इतिहासाचे एक पान. २३०

आर्थिक आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा विडा उचलून, क्रांतिकारक पावलं टाकीत यशवंतरावांची भ्रमंती सर्वत्र सुरू राहिली. महाराष्ट्राचं मन प्रफुल्लित झालं होतं. यशवंतरावांचे विचार ऐकून मराठी माणसं जेव्हा जोरानं कामाला लागली त्या वेळी ‘लक्ष-लक्ष शून्यांतून कांही श्रेय साकारत आहे’ असं वर्णन करण्यासाठी कवींनीहि आपली प्रतिभा खुली केली. यशवंतरावांच्या वाणीनं आणि प्रत्यक्ष कृतीनं महाराष्ट्राला आकार मिळवून देण्याची प्रेरणा व चेतना सर्वत्र निर्माण झाली होती. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळांत महाराष्ट्रांत प्रथमच हे घडलं, ही वस्तुस्थिति होय.

यशवंतरावांचं स्वतःचं जीवन एकारलेलं नसल्यानं आणि त्यांना अनेक विषयांत रस असल्यानं कोणत्याहि मेळाव्यांत ते जावोत, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा एकजुटीचा, प्रेमाचा, विधायक वृत्तीचा आणि कर्तृत्वाचा संदेश देणं त्यांना सहजगत्या शक्य झालं. शिवछत्रपतींचं पुण्यस्मरण असो, टिळक पुण्यतिथि असो, महाकवि रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मशताब्दी-महोत्सव असो, किंवा डाँ. आंबेडकरांच्या विचारपरंपरेचा सूत्राचा पाठपुरावा त्यांनी सातत्यानं केला.

निरनिराळ्या सभांतून, मेळाव्यांतून उत्कट भावनेतून यशवंतराव जेव्हा बोलत असत त्या वेळी विद्वानांचीहि त्यांना दाद मिळे. कांही फाजील घमेंडखोर पुस्तकी बुध्दिवादी याला अपवाद असले तर असूं शकतील, इतकंच! नाही तरी सर्वच बुध्दिवादी मनानं मोठे असतात असं नव्हे. त्यांच्या बुध्दीची वाढ झालेली असली, तरी मन क्षूद्रच राहिलेलं असतं. दुस-याचं कर्तृत्व, बुध्दि याचा मोठेपणा मान्य करायचा, तर त्याला स्वतःचं मनहि मोठं असावं लागतं, बनवावं लागतं. मन आणि बुध्दि या दोन्ही ठिकाणी विशालता येणं हे देणं ईश्र्वराचं ! यशवंतरावांसारख्या एखाद्यालाच ते मिळून जातं. अशी देणगी मिळालेली व्यक्तीच समाजांतील सर्व थरांबद्दल मानव्याच्या दृष्टिकोनांतून विचार करूं शकते, कृति करूं शकते.

राज्याच्या तिजोरीचा आणि साधनसामग्रीचा उपयोग करतांना कोणत्या कामांना अग्रक्रम द्यायचा यावर अविकसित राज्याच्या सरकार-प्रमुखानं आणि प्रशासकांनी बारकाईनं लक्ष ठेवणं जरूर असतं. साधनसामग्री ही मर्यादित असूं शकते. आर्थिक भार सहन करण्याची तिजोरीची मर्यादाहि ठरलेली असते. अशा वेळी महत्वाच्या प्रश्र्नांना अग्रक्रम देण्यांत दुर्लक्ष झालं, तर समतोल विकास साध्य करणं कठीण ठरतं. अविकसित राज्यांत दारिद्र्य हे सर्वदूर पसरलेलं असल्यामुळे सरकारला कराच्या रूपानं पैसा उभा करणं हे मोठच जिकीरीचं ठरतं. राज्याच्या पहिल्या, दुस-या आणि तिस-या पंचवार्षिक योजनांचे आराखडे तयार होत असतांना नियोजन-विभागाशी मंत्री आणि नंतर मुख्य मंत्री या नात्यानं यशवंतरावांचा निकटचा संबंध होता. कोणत्या कामांना अग्रक्रम मिळावा यासाठी प्रारंभापासूनच वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून अग्रक्रमाच्या बाबतीत ते दक्ष होते. शक्तीचा अपव्यय होऊ नये याची काळजी त्यांनी सातत्यानं बाळगली.

राज्यांत जी साधनं असतील त्या साधनांचा जास्तीत जास्त विकास करून महाराष्ट्रजीवनाला समृध्द बनवणं हे त्यांनी आपल्या नियोजनाचं प्रमुख सूत्र तर ठरवलंच, त्याचबरोबर या प्रयत्नांतून निर्माण होणारी संपत्ति, शक्ति, सामर्थ्य याचा फायदा सर्वसामान्य माणसाला मिळावा यावरहि त्यांचा कटाक्ष राहिला. महाराष्ट्राच्या दृष्टीनं जमीन, शेती आणि मनुष्यबळ हीच यशवंतरावांच्या मतानं प्रमुख साधनसंपत्ति असल्यानं या साधनाचा जास्तीत जास्त उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी करणं यावरच त्या काळांत त्यांना भर द्यावा लागणार होता.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org