इतिहासाचे एक पान. २५४

यशवंतराव चव्हाण हे २० नोव्हेंबरला संध्याकाळी दिल्लीत पोचले. त्यापूर्वी सरसेनापतीमध्ये बदल झाला होता. संरक्षणखात्याचे सचीवहि नवे आले होते. संरक्षणमंत्रिपदाची सूत्रं हाती घेण्यासाठी यशवंतराव दिल्लीला पोचले होते, परंतु दिल्लीत पडद्यामागे झालेला हा बदल आणि भारत-चीन सीमेवरील घटना यांपैकी कशाचीच त्यांना कल्पना नव्हती. त्यानंतरच्या पुढच्या दोन-तीन दिवसांतहि घटना इतक्या झपाट्यानं घडत राहिल्या की, आपण फार लवकर दिल्लीला आलो, असं यशवंतरावांना वाटूं लागलं. महाराष्ट्रांतून निघण्यापूर्वी त्यांना लोकशाही प्रथेचं पालन करणं आवश्यक होतं. विधानसभेचा नवा नेता निवडणं, त्यांच्या हाती सूत्रं देणं हे तितकंच महत्वाचं होतं. हे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच ते २० नोव्हेंबरला दिल्लीला पोचले. महाराष्ट्रांत, मारोतराव कन्नमवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रं त्यांनी सुपूर्त केली होती.

दिल्लीत पोचताच विमानतळावरून ते थेट ‘तीनमूर्ति’ या पं. नेहरूंच्या निवासस्थानीच गेले. पं. नेहरूंचा आत्मविश्र्वास दांडगा होता, परंतु त्या दिवशी ते बरेच सचिंत बनलेले होते. पं. नेहरूंनी मग, दिल्लीत नव्यानं घडलेल्या घटनांची माहिती त्यांना सांगितली आणि, सरसेनापति थापर यांचा राजीनामा कोणत्या परिस्थितीत मान्य करावा लागला याचीहि माहिती दिली. नेफामधील परिस्थितीचीही त्यांनी कल्पना दिली. चीनचं लष्कर कोणत्याहि क्षणाला, हिमालय उतरून भारताच्या भूमीवर पाय ठेवील अशी त्या वेळची स्थिति होती.

याच सुमारास इंदिरा गांधी यांनी आसाम-सीमेचा दौरा निश्र्चीत केला होता. म्हणून मग यशवंतरावांनी, पं. नेहरूंशी चर्चा केल्यानंतर लगेचच इंदिरा गांधीशी चर्चा केली. त्या रात्री यशवंतराव दिल्लीतल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचले ते कांहीशा गोंधळलेल्या मनःस्थितीतच! दिल्लीत मोरारजी देसाई यांच्याकडे मुक्काम करण्याची त्यांची प्रथा असायची. पं. नेहरूंचा निरोप घेऊन निघाल्यावर ते मोरारजींभाईंकडेच गेले. आपलं भवितव्य आणि नवीन जबाबदारी यांच्या विचारांनीच त्या वेळी त्यांच्या मनांत गर्दी केली होती. ती सारी रात्र अस्वस्थतेत जावी असाच जणू संकेत असावा. रात्री ११ वाजता बिजू पटनाईक यांचा यशवंतरावांना अचानक फोन आला. पटनाईक यांना त्यांच्याशी कांही चर्चा करायची होती. त्याप्रमाणे मध्यरात्रीच्या सुमारास पटनाईक येऊन दाखल झाले. पटनाईक यांनी गप्पागोष्टी करतांना संरक्षणविषयक विविध समस्यांची माहिती देण्याचा प्रयत्न केला. ‘लष्करी डावपेच’ म्हणून जे म्हणतात त्या बाबतींतहि यशवंतरावांना सज्ञान करावं, असा त्यांचा हेतु होता. चर्चा बराच वेळ सुरू होती; म्हणजे पटनाईक बोलत राहिले होते. बोलता बोलता यशवंतरावांना चक्रावून सोडणारा एक प्रश्र्न मध्येच त्यांनी विचारला.

“तुम्ही दिल्लीला, इतक्या लांबवर आलांत कशालाॽ”

एवढा प्रश्र्न विचारूनच ते थांबले नाहीत. त्यांनी पुढे अशीहि खास माहिती सांगितली की, चीनचं सैन्य झपाट्यानं पुढे सरकत आहे, अन् कदाचित मुंबईला धोका निर्माण होऊन मुंबई हीच युध्दभूमि बनण्याची शक्यता आहे. अशा वेळी तुम्ही मुंबईतच असलं पाहिजे.

यशवंतराव त्या दिवशी संध्याकाळीच दिल्लीला पोचले होते. संरक्षणमंत्री म्हणून अजून त्यांचा शपथविधि व्हायचा होता. पटनाईक यांची अशी समजूत असावी की, चव्हाण हे अजूनहि संरक्षणमंत्री बनण्याचा आपला विचार बदलतील आणि आल्या वाटेनं मुंबईला परत जातील! त्यासाठीच त्यांनी रात्री त्यांना गाठलं होतं आणि बरंच कांही ऐकवलंहि होतं.

यशवंतराव हेहि कांही राजकारणात कच्चे नव्हते. संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारून दिल्लीला येण्यास मी राजी नव्हतो, असंच त्यांनी सुरुवातीला पटनाईक यांना सांगितलं. अन् लगोलग अशी चपराकहि दिली की, संरक्षणमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारण्याचा मी निर्धार केला आहे आणि या आणीबाणीच्या वेळी राष्ट्राकरिता जेवढं जास्तीत जास्त करतां येईल तेवढं करण्याचा माझा निर्णय आता पक्का झाला आहे, असंच त्यानी बिजू पटनाईक यांना सुनावलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org