इतिहासाचे एक पान. २४६

फोनवरून सुरू असलेलं खाजगी संभाषण संपलं. पं. नेहरूंच्या मंत्रिमंडळांत दाखल होण्याचा सांगावा यशवंतरावांना अशा पध्दतीनं अनपेक्षित आला. द्वैभाषिक निर्मितीच्या वेळी द्वैभाषिक राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्याची हाक नियतीनं यशवंतरावांना अशीच अचानक दिली होती. त्या वेळची परिस्थिति गुंतागुंतीची आणि कांहीशी अडचणीची अशीच होती; परंतु यशवंतरावांनी त्या हाकेला प्रतिसाद दिला आणि जबाबदारीहि पत्करली.

आताहि पुन्हा तेच घडणार होतं.

देशाच्या आणीबाणीच्या काळांत, राष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ नेत्यानं – पं. नेहरूंनीच यशवंतरावांना दिल्लीला येण्याची हाक दिली होती. सर्वच घटना अनपेक्षित होत्या; परंतु दिल्लीची भूमीच अशी बनलेली आहे की, तिथे बहुतेक घडतं ते अनपेक्षित! अगदी प्राचीन ऐतिहासिक काळापासून हे सुरू आहे.

दिल्लीनगरीचा पाया घालण्यांत आला त्या वेळची कुंडलीहि तशीच असावी हे एक ऐतिहासिक सत्य दिसतं. या शहरावर वेगवेगळ्या काळांत अनेक आपत्ति कोसळल्या, विपत्ति आल्या. परंतु कुरुक्षेत्र, पानिपत, हस्तिनापूर, दिल्ली या टापूचा ऐतिहासिक ओघ गंगा-सिंधूप्रमाणे अखंड वहात आला आहे. भरतखंडाचा इतिहास आणि भवितव्य घडवणारे बहुतेक सर्व प्रसंग आणि संग्राम याच पुरातन रणभूमीवर होत आले आहेत.

परशुरामानं याच भूमीत मदांध व उन्मत्त लोकांना, मारून रक्ताचे पांच डोह या ‘स्यमंतपंचकांत’ निर्माण केले आणि पुढे याच डोहांची, ऋषींच्या आशीर्वादानं तिथे पवित्र तीर्थ झाली. कुरुराजानं इथे महान् तपश्र्चर्या केली. त्यानं जे पुण्य संपादन केलं, त्यामुळे या स्थळास कुरुक्षेत्र असं पवित्र नांव मिळालं. चांद्रवंशीय व पुरुकुलोत्पन्न हस्तिराजानं प्रसिध्द हस्तिनापूर हे नगर याच कुरुक्षेत्रांत बसवलं. यासंबंधीचीहि एक पुराणकथा आहे. अत्रिपुत्र सोमऋषि वनांत हिंडत असतांना एका ठिकाणी एका पक्ष्यानं झपाट्यानं येऊन एका प्रचंड हत्तीला उचलूव भरारीसरशी आकाशांत नेल्याचं त्याला दिसलं. तेव्हा ही यशस्वी भूमि म्हणून तिथे त्यानं नगर वसवलं; आणि त्यास हस्तिनापूर असं नांव दिलं. कौरव-पांडवांचे अखेरचे तंटे व अखेरचं महायुध्द याच नगरांत व एकूण कुरुक्षेत्रांत झालं. कौरव-पांडवांच्या वैरांतून पुढे इंद्रप्रस्थ नांवाचं नवं नगर वसलं. पांडव सर्व संकटांतून निभावून हस्तिनापुराला परत आल्यानंतर उभयतांमधील भाऊबंदकी, सान्निध्यामुळे विकोपास जाऊं नये म्हणून धृतराष्ट्रानं पांडवास अर्ध राज्य तोडून दिलं आणि हस्तिनापूरच्या नैऋत्येस पन्नास मैलांवरील खांडववनांत नवं नगर वसवण्यास अनुमति दिली. तेच हे इंद्रपआस्थ ऊर्फ अर्वाचीन दिल्ली!

त्या वेळी खांडववनांत असुर नांवाच्या जातीची व तक्षक नांवाच्या नाग जातीची मोठी वस्ती होती. खांडववनाच्या एका बाजूचा भाग तोडून रान मोकळं केल्यावर पांडवांनी तिथे आपलं नगर वसवलं व त्याला खांडवप्रस्थ असं नांव दिलं. ही नगरी त्यांनी इतकी शोभिवंत बनवली की, तेथील रहिवाश्यांना ती इंद्राची अमरावती वाटे. म्हणून त्यांनी मोठ्या अभिमानानं या नगरीस इंद्रप्रस्थ नांव दिलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org