इतिहासाचे एक पान. २४४

महाराष्ट्रांत त्यांना लोकप्रियता लाभलीच होती. महाराष्ट्र राज्यांतल्या प्रशासनामध्ये आवश्यक त्या सुधारणा झालेल्या आहेत, लाचलुचपतीला आळा बसला आहे, मतभेदांच्या प्रश्र्नांबाबत बराचसा सलोखा निर्माण झाला आहे, एस आता विरोधी पक्ष आणि समाजांतले अन्य थर मान्य करूं लागले होते. ‘देशांतील सर्वोत्तम मुख्य मंत्री’ असा गौरव करण्यासाठी साथी जयप्रकाश नारायण हेहि या वेळी पुढे सरसावले. वस्तुस्थितीच तशी होती.

यशवंतरावांनी महाराष्ट्रांत काँग्रेसची गेलेली प्रतिष्ठा तर सावरलीच, पण त्याचबरोबर काँग्रेसला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकींत भक्कम बहुमत मिळवून काँग्रेस सरकार स्थिर बनवलं होतं आणि विकासाचे कार्यक्रम चढत्या भांजणीनं सुरू ठेवले होते. राज्यानं विविध क्षेत्रांत अग्रेसरत्व प्रस्थापित करण्यासाठी यशवंतरावांनी आपल्या मनाशी कांही महत्वाकांक्षी योजना तयार केल्या होत्या. एक वेगळं स्वप्न ते पहात होते. पुढच्या पांच वर्षांच्या अवधींत महाराष्ट्र राज्य हे अस्सल पुरोगामी आणि समृध्द राज्य बनवण्याचं चित्र त्यांच्या मनांत तयार झालं होतं. त्यांचं हे स्वप्न महाराष्ट्रांत साक्षात् अवतरलं आहे असं त्यांना पहायचं होतं आणि महाराष्ट्रा व देशाला त्या स्वप्नाचं दर्शन घडवायचं होतं. परंतु.....

परंतु त्याच सालांत, १९६२ मध्ये मोठ्या नाट्यपूर्ण रीतीनं यशवंतरावांना मुंबई सोडून दिल्लीला धावावं लागलं. देशाच्या संरक्षणाची, जोखमीची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागली. संरक्षण-मंत्रिपद सांभाळावं लागलं. सर्वच अनपेक्षित !

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं विदर्भाचे नेते मारोतराव कन्नमवार यांच्या स्वाधीन करून संरक्षणमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारण्यासाठी २० नोव्हेंबर १९६२ ला यशवंतराव दिल्लींत दाखल झाले. यशवंतराव दिल्लीत पोचले, परंतु ते येण्यापूर्वी संरक्षणखात्यात फार मोठं रामायण घडून आलं होतं; सारीच उलथापालथ झाली होती. भारतावर चीननं ज्या सीमेवरून हल्ला चढवला होता तिथेहि बरंच कांही घडून गेलं होतं. यशवंतरावांना – या नव्या संरक्षण मंत्र्यांना घडामोडीची पुसटशी देखील कल्पना नव्हती. हातांत कोरी पाटी-पेन्सिल देऊन पं नेहरूंनी या जबाबदारीच्या जागेवर त्यांना स्थानापन्न केलं ! पुरोगामी आणि समृध्द महाराष्ट्राचं त्यांनी मनाशी बाळगलेलं स्वप्न मागे अपुरंच राहिलं !

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org