इतिहासाचे एक पान. २५६

संरक्षणखात्याच्या समस्या हा विषय यशवंतरावांना नवा होता. देशाचं संरक्षण होण्याच्या दृष्टीनं लष्कराची कितपत तयारी आहे याचा अंदाज घेतां येणंहि त्यांना कठीण होतं. लष्करी डावपेचाबाबत दिल्लीत कुणी मार्गदर्शन करील, सहकार्य करील तर त्या दृष्टीनं समोर कुणी दिसत नव्हतं. कारण भारतावर चाल करून येण्यामागे चीनचा निश्र्चित हेतु कोणता होता याचा दिल्लीलाच अजून थांगपत्ता लागलेला नव्हता. युध्दसमाप्तीनंतर चीननं जी पावलं टाकली त्यामुळे तर सारेच गोंधळून गेले होते. युध्दाच्या त्या धांवपळीत चीनकडून मोठ्या प्रमाणांत रेटा येतांच भारतीय लष्कराची दाणादाण उडाली होती. माघार घेतांना, आपली हत्यारं टाकूनचं त्याना पळ काढावा लागला होता. जवानांनी सोडून दिलेल्या या हत्यारांमध्ये कांही अमेरिकेची होती, कांही रशियाची होती. रशियन बनावटीची कांही चांगल्या स्थितींतील हेलिकाँप्टर्सहि चिन्यांच्या हाती लागली होती. परंतु ही सर्व हत्यारं आणि यंत्रसामग्री चिन्यांनी तपासून पाहिली, त्यांतली कांही स्वच्छ केली आणि परत जातांना भारताच्या भूमीवर होती तिथे ठेवूनच ते परत फिरले होते. भारतीय मुत्सद्द्यांना मग चिन्यांच्या या डावपेचाचा अर्थ लावण्यांतच बुध्दि खर्च करत बसावं लागलं.

लोकसभेत यासंबंधी खुलासा करतांना युध्दसमाप्ति जाहीर केल्यानंतरहि चीन त्या दिवशी, दुस-या दिवशी, त्या आठवड्यांत, पुढच्या आठवड्यांत कुठले डावपेच खेळणार आहे याचा आम्ही विचार करत होतो, असं यशवंतरावांनी सांगितलं.

सर्वच परिस्थिति अनिश्र्चिततेची असल्यामुळे, उत्तर-सीमेवरील हालचालींकडे करडी नजर ठेवणं आणि न जाणो, आक्रमणाचा प्रसंग पुन्हा निर्माण झालाच तर त्याला तोंड देण्यासाठी सिध्द रहाणं यासाठी मग सरकारी चक्र फिरत राहिली. त्या वेळी लष्करी शक्तीचा विस्तार करून, आधुनिक शस्त्रास्त्रांनी लष्कर सुसज्ज बनवणं, डोंगरी मुलखांत लढाई करण्यासाठी म्हणून, त्या पध्दतीच्या लढाईचं शिक्षण घेतलेल्या लष्करी तुकड्या अधिक संख्येनं तयार करणं, आधुनिक पध्दतीच्या युध्दांतले डावपेच खेळण्यांत तरबेज असलेल्या सैन्याच्या तुकड्या सिध्द ठेवण, नवी शस्त्रसामग्री, दळणवळणाच्या अत्याधुनिक सोयी लष्करासाठी उपलब्ध करून देणं अशा प्रकारचं मूलभूत स्वरूपाचं काम या नव्या संरक्षणमंत्र्यांना करावं लागणार होतं.

त्या काळांत खुद्द लष्करांत आणि संरक्षण-मंत्रालयांतहि निरनिराळे गट तयार झालेल आहेत असं यशवंतरावांना प्रथमच दर्शन घडलं. मुख्य मंत्री या नात्यानं त्यांनी प्रशासकीय कामाचा अनुभव घेतला होता. परंतु संरक्षण-मंत्रालयाच्या कामाची, कामाच्या पध्दतीची, त्यांतील बारकावे जाणून घेण्याची संधि त्यांना पूर्वी कधी मिळालेली नव्हती. सरकारची जी निरनिराळी खाती असतात त्यामध्ये संरक्षणाचं खातं, त्यांतील कामाचं तंत्र, हे कांही वेगळंच असतं. संरक्षणाची म्हणून कांही कामाची, कामाच्या आखणीची वेगळी पध्दत असते. या कामाचं स्वरूप वेगळं, समस्या वेगळ्या, समस्यांची व्याप्ति वेगळी, तिथली प्रशासकीय भाषा वेगळी आणि प्रशासनाची त-हाहि वेगळी. यशवंतरावांना या सर्वांची माहिती करून घ्यावी लागणार होती. मुख्य म्हणजे संरक्षणाच्या संदर्भात, आपण आहोत कुठे, कमतरता काय आहेत, पल्ला किती गाठावा लागणार आहे याची माहीती असण आवश्यक होतं. त्यासाठी मग त्यांनी कामाची सारी पध्दतच बदलली. रोज सकाळी ९।। वाजतां, लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. यांच्या या बैठकीला संरक्षणखात्याचे सचिव आणि संरक्षण-उत्पानदखात्याचे सचिव हे दोघे उपस्थित राहू लागले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org