटीत मात्र यशवंतरावांना वेगळाच अनुभव आला, कांही वेगळंच ऐकावं लागलं. तिथे ज्या चर्चा झाल्या आणि अमेरिकेच्या लष्करी अधिका-यांनी, सरकारनं जो हितोपदेश केला त्यावरून, अत्याधुनिक स्वरूपाची शस्त्रसामग्री, भारताला देण्याची अमेरिकेची तयारी नाही हे लक्षांत येण्यास त्यांना वेळ लागला नाही. संरक्षणविषयक मदत भारताला कोणत्या प्रकारे आणि कशी करतां येईल याचा मार्ग शोधण्याऐवजी अमेरिकेकडून अशी मदत का संपादन करू नये, याची कारणं ऐकवण्यांत त्यांनी यशवंतरावांचा वेळ खर्च केला. अमेरिकेची नकाराची भूमिका घट्ट होती. अमेरिकेनं एफ्-१०४ ही लढाऊ विमानं पाकिस्तानला दिली होती. भारताच्या संग्रही मिग-२१ ही विमानं होती, परंतु भारतालाहि एफ्-१०४ जातीची विमानं मिळावीत अशी मागणी करण्यासाठी संरक्षणमंत्री तिकडे गंले होते. त्या दौ-यांत तर ही मागणी पदरांत पाडून घेणं साध्य झालं नाहीच, परंतु पुढे दोन वर्ष यासंबंधांत चर्चा सुरू राहूनहि भारताला अनुकूल निर्णय अमेरिकेकडून मिळाला नाही. फिलिप्स टालबोट हे अमेरिकेच्या बाजूनं या प्रश्र्नांत मध्यस्थी करत होते; परंतु या गृहस्थांचा कांही उपयोग होईल आणि ते आपली मध्यस्थी यशस्वी करतील, यासंबंधी भारताचे संरक्षणमंत्री फारशी आशा बाळगून नव्हते.

रशियाच्या मदतीनं मिग-२१ जातीच्या विमानांचं उत्पादन भारतानं सुरू केलं असल्यानं अमेरिका नाराज होती. भारतासारख्या अविकसित देशाला, मिग विमानाच्या उत्पादनाचा खर्च पेलणारा नाही असा अमेरिकेचा दावा होता. भारताचं नाविकदल सुसज्ज बनवण्याच्या दृष्टीनंहि अमेरिकेची टाळाटाळ सुरू होती. भारतानं संरक्षणाच्या बाबतीत अमेरिकेवर जास्तीत जास्त अवलंबून रहावं असाच त्यांचा दृष्टिकोन होता. अनेकदा चर्चा, वाटाघाटी होऊनहि, त्यांतून कांहीहि विधायक निर्माण होत नाही असं लक्षांत येतांच, अमेरिकेच्या सरकारनं, भारताला अत्याधुनिक बनावटीची शस्त्रसामग्री देण्याचा प्रश्र्न ज्या पध्दतीनं हाताळला त्याबद्दल मग यशवंतरावांनी, डीन रस्क यांच्याजवळ तीव्र नापसंती व्यक्त केली.

पंधरा दिवस चर्चा सुरू होती; परंतु त्यांतून कांही अनुकूल असं निष्पन्न होत नव्हतं. म्हणून अखेरच्या क्षणी मग, यशवंतरावांनी अमेरिकेचे प्रेसिडेंट जाँन्सन यांच्याशी चर्चा करण्याचं ठरवलं. ही चर्चा २८ मे रोजी होण्याचं ठरलं. यशवंतराव त्या वेळी लाँस एंजल्समध्ये आठवडाअखेरच्या विश्रांतीसाठी म्हणून गेले होते. या दौ-यांतच ते कोलोरॅडो येथील अमेरिकेची हवाई अकादमी पहाण्यासाठी म्हणून गेले. अकादमीची पहाणी करून दुस-या दिवशी ते वाँशिंग्टनला पोचणार होते. प्रे. जाँन्सन यांची भेट निश्र्चित झाली होती.

कोलोरॅडोमधली ती रात्र मोठी अशुभ ठरली. यशवंतराव गाढ झोपेत असतांना रात्री २ वाजता त्यांच्या खोलीतला फोन खणखणू लागला. यशवंतराव कांहीसे त्रासले होते. मध्यरात्रीनंतर एवढ्या उशिरा, कोलोरॅडोसारख्या परक्या ठिकाणी आपल्याला एकसारखा फोन करणारा हा कोण असावा याचं त्यांना कोडं पडलं. परंतु फोनची घंटा एकसारखी घणघणत राहिल्यानं अखेर त्यांनी फोन कानाला लावला. फोन वाँशिंग्टनहून आला होता. फिलिप्स टालबोट हेच फोनवर बोलत होते.

फिलिप्स टालबोट यांच्या तोंडचे शब्द यशवंतरावांनी ऐकले मात्र, त्यांना धक्काच बसला! पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचं भारतांत देहावसान झालं होतं. टालबोट यांनी ती धक्का देणारी, दुःखद घटना यशवंतरावांना फोनवरून सांगितली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org