इतिहासाचे एक पान. २४९

चीननं कबजा केलेल्या १२ हजार चौरस मैलांच्या क्षेत्रापैकी २५०० चौरस मैलाचं क्षेत्र भारतानं परत मिळवलं आहे, असाहि पं. नेहरूंनी १९६२ च्या ऑगस्टमध्ये राष्ट्राला उद्देशून सांगितलं. त्याचबरोबर आघाडीच्या भागांत भारतानं उभारलेले लष्करी तळ हे कायमचे धोक्यांत असून, चीनकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणांत कोणत्याहि क्षणाला हल्ला होण्याची शक्यता आहे, अशी जाणीवहि त्यांनी देऊन ठेवली; परंतु त्याबद्दल ते निश्र्चिंत होते. कारण भारतानं पुढची झेप घेण्याचं धाडस करून चीनकडून भारताच्या भूमीवर होणारं आक्रमण थोपवलं होतं.

त्या वर्षाच्या सप्टेंबरच्या ९ तारखेला पं. नेहरू हे काँमनवेल्थ काँन्फरन्ससाठी लंडनला रवाना झालेले असताना, संरक्षणमंत्री कृष्णमेनन आणि त्यांच्या सल्लागारांनी थाँग-ला या ठाण्यावर चढाई करून ते हस्तगत करण्याचा निर्णय केला; परंतु या चढाईबाबत वरिष्ठ लष्करी अधिका-यांमध्ये एकमत होऊं शकलं नाही. लेफ्टनंट जनरल उमरावसिंग हे चढाईबाबत उत्सुक नाहीत असं आढळतांच, कृष्णमेनन यांनी मग नेफामधल्या लष्करी हालचाली करण्याच्या संदर्भात कांही आकस्मिक निर्णय केले आणि त्या भागासाठी लेफ्टनंट जनरल कौल यांची प्रमुख म्हणून नियुक्ति केली. पं. नेहरू २ ऑक्टोबरला लंडनहून परतल्यानंतर क़ृष्णमेनन यांच्या निर्णयास त्यांनी पाठिंबाच दिला.

ले. ज. कौल हे अतिउत्साही अधिकारी होते. मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन वरचं पद हस्तगत करण्याची त्यांच्या मनांत महत्वाकांक्षा होती. ले. ज. कौल यांनी नव्या जागेची सूत्रं स्वीकारतांच थाँग-ला हे ठाणं हस्तगत करण्याची आखणी त्यांनी केली. १० ऑक्टोबर हा दिवसहि त्यासाठी निश्र्चित केला. एका चीनचे लष्करी अधिकारीहि जागे होते. त्यांनी भारताच्या लष्करी ठाण्यांवर निकराचा हल्ला चढवला आणि भारताच्या लष्कराची कोंडी केली. थाँग-ला ठाणं हस्तगत करणं आणि चीनच्या लष्कराशी सामना देणं किती कठीण आहे हे ले. ज. कौल यांना उमगलं, किंबहुना ते काम आपल्या आवाक्याबाहेरचं आहे असं लक्षांत आल्यानं त्यांनी दिल्लीला ही वस्तुस्थिति कळवून ते मोकळे झाले. या चकमकींत भारताचे सात जवान कामास आले होते.

नेफांत निर्माण झालेल्या धोक्यामुळे दिल्ली अस्वस्थ बनली. पं. नेहरूंनी ११ ऑक्टोबरलाच आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या खास बैठकींत या परिस्थितीचा विचार झाला. दरम्यान ले. ज. कौल हे दिल्लीला परतले होते. नेफामधल्या परिस्थितीचा अतिशय निराशाजनक अहवाल त्यांनी दिल्लीत सादर केला. अखेर अनिर्णीत स्वरूपांतच ही बैठक संपवण्यात आली. पुढे काय करावं याचा निर्णय वरिष्ठ लष्करी अधिका-यांनीच करावा पं. नेहरूंनी सुचवलं. सरसेनापति थापर यांनी मग त्यानुसार दुस-या दिवशी भारतानं धोला या ठाण्याच्या रोखानं कूच करावी असा सल्ला दिला.

पं. नेहरू हे त्यानंतर सिलोनच्या भेटीसाठी जाणार होते. तीन दिवसांचा त्यांचा हा दौरा होता. पंडितजी सिलोनकडे जायला निघतांच, दिल्लीच्या पालम विमानतळावर पत्रकारांनी त्यांना गाठलं आणि नेफामधल्या भारतीय लष्कराला कांही खास आज्ञा देण्यांत आल्या आहेत काय, अशी पृच्छा केली. “सीमेवरील भारताचा भाग हा मुक्त करा” एवढीच आमची आज्ञा आहे, असं पंडितजींनी उत्तर दिलं आणि “मुक्तीचा दिवस मी निश्र्चित करूं शकत नाही, ते काम लष्कराचं आहे” अशी पुस्तीहि त्याला जोडली.

दुस-या बाजूला ऑक्टोबरमध्ये चीननं भारताच्या सरहद्दीवर लागोपाठ हल्ले सुरू केले आणि त्या प्रत्येक ठिकाणी भारताचा पाडाव होत राहिला. नेफाचे लष्करप्रमुख ले. ज. कौल आजारी झाल्यामुळे त्यांनी दिल्लीला तळ ठोकला. कौल हे आजारी होते, तरी त्यांनी आपल्या अधिकाराची सूत्रं दुस-या कुणा अधिका-याच्या हाती दिली नाहीत. दिल्लीतल्या निवासस्थानी बसूनच ते लष्कराला हुकूम देत राहिले. २५ ऑक्टोबरपर्यंत त्यामुळे भारताच्या लष्कराची मोठीच शोचनीय अवस्था निर्माण झाली तेव्हा कुठे मे. ज. हरबक्षसिंग यांची कौल यांच्या जागेवर हंगामी नेमणूक करण्यांत आली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org