इतिहासाचे एक पान. २५२

पं. नेहरूंनी, फोनवरून बोलतांना खाजगी, गुप्त अशा शब्दांत उल्लेख केलेला असला, तरी त्या संबंधांत पत्नीशी बोलावं लागेल अशी यशवंतरावांनी सोडवणूक करून घेतलीच होती. त्यानुसार पत्नी सौ. वेणूबाईंचा सल्ला त्यांनी विचारला तेव्हा या नव्या बदलाबद्दल त्यांना फारसा उत्साह, औत्सुक्य नसल्याचंच आढळून आलं. मुंबईत स्थिर बनलेल्या आयुष्यांत पुन्हा बदल घडवण्याची सौ. वेणूबाईंच्या मनाची तयारी कदाचित् नसावी. यशवंतरावांच्या मातोश्री विठाई याहि आता वृध्द झाल्या होत्या. त्यांचा एकच पुत्र-यशवंतराव-आता त्यांना उरला होता. यशवंतरावांनी मुंबईत राहून आता आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी असंहि सौ. वेणूबाईंना सुचवायचं असावं. एक गोष्ट खरी की, त्या परिस्थितीत यशवंतरावांना निर्णय करणं कठीण ठरलं. दिल्लीची हाक आली म्हणून जायचं, तर वृध्द मातेला मुंबईत ठेवूनच जावं लागणार होतं. सौ. वेणूबाईंच्या आणि त्यांच्या भावना जणू एकच होत्या.

परंतु आता विचार करायला अवधीच उरला नव्हता. कारण पुढच्या दोन-तीन दिवसांतच पं. नेहरूंचा निरोप त्यांन फोनवरून मिळाला. “ताबडतोब दिल्लीस या!” अन् १० नोव्हेंबरला यशवंतराव दिल्लीला पोचलेहि. विमानतळावरून ते थेट पंडितजींच्या निवासस्थानीच गेले. पं. नेहरू आणि लालबहादूर शास्त्री त्यांची वाट पहात थांबलेच होते.

या पहिल्या भेटीत यशवंतरावांनी या दोन्ही नेत्यांसमोर आपलं मन मोकळं केलं. पं. नेहरूंनी एक निर्णय करून त्यांच्याबद्दल फार मोठा विश्र्वास दाखवला होता. यशवंतरावांनी ते कृतज्ञतेनं बोलून दाखवलं आणि त्याचबरोबर, मुंबईत असतांना त्यांच्या मनांत घोळत राहिलेल्या घरगुती समस्याहि निवेदन केल्या.
संरक्षणाच्या प्रश्र्नाचं आपल्याला कांही ज्ञान नाही आणि देशभक्तीशिवाय अन्य कुठलीहि पात्रता आपल्याजवळ नाही, असंहि त्यांनी पंडितजींच्या नजरेस आणलं.

“संरक्षणविषयक समस्यांचं ज्ञान करून घेण्याला मला कांही काळ खर्च करावा लागणार आहे.”-चव्हाण.

“मला त्याची कल्पना आहे; परंतु मला खात्री आहे, ते सर्व तुम्ही लवकरच आत्मसात कराल. मला इथे, राजकीय नेतृत्व देईल असं कुणी हवं आहे. तुम्ही दिल्लीला असणं माझ्या दृष्टीनं आवश्यक आहे.”-नेहरू.

“दिल्लीला येण्याची माझी तयारी आहे. मी आजची रात्र दिल्लीत मुक्काम करणार आहे. अन् उद्या मुंबईला परतणार आहे. मला वाटतं, आपण आपल्या निर्णयाबद्दल पुन्हा एकदा विचार केलेला बरा. खरोखरीच मी इथे यायला पाहिजे का, याचा विचार करा अन् मला सांगा. विमानतळाकडे जातांना मी उद्या पुन्हा आपली भेट घेईन आणि मगच मुंबईस जाईन.”-चव्हाण.

“आता अधिक विचार करावा असं कांही उरलेलं नाही. संरक्षणमंत्रिपद मी तुम्हाला बहाल करतोय् हे पाहून टी. टी. कृष्णम्माचारी बरेच खवळले आहेत. मी माझा निर्णय केलेला आहे.” – नेहरू

संरक्षणखातं यशवंतरावांकडे देण्याचा निर्णय पं. नेहरूंनी केल्यामुळे टी. टी. कृष्णम्माचारी यांची त्या वेळी फार मोठी निराशा झाली होती. प्राप्त परिस्थितीत ते खातं आपल्या हाती येईल अशी त्यांची अपेक्षा होती. दुसरे एक मुख्य मंत्री बिजू पटनाईक हेहि संरक्षणमंत्रिपदाची अपेक्षा त्या वेळी बाळगून होते. पं. नेहरूंनी तेहि यशवंतरावांना सांगितलं; आणि मी सर्व विचार करूनच निर्णय केला आहे, तुम्ही दिल्लीत असायला हवं हा माझा निर्णय पक्का आहे, असंहि पंडितजींनी त्याच बैठकीत मोकळेपणानं सांगून टाकलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org