इतिहासाचे एक पान. २३९

१९५२ आणि १९५७ च्या निवडणुकीच्या वेळी चव्हाण-हिरे या जोडीनं सारा महाराष्ट्र ढवळून काढला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्र्नाच्या वेळी या दोन नेत्यांत कांही बाबतींत कुरबुरी झाल्या असल्या, तरी हिरे यांना यशवंतरावांनी नेते मानलं होतं. निरनिराळ्या ठिकाणी होणा-या शिबिरांतून स्वतः हिरे हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित रहात असत. यशवंतरावांच्या मंत्रिमंडळांत त्यांचा समावेश जरी झालेला नव्हता, तरी या दोघांमध्ये एकमेकांविषटीचा आदर कायम होता आणि सल्लामसलतहि सुरू राहिली होती. निवडणुका ऐन तोंडावर आल्या असतांना भाऊसाहेबांचा स्वर्गवास घडावा याचं दुःख तर यशवंतरावांना होतंच, पण त्याहीपेक्षा एक हाडाचा नेता आणि महाराष्ट्र राज्याचा सच्चा पुरस्कर्ता, आपला सन्मित्र हरपला याचं दुःख त्यांना अधिक जाणवलं.

यशवंतराव स्वतः या निवडणुकींतले एक उमेदवार होतेच. कराड उत्तर-मतदार-संघ या त्यांच्या पूर्वीच्याच मतदार-संघांतून ते निवडणूक लढवणार होते. महाराष्ट्र प्रदेश-काँग्रेसचं अध्यक्षपद त्या वेळी विदर्भाचे नेते गोपाळराव खेडकर यांच्याकडे होतं. १९५७ सालापासूनच प्रदेश-काँग्रेस कमिटीच्या रचनेत आणि कार्यांत यशवंतरावांनी जिवंतपणा आणला होता. पक्ष आणि सरकार यांच्यांत एकसूर रहाण्यासाठी त्यांनी या काळांत विशेष प्रयत्न केले. अनेक नव्या कार्यकर्त्यांना त्यांनी कामाचं नवं क्षेत्र मिळवून दिलं. त्यामुळे निरनिराळ्या पक्षांतले, विशेषतः शेतकरी-कामकरी पक्ष, प्रजासमाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष या पक्षांतले अनेक लहानमोठे कार्यकर्ते काँग्रेस-प्रवेश करू लागले.

काँग्रेस-प्रवेशाचे त्या वेळी जाहीर समारंभ घडत होते. प्रजासमाजवादी पक्षांतल्या कांही कार्यकर्त्यांचा काँग्रेस-प्रवेशाचा आविर्भाव मात्र वेगळा असे. समाजवादाच्या मार्गानं काँग्रेस-पक्षाची वाटचाल सुनियंत्रित करण्यासाठी म्हणून कांहींना काँग्रेस-प्रवेश करायचा होता. प्रवेश-समारंभाच्या वेळी भाषणातून ही मंडळी तसं वक्तव्यहि करत. जणू कांही यांच्या काँग्रेस-प्रवेशामुळेच काँग्रेसचं ध्येय-धोरण, वाटचाल जनताभिमुख बनणार होती!

काँग्रेसला सज्ञान करण्याचा त्यांचा हा आविर्भाव काँग्रेस-अंतर्गत मंडळींना खटकत असे. अंतर्गत कुजबूज अशी जेव्हा वाढत राहिली तेव्हा यशवंतरावांनी अशाच एका समारंभाचा मोका गाठून काँग्रेस-प्रवेश इच्छुकांना आपापल्या जागा दाखवल्या. काँग्रेसचं ध्येय-धोरण निश्र्चित झालेलं आहे, हा जनतेचाच पक्ष आहे, निश्र्चित ध्येयधोरणाच्या दिशेनं पक्षाची वाटचाल सुरू आहे तेव्हा भलता आविर्भाव व्यक्त करून काँग्रेस-प्रवेश करण्याऐवजी, कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी पूर्ण विचार करावा आणि मोकळ्या मनानंच काँग्रेस-प्रवेश करावा असा हितोपदेश त्यांनी केला.

महाराष्ट्रातलं एकूण वातावरण त्या काळांत काँग्रेसला चांगलंच अनुकूल बनलं होतं. त्यांतच उमेदवारी बहाल करतांना चव्हाण-खेडकर यांनी, निरनिराळ्या जिल्ह्यांतल्या नव्या कार्यकर्त्यांना संधि देण्याचं धोरण अवलंबल्यानं, कार्यकर्त्यांमध्ये आगळाच उत्साह निर्माण झाला आणि नवे कार्यकर्ते नवी फौज घेऊन निवडणुकीच्या कामाला लागले. काँग्रेस-पक्षावरील आणि प्रदेश-काँग्रेसवरील विशिष्ट लोकांची मक्तेदारी संपवण्याचा प्रारंभ अगोदर सुरू झालेलाच होता; निवडणुकीच्या निमित्तानं मग ठामपणानं त्या दिशेनं निर्णय करण्यांत आले.

महाराष्ट्र विधानसभेच्या २६५ जागांसाठी ही निवडणूक फेब्रुवारी १९६२ मध्ये झाली आणि त्यामध्ये काँग्रेसपक्षानं २१४ जागा मिळवून प्रचंड विजय संपादन केला. त्या अगोदरच्या म्हणजे १९५७ च्या निवडणुकीत या पक्षाचं पानिपत झालं होतं; तोच पक्ष आता महाराष्ट्रांतला सर्वशक्तिमान पक्ष ठरला. पुण्यासारख्या राजकीयदृष्ट्या जागरूक असलेल्या शहरानं, १९५७ च्या निवडणुकींत काँग्रेस-पक्षाला एकहि विजय मिळूं दिलेला नव्हता तिथे आता, विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकींत सर्व विजय काँग्रेसला मिळाला. नामदेवराव मते हे त्या वेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org