इतिहासाचे एक पान. २४२

स्थानिक संस्था निश्र्चितपणे मदत करूं शकतात; परंतु या संस्था ज्यांच्या हाती सोपवायच्या ती माणसं, त्यांना कामाकरिता मिळणा-या प्रेरणा, हातांत आलेली यंत्रणा राबवून घेणा-या माणसांचे विचार या गोष्टी अर्थातच महत्वाच्या मानल्या पाहिजेत. संस्था चालवण्याती जबाबदारी ज्या माणासांवर पडेल ती माणसं वृत्तीनं सेवाभावी आणि त्यागी असली पाहिजेत. अशा माणसांची महाराष्ट्रांत उणीव आहे किंवा पुढच्या काळांत ही उणीव भासेल असं यशवंतरावांना कधीच वाटलं नाही. या व्यक्तींना काम करण्याची संधि मिळाली पाहिजे एवढाच त्यांचा आग्रह होता आणि त्यामुळेच संधि देण्याच्या मार्गात जी आडकाठी येईल ती दूर करण्याची त्यांच्या मनानं तयारी केली होती. त्यामुळेच ही योजना त्यांनी आपल्या मताप्रमाणे सुरू केली.

तत्वाशी तडजोड करण्याचा गुण यशवंतरावांनी आपल्या ठिकाणी कधीच वाढू दिला नाही. मंत्र्यांची निवड करतांना आणि त्यांच्याकडे खात्यांची जबाबदारी सोपवताना, मंत्रिमंडळ हे विविध प्रश्र्नांवर एकजीव, समानधर्मी राहील याकडे त्यांनी त्याचसाठी कटाक्षानं लक्ष पुरवलं आणि त्यामुळे नव्या राज्याच्या कामाचा बोजा त्यांना पेलता आला. कोणाच्या दबावानं, त्यांनी मंत्रिमंडळांत नको असलेल्यांचा समावेश होऊं दिलेला नाही. असं सांगितलं जातं की, एका प्रसंगी स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एका विशिष्ट व्यक्तीचा मंत्रिमंडळांत समावेश करावा असं यशवंतरावांना सुचवलं; परंतु यशवंतरावांनी न कचरता पंडितजींसमोर अडचणीचा उलगडा केला. नेहरूंनीहि मग आपला आग्रह सोडून दिला. त्या विशिष्ट व्यक्तीचा मंत्रिमंडळांत समावेश झाला नाही.

राष्ट्रीय पातळीवरील प्रश्र्नाबाबत घाईघाईनं मतप्रदर्शन करायचं नाही, परंतु तत्वाचा प्रश्र्न निर्माण झाल्यास, सौम्य शब्दांत, कोणाहि श्रेष्ठाचा मुलाहिजा न ठेवतां किंवा दबून न जातां आपलं मत नोंदवण्याचा यशवंतरावांचा एक विशिष्ट बाणा आहे. अनेकदा त्यांनी तो दाखवला आहे. पं. नेहरूंच्या उपस्थितीत, एखाद्या प्रश्र्नाबाबत मतभेद व्यक्त करण्याचं धाडस कोणी क्कचितच करत असत. परंतु राष्ट्रीय पातळीवरील प्रश्र्नांच्या चर्चेच्या वेळी यशवंतरावांनी पं. नेहरूंच्या उपस्थितींत आपला मतभेद व्यक्त केल्याचीहि उदाहरणं आहेत. नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या एका बैठकीत हे घडल्याची नोंद आहे. तिरकस मनानं किंवा वृत्तीनं ते ही भूमिका घेत नाहीत. तत्वाबाबत तडजोड नाही हाच बाणा तिथेहि असतो.

हाच बाणा कायम राखून त्यांनी महाराष्ट्राचा राज्यशकट चालवला. पंचायत राज्य आणि जिल्हा-परिषदांची स्थापना हे यशवंतरावांनी आपल्या कारकीर्दीत केलेलं सर्वात मोठं कार्य आहे त्या जिल्हा-परिषदांचा कारभार आजअखेर सुरू आहे. जिल्हा-परिषदेच्या कांही कारभा-यांवर नंतरच्या काळांत लाचलुचपतीचे आणि ते आपल्या गटांतल्या लोकांवर मेहरबानी करत असल्याचे आरोप येऊं लागले हे खरं. परंतु हा प्रश्र्न त्या त्या व्यक्तीच्या स्वभावाशी निगडित आहे. महाराष्ट्राला ज्या एका विधायक कार्याची दिशा यशवंतरावांनी दाखवून दिली, त्यांतून निर्माण झालेले आणि होणारे फायदे मात्र निर्विवाद आहेत.

जिल्हा-परिषदा आणि पंचायत-समित्या यांच्या द्वारा महाराष्ट्रांत जो नवा पुढारीवर्ग जन्मास आला, त्यामुळे महाराष्ट्राचा राजकीय चेहरा-मोहरा पार बदलून गेला आहे. महाराष्ट्र हे देशांतलं एक स्थिर राज्य असल्याची प्रचीति नंतरच्या काळांत येत राहिली; त्या कर्तृत्वातं श्रेय यशवंतरावांनी राज्यामध्ये शिक्षण, सहकार, शेती, उद्योगधंदे आणि लोकशाही विकेंद्रीकरण यांसारख्या क्षेत्रांत जो जिवंतपणा निर्माण केला आणि ग्रामीण भागांतल्या जनतेच्या मनीमानसी विकासाची बीजं रुजवली त्यालाच दिलं पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org