इतिहासाचे एक पान.. २६

यशवंतरावांच्या जन्मानंतरची १९१४ तें २० हीं सहा वर्षं महाराष्ट्राच्या दृष्टीनं मोठीं अर्थपूर्ण ठरतात. पहिलं महायुद्ध तेव्हाच सुरु झालं. लो. टिळक सहा वर्षांची शिक्षा भोगून मंडालेहून गीतारहस्याचा -कर्मयोगाचा- संदेश देण्यासाठी मायभूमीस परतले. होमरुल लीगची-हिंदी स्वराज्य संघाची -स्थापना करुन याच काळांत त्यांनी चळवळीला तेज प्राप्त करुन दिलं. राष्ट्रीय पक्ष नि:सत्व आणि विस्कळित बनला होता. टिळकांच्या अनुपस्थितींत मवाळांनी काँग्रेसवर कबजा करुन तिला निस्तेज करुन सोडली होती. मायभूमींत परतल्यावर पुढच्याच वर्षी टिळक आपल्या अनुयायांसह काँग्रेसच्या मंडपांत दाखल झाले व तिच्यावर त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व मी तें मिळवीनच' हा मंत्र टिळकांनी याच काळांत उच्चारला आणि हिंदुस्थानला जबाबदारीचं स्वराज्य देऊन साम्राज्यांतील एक भागीदार करणं हें ब्रिटिश सरकारचं धोरण आहे, असा ब्रिटिश सरकारचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता तरी रौलट-बिलं पास करुन हिंदुस्थान सरकारनं दपडशाही आरंभली होती आणि त्यांतूनच 'जालियनवालाबागेचं' रक्तरंगण घडलं होतं. त्या दशकाची अखेर लो. टिळकांच्या निधनानं झाली. महाराष्ट्र एका महापुरुषाला मुकला. महात्माजींचा उदय झाला आणि लोकमान्यांच्या निधनानं उघड्या पडलेल्या राजकीय सिंहासनाला समर्थ वारसदार मिळाला तोहि यात काळांत. देशांतील नेतृत्व जहालांनी आपल्या हातीं घेतलं होतं आणि या वेळीं महात्मा गांधी भारतांत आले होते. दक्षिण आफ्रिकेंतील भारतीयांसाठी त्यांनी जो लढा दिला आणि सत्याग्रहाचं नवं तंत्र तिथे वापरलं  त्याबदद्ल काँग्रेस-धुरीणांमध्ये गांधीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल व संघटना-कौशल्याबद्दल चांगलं मत झालेलं होतं. सत्याग्रहाला ते बलिष्ठांचं शस्त्र म्हणत असत. सत्याग्रहाचं हें शस्त्र घेऊन गांधीजी १९१८ मध्येच खेडुतांपर्यंत पोंचले. भारतीयांच्या विरोधाला न मानतां, सरकारनं रौलट-विधेयक कायदेमंडळांत समंत करुन घेतलं तेव्हा गांधीजी सहनशक्ति संपली आणि सरकारच्या धोरणाला त्यांनी सत्याग्रहानं विरोध करण्याचं ठरवलं. दडपशाहीचे कायदे तोडण्यासाठी त्यांनी सभांतून लोकांना आवाहन केलं आणि ६ एप्रिल १९१९ सालीं देशभर सार्वत्रिक हरताळ पुकारुन तो यशस्वी केला. याच महिन्यांत गव्हर्नर ओडवायरनं जालियनवालाबागेंत १३ एप्रिलला हत्याकांड घडवलं. नेमस्त काँग्रेसवालेहि गांधीजींना येऊन मिळाले. याच वर्षीं नोव्हेंबरमध्ये जी खिलाफत-परिषद झाली तिच्या अध्यक्षपदीं गांधींनाच निवडलं गेलं. मित्रराष्ट्रांच्या विजयानिमित्त होणा-या उत्सवांत मुसलमानांनी भाग घेऊं नये असा परिषदेनं आदेश दिला आणि ब्रिटिशांनी तुर्कस्थानला न्याय दिला नाही, तर बहिष्कार व असहकार पुकारण्याची धमकी दिली. अमृतसर काँग्रेस अधिवेशनानं आणि मुस्लिम लीगनंहि खिलाफत-चळवळीला पाठिंबा दिला. परंतु या संदर्भात ब्रिटिशांकडून अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा खिलाफतीच्या मुद्दयावर गांधींनी चळवळ सुरु करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार १ ऑगस्टला ही असहकाराची मोहीम सुरु झाली.

दशकाचा प्रारंभ 'भो भो' पचम जॉर्जच्या राज्यारोहणानं झाला होता. सत्तेचं सिंहासन कलकत्यांहून निघून दिल्लीला नेण्यांत आलं होतं. ईस्ट इंडिया कंपनीची जहाजं आता भारतीय शेतींत उत्पादन होणा-या मालानं भरुन, कच्चा माल म्हणून इंग्लंडच्या रोखानं समुद्रांतून तरंगत चालली होती आणि इथले शेतकरी, शेत-मजूर मध्यमवर्ग यांना जगण्याची भ्रांत निर्माण झाली होती. जित राष्ट्राचीं - इंग्रजांचीं पावलं- हिंदुस्थानांत अधिकाधिक भक्कम करण्यासाठी आणि सारा देश कायमचा मांडलिक बनवण्यासाठी क्रूरतेनं, करोठतेनं पडूं लागली होती. संकटाच्या वेळी आपल्या बाजूनं खडे होतील अशा लोकांना, निरनिराळ्या जातींना आपल्या कच्छपीं लावण्याचे डावहि सुरु झाले होते. देशांतले अनेक बुद्धिवादी त्यांचं भक्ष्म बनले होते. हिंदुस्थानच जी अवस्था निर्माण होत आहे, आर्थिकदृष्ट्या तो किती रसातळाला जात आहे याची फिकीर त्यांना उरली नव्हती. इंग्रज लोक भारतवासियांना पूर्णपणें लुटत तर होतेच, पण स्थानिक उच्चवर्गीयांनाहि स्वबांधवांना लुटण्याची संधि निर्माण करुन देत होते. लोकांनी जास्तींत जास्त अडाणी, अशिक्षित रहावं, गुलामी वृत्तीनं वागावं यासाठीच उच्चवर्गीय, आपली बुध्दि इंग्रजाकडे गहाण टाकून आचार करुं लागले होते. उच्चवर्गीय, व्यापारी आणि सत्ता हस्तगत केलेल्या भारतांतील नव्या सरदारांची इंग्लंडमधल्या प्रतिगाम्यांशीं हात मिळवणी घडून गेल्यानं हिंदुस्थानांतल्या शेतक-यांचं, शेत-मजुरांचं आणि सर्वसामान्य गरिबांचं कंबरडं मोडून गेलं. इंग्रजांच्या आणि स्थानिक फितुरांच्या कात्रींत त्यांचं जीवन सापडलं. त्यांतून बाहेर पडण्यासाठी त्यांना कणी मार्ग दाखवीत नव्हतं. यशवंतरावांचे वडील बळवंतराव यांचं सारं जीवन याच कात्रींत कातरलं गेलं होतं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org