इतिहासाचे एक पान.. २३

१८८५ च्या डिसेंबरमधअये देशांतील सर्व राजकीय पुढा-यांनी मुंबईस एक बैठक घेतली. या बैठकीसाठी सेवानिवृत्त इंग्रज सनदी अधिकारी ए. ओ. ह्यूम यांचे सहकार्य मिळवलं आणि सर्व पुढा-यांनी मिळून 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस' स्थापन करण्याचा निर्णय केला. पहिले अध्यक्ष म्हणून डब्ल्यू. सी. बानर्जी यांची निवडहि केली. राष्ट्रीय काँग्रेसची चळवळ सुरु झाल्यानंतर कांही वर्षांनी ब्रिटिशांची वृत्ति मात्र पार बदलली. भारतांतील आपले हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी, राजकीय हेतूनं, त्यांचे डावपेच मग सुरु झाले. राष्ट्रीय चळवळीचा जोर वाढूं लागला आणि भारतीय जनता साम्राज्यसत्तेला धोक्यांत आणण्याचा संभव वाढत रहातांच ब्रिटिशांनी क्रमाक्रमानं 'फोडा व झोडा' अशा भेदनीतीनं राज्यशकट चालू ठेवण्याचा मनस्वी प्रयत्न सुरु केला.

यशवंतराव बालपणांतून पुढे सरकर होते त्या काळांत राष्ट्रीय जीवनांत अनेक उलथापालथी घडत राहिल्या होत्या. १९१४ सालीं यशवंतरावांचा जन्म झाला त्या काळांत राष्ट्रीय जीवनांत अनेक उलथापालथी घडत राहिल्या होत्या. १९१४ सालीं यशवंतरावांचा जन्म झाला त्या काळांत ग्रेट ब्रिटननं जर्मनीशीं युध्द पुकारलं होतं. त्यामुळे भारतहि युद्धांत ओढला गेला होता. लो. टिळक मंडालें येथील सहा वर्षांची शिक्षा संपवून याच सालीं परतले होते. इंग्रज सरकारविरुध्द देशांत सर्वत्र असंतोष धुमसत होता. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होऊनहि आता दोन तपांचा काळ उलटला होता आणि हिंदुस्थानांतील निरनिराळ्या शहरी काँग्रेसचीं अधिवेशनं भरविण्यांत येत होतीं. १९९४ च्या पहिल्या महायुद्धाच्या प्रारंभी, भारतीय पुढा-यांनी ब्रिटनला आपली सहानुभूति व पाठिबा व्यक्त केला, परंतु यामागे निश्चित हेतु होता. ब्रिटिशांची बाजू घेतल्याच्या बदल्यांत भारताला राजकीय सुधारणा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणीच काँग्रेसनं उघडपणें केली. परंतु भारतानं दिलेल्या सहकार्याबद्दल, भारताला राजकीय सुधारणा दिल्या जाण्याचं चिन्ह पुढच्या काळांत दिसेना, तेव्हा भारतीयांचा पहिला उत्साह मावळला.

याच वेळीं सर फिरोजशहा मेहता आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचं निधन झालं. लो. टिळक मंडाल्याहून परत आलेच होते. या दोन घटनांमुळे काँग्रेसमधील मवाळनेमस्त आणि जहाल एकत्र आले आणि १९१५ सालीं मुंबईच्या काँग्रेस-अधिवेशनांत श्रीमती अॅनी बेझंट सुचनेवरुन, जहालांना सभासदत्व खुल केलं. भारताला पूर्ण स्वराज्य मिळवून देणं हे अॅनी बेझंट यांचं राजकीय उद्दिष्ट होतं. आयर्लेंडमधील बंडापासून स्फूर्ति घेऊन त्यांनीच पुढे १९१६ साली सप्टेबर महिन्यांत भारतांत ' होमरुल लीग' ची ( स्वराज्य-संघ) स्थापना केली. लो. टिळकांनीहि स्वत:ची होमरुल लीग काढली आणि राजकीय आखाड्यांत पुन्हा उडी घेतली. 'केसरी'तून मर्मभेदक लेख लिहून व भाषणं करुन त्यांनी पुन्हा राष्ट्रप्रेम, निर्भयता व त्याग या गुणांची शिकवण सुरु केली. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या भागांत त्या वेळीं त्यांनी प्रामुख्यानं काम केलं. महायुध्दामुळे करांचं ओझं डोईजड झालं होतं. महागाई सतत वाढत होती आणि गरिबांना जगणं कठीण होऊं लागलं होतं. युद्धामुळे काँग्रेसला एकीकडे बळ चढूं लागलं असतांनाच क्रांतिकारकांनी त्याच वेळीं जर्मनीच्या मदतीनं परिस्थितीचा फायदा घेण्याचं ठरवलं. त्यांनी आपली जुळवाजुळव सुरु केली. परदेशांत वास्तव्य करीत असलेल्या भारतीय क्रांतिकारकांशी सांधा जुळवला गेला. साम्राज्यवाद्यांच्या गोटांत जो संघर्ष चालला होता त्याचा आपल्या देशासाठी लाभ घेण्याचा यामागचा हेतु होता. क्रांतिकारकांनी, ब्रिटिशांविरुध्द जर्मन शस्त्रांच्या साहाय्यानं युध्द पुकारण्यापर्यंतहि योजनेची आखणी केली; परंतु पहिल्या महायुध्दाच्या काळांतील क्रांतिकारकांची ही चळवळ कामाच्या सुसूत्रतेच्या अभावीं फसली. मात्र या सर्व धामधुमीमुळे ब्रिटिशांवर परिस्थितीचं कमालीचं दडपण वाढलं होतं. सरकारची दृष्टीहि त्यामुळे जरा बदलूं लागली.

यशवंत चव्हाण हा लहान विद्यार्थी कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिकत होता त्या काळांत 'सामाजिक सुधारणा अगोदर की राजकीय स्वातंत्र्य अगोदर' यासारखे आगरकर-टिळक यांच्यामधील महाराष्ट्रांतील वाद बाजूला पडून राजकारणाची गति पुष्कळच पुढे गेलेली होती. तरी पण या महत्त्वाच्या वादांतून निर्माण झालेल्या निष्कर्षांची चर्चा समाजांत सुरु राहिली होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org