इतिहासाचे एक पान. २३५

मुंबईला सचिवालयांत पानशेत-पुराचं वृत्त समजतांच यशवंतराव तातडीनं पुण्याला पोचण्यासाठी विमानानं निघाले. मुख्य मंत्र्यांचं विमान पुण्याला पोचलं आणि शहरावर घिरट्या घालूं लागलं तेव्हा हृदयाचा थरकाप करून सोडणारं पुणे शहराचं दृश्य दिसूं लागलं. डोळ्यांतल्या अश्रूंना आवर घालतच ते दृश्य पहावं लागणार होतं. शेकडो घरं पाण्यांत बुडाली होती. पाण्याचा प्रचंड लोंढा, आडवे येईल त्याला पोटांत घेऊन सुसाट धांवत होता. हजारो लोक गच्चीवर, झाडावर, पर्वतीच्या टेकडीवर उभे राहून पुराचं रौद्र स्वरूप पहात होते. ज्यांचं सर्वस्व गेलं ते आक्रोश करत होते. सर्वत्र घबराट, अस्वस्थता निर्माण झालेली दिसत होती. विमान आकाशांत फिरत राहिलं होतं. विमान जमिनीवर उतरवून, लोकांचं सांत्वन करण्यासाठी, त्यांना मदतीचा हात देण्यासाठी शहरांत पोंचायचं तर पुराच्या पाण्याखाली सर्व रस्ते बुडालेले होते. नदीवरील पूल उखडले गेले होते. विजेचे खांब आणि तारा तुटून वाहून गेल्यामुळे सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलेलं होतं. लोकांना रहायला घर नाही, प्यायला पाणी नाही, उजेडासाठी वीज नाही, सर्वत्र घबराट आणि गोंधळ असंच सारं वातावरण निर्माण झालं होतं. १२ जुलैचा सबंध दिवस आणि रात्र अशाच अनिश्र्चिततेच्या आणि गोंधळाच्या अवस्थेत गेली.

या पुरानं केवढं रौद्र स्वरूप धारण केलं होतं ते, पुरामुळे झालेल्या हानीची सरकारी अधिकृत आकडेवारी नंतर जाहीर झाली त्यावरून लक्षांत येतं. अर्थात् झालेल्या हानीचा तो सरकारी अंदाज होता. प्रत्यक्षांत, यापेक्षा अधिक हानि झाली असण्याचीहि शक्यता नाकारतां येणारी नव्हती. लोकांमध्ये तशी कुजबूजहि होती.

पुरामुळे गृहहीन झालेल्या नागरिकांना आश्रयासाठी जागा उपलब्ध करून त्यांच्यासाठी अन्न, पाणी, कपडे, औषधं इत्यादींची तातडीनं व्यवस्था करणं अगत्याचं होतं. पुराचं पाणी ओसरल्यानंतर शहरांत प्रवेश करण्यासाठी मुळा नदीवरील येरवडा भागांतला, बंडगार्डन शेजारचा होळकर पूल हा एकच शिल्लक राहिलेला होता. याच पुलावरून यशवंतराव आणि त्यांच्या समवेत असलेली सरकारी अधिकारी मंडळी यांनी शहरांत प्रवेश केला.

यशवंतरावांनी परिस्थितीचा अंदाज घेतला आणि जिल्हाधिका-यांकडे २० लक्ष रूपये सोपवून तातडीनं मदतकार्य सुरू करण्याचा आदेश दिला. सरकारच्या वतीनं मदतकार्यासाठी म्हणून एक सल्लागार समिति स. गो. बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यांत आली. मदतकार्याची पध्दतशीर आखणी करून प्रत्येक गरजू माणसापर्यंत मदत पोचेल अशा पध्दतीनं एकूण मदतकार्याची रचना करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या.

गृहहीन झालेल्यांसाठी तात्पुरती आणि कायम स्वरूपाची अशी रहाण्याची दुहेरी व्यवस्था करावी लागणार होती. हा प्रश्र्न सोडवण्यासाठी सैनिकी अधिकारी, मुलकी अधिकारी, सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्यानं एक योजना तयार करण्यांत आली. शहरांतल्या नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याची पर्यायी योजना करणं अगत्याचं होतं. त्यासाठी मग मुळशी धरणांतलं पाणी टाटांकडून उपलब्ध करण्यासाठी धांवपळ सुरू झाली. एक-दोन दिवसांतच ८५ टक्के नागरिकांना प्रत्यक्षांत ते उपलब्धहि करून दिलं गेलं. महापालिका वरिष्ठ अधिका-यांना या वेळी या कामाचा जास्तीत जास्त बोजा सहन करावा लागला.

पुराच्या दुस-या दिवशी पूरग्रस्त भागांत हिंडून यशवंतरावांनी स्वतः शहराच्या हानीची पहाणी केली तेव्हा मदतीची व्याप्ति फार मोठ्या प्रमाणांत वाढवावी लागणार आहे असं त्यांना आढळून आलं. अन्नपुरवठ्यासाठी शेकडो केंद्रं सुरू करावी लागणार होती. धान्यपुरवठा, राँकेल, पेट्रोल, औषधं आणि रोख मदत हे सर्वच द्यावं लागणार होतं. शहरांतल्या निरनिराळ्या ठिकाणच्या शाळांच्या इमारतींमध्ये हजारो गृहहीन निराश्रित जमा झालेले होते. पुरानं वेढलेला सारा भाग पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ आणि ढासळलेली घरं यांमुळे चिखलमय बनला होता. काँल-यासारखी रोगराई त्यांतून उद्भवण्याची आणि सर्व शहरांत साथ पसरण्याची मोठी धास्ती होती. त्यामुळे सर्वप्रथम पूरग्रस्त भागांत साठलेली घाण, केरकचरा, चिखल काढून टाकून तो भाग स्वच्छ करण्याच्या कामास त्यांनी अग्रक्रम दिला आणि गाळ वाहून नेण्याचं काम लष्कराच्या मदतीनं सुरू केलं. ७५ लष्करी मालमोटारी त्यासाठी सज्ज करण्यांत आल्या आणि त्याच वेळी लोकांना काँलराप्रतिबंधक लस टोचण्याचं कामहि सुरू करून दिलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org