इंग्रज सरकार हीच हिंदुस्थानच्या अभ्युदयाच्या मार्गांतील सर्वांत मोठी धोंड असल्यामुळे अवांतर गोष्टींवर सांप्रत शक्ति वेचण्यापेक्षा लोकांची प्रतिकार-बुद्धि जागृत करण्यावर लो. टिळकांनी भर दिलेला होता. आगरकर हे सामाजिक सुधारणावादाचा आग्रह धरुन होते. न्या. रानडे यांनी बुध्दिनिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, समता व उदारता ही मूल्यं येथील लोकव्यवहारांत रुजविण्याचा प्रयत्न सुरु ठेवला होता. याउलट टिळकांनी राजकारणाला समाज-जीवनांत अग्रस्थान दिलं आणि राजकीय उपयुक्ततेची कसोटी लावूनच त्यांनी सुधारणांची क्रमवारी सांगितली. प्राश्चात्य विचारवंतांचं, व्यक्तिवादाचं व बुद्धिवादाचं तत्त्वज्ञान स्वीकारुन आगरकर हे सामाजिक सुधारणांचा आग्रह धरुन राहिले, पण महाराष्ट्रांतील आणि देशांतील ज्या समाजाला हें तत्त्वज्ञान आगरकर शिकवूं पहात होते, त्यांच्यामध्ये तें पेलण्याची आणि पचवण्याची शक्ति नव्हती. पाश्चात्त्य राष्ट्रांप्रमाणे हिंदुस्थानांतला समाज तळापासून हालला नव्हता. एका बाजूला पुरोहित आणि सरंजामदार यांचं वर्चस्व आणि त्यांना हटवून राजकीय व आर्थिक सत्ता काबीज करण्याचा व्यापारीवर्गाचा प्रयत्न सुरु होता. जुना वर्ग परंपरा आणि संस्कार यांच्याच ताब्यांत अडकून पडला होता. या परिस्थितींतून समाजाला बाहेर काढण्यासाठी आगरकरप्रणीत सामाजिक सुधारणेला विरोध करीत असतांना टिळक हे जनतेमध्ये स्वाभिमान निर्माण करुन लोकांनी लढण्यासाठी सिद्ध व्हावं यासाठी प्रयत्न करीत होते. सुधारणेचा वाद लढवीत असतांनाच टिळकांनी आपलं खरं लक्ष राष्ट्रीय चळवळ जोपासण्यावर आणि वाढवण्यावर ठेवलं. मूठभर सुशिक्षितांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा महाराष्ट्रांत व देशांत पसरलेला अफाट बहुसंख्य शेतकरी समाज, गरीब निर्धन समाज, यांस राजकीय चळवळींत सामील करण्यावर त्यांनी भर दिला. यासाठी त्यांनी प्रांतिक सभेंत शेतक-यांनाहि आपलं. ज्यांच्या दु:खाबद्दल सरकारकडे दाद मागायची त्यांनी तें ऐकावं हा त्यामागे स्वच्छ हेतु होता. त्याचा इष्ट असा परिणाम घडत राहिला. हिंदुस्थानांत इंग्रज सरकारविरुध्द असंतोष घुमसत रहाण्यास या धोरणाची मदत झाली.
याच काळांत समाजाच्या उद्धाराचा झेंडा घेऊन म. ज्योतीराव फुले पुढे सरसावले; समाजोद्धाराची त्यांची तळमळ प्रचंड होती. आपल्या कांही ब्राह्मण मित्रांच्या साहाय्यानंच त्यांनी समाजोद्धाराचे प्रयोग प्रारंभी सुरु केले आणि त्यांत ते कांही प्रमाणांत यशस्वीहि झाले. अज्ञान, दारिद्र, रुढींत रुतलेल्या अशा हिंदु समाजाला ज्योतिबांनी अंतर्मुख बनवण्याची मोठी कामगिरी केली. 'सत्यशोधक-समाज' स्थापन करुन महाराष्ट्रांत त्यांनी एक वेगळाच, आपला असा संप्रदाय निर्माण केला. महाराष्ट्र समाजांत कसलाहि एकोपा नव्हता. जातीभेदानं समाजरचना पोखरुन गेली होती. आनुवंशिक उच्चनीचतेच्या कल्पनांनी लोक पछाडलेले होते. ब्राह्मण आपलं पिढीजात श्रेष्ठत्व कवटाळून बसलेले, तर मराठा आणि तत्सम शेतकरी समाज, अस्पृश्यांना विशेषत: महारांना दर ठेवण्यांत गुंतलेला ! ज्योतिबांनी या सा-यांच्या मनोवृत्तीवर प्रहार लगावण्यास सुरुवात करतांच समाज खडबडून जागा झाला.
रानडे, लोकहितवादी हे समाज-सुधारकच होते आणि म. ज्योतिबा फुले हेहि समाज-सुधारकच होते. पण म. फुले यांची झेप मोठी. विचार आणि आचार त्यांनी एकत्र केला, प्रत्यक्ष आचार करतांना असामान्य धैर्य दाखवलं. चातुर्वर्ण्य, अस्पृश्यता, जातिभेद, उच्चनीचता हे ज्यावर आधारलेले होते त्या हिंदुधर्मशास्त्रावरच त्यांनी जोराचा हल्ला चढवला आणि ब्राह्मणवर्गाच्या वर्तनावर, आचरल्या जाणा-या विषमतेवर, अन्याय आणि जुलमावर विदारक टीका केली. हें करीत असतांना. ज्योतिबांनी अनेक संकटांना तोंड दिलं. त्यांच्यावर प्राणसंकटहि आलं, पण ते कचरले नाहीत. दलित जनतेच्या उद्धाराचं, गरिबांना माणुसकी मिळवून देण्याचं कार्य त्यांनी धडाक्यानं सुरुच ठेवलं. ब्राह्मणांच्या सत्तेपासून दलितांचं संरक्षण व्हावं यासाठी त्यांनी त्या काळांतल्या इंग्रज सरकारकडेहि आशेनं पाहिलं. ज्योतिबांनी लढा केला तो ब्राह्मणांच्या अहंकाराविरुध्द, सनातन हिंदुधर्मशास्त्राविरुध्द, मूर्तिपूजेविरुध्द, स्त्री-दास्याविरुध्द. पण ब्राह्मणेतर समाजाला ज्योतिबांचं खरं तत्त्वज्ञान आत्मसात करतां आलं नाही, पचवता आलं नाही. त्यांच्या सत्यशोधक चळवळींतून ब्राह्मणेतरांनी फक्त ब्राह्मण-द्वेषच उचलला. त्यांनी आपल्यांतले जातिभेद, जातीय उच्चनीच भाव कायमच ठेवला. त्यामुळे जातिभेद. चातुर्वर्ण्य समूळ उपटून टाकण्याचं ज्योतिबांचं कार्य पूर्ण होऊं शकलं नाही. त्यांच्यानंतर महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनीहि ज्योतिबांच्या कार्यालाच वाहून घेतलं. पण त्यांच्याकडूनहि फांद्या तोडण्याचं काम झालं. मूळ कायमच राहिलं. महारांची सेवा करतात म्हणून ब्राह्मणेतरवर्गानं महर्षि विठ्ठल रामजींना बहिष्कृत केलं. त्या काळांत तरी बहुजन-समाजांत, आपण आपला उद्धार करणार आहोंत ही भावना निर्माण होऊं शकली नाही, मूळ धरुं शकली नाही. ज्योतिबांचं कार्यक्षेत्र होतं पुणें-कोल्हापूर. शाहू महाराजांनीहि ज्योतिबांचा समाज-सुधारणेचा कार्यक्रम प्रत्यक्षांत उतरविण्यासाठी सक्रिय नेट धरला होता. या आंदोलनचाच्या लाटा जिल्ह्या-जिल्ह्यांत पसरत राहिल्या. कोल्हापूर, सातारा आणि साधारणत: दक्षिण महाराष्ट्र या नव्या विचारानं त्या वेळीं भारावला होता.