इतिहासाचे एक पान. २२९

अशा प्रकारांना मग, कार्यकर्त्यांच्या शिबिरांत तोंड फुटत असे. पंचवीस-तीस वर्षं काम करत राहिलेल्या या जुन्या कार्यकर्त्यांची यशवंतरावांकडे तक्रार दाखल होई की, कालपरवाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही मंत्री बनण्याची संधि दिलीत याबद्दल आमची तक्रार नाही; परंतु त्यांच्या गावांतल्या आगमन-प्रसंगी, अन्य सर्व कामं सोडून, पुष्पहार हातांत घेऊन तासन् तास वेशीवर जाऊन आम्ही उभं रहावं हा काय प्रकार आहे! आणि आम्ही स्वागताला गेलो नाही म्हणून मंत्री आमच्यावर डोळे काढतात! हे आम्ही चालू देणार नाही. आम्हांला याविरुध्द पवित्रा घ्यावा लागेल!

अनुत्पादक कामासाठी कार्यकर्त्यांनी- मग ते जुने असोत वा नवे असोत – आपला वेळ फुकट दवडणं यशवंतरावांनाहि खटकत असे. शिबिरांत अशी कुणी तक्रार केली की ते मग दिलासा देत असत की, “ठीक आहे, असा फुकट वेळ दवडला जाऊं नये यासाठी, खाद्यावर झेंडा घेऊन तुम्ही निघालांत तर मी तुमच्या पाठीशी येईन. ”

जनतेची निकडीची गा-हाणी कार्यकर्त्यांनी समजून घ्यावीत, सरकारला सांगावीत, जनतेची खरी निकड आणि शासनाची रास्त अडचण, असा प्रश्र्न निर्माण झाल्यास शासनाती अडचण जनतेला सांगावी, जनता व सरकार यांच्यांत एकात्मता निर्माण करावी, असं कार्यकर्त्यांना त्यांचं सांगणं असे. कार्यकर्त्यांनी शेती, सहकारी चळवळ, शिक्षण अशी खातेवाटप करून घेतली, तर त्यांत काम करण्यास त्यांना भरपूर वाव आहे. कार्यकर्त्यांनी मंत्र्यांची स्तुतिस्तोत्रं गाण्याचं कारण नाही. भरीव कार्य करणा-या कार्यकर्त्यांकडे सरकार आपण होऊन जाईल! यशवंतरावांच्या मुखांतून असा सल्ला बाहेर पडतांच कार्यकर्त्यांकडूनहि त्यांना उत्स्फूर्त दाद मिळत असे.

एकात्मतेचं प्रतीक असलेल्या त्रिमूर्तीप्रमाणे महाराष्ट्राचं जीवन एकजिनसी बनवणं आणि समाज व राज्य यांचा समन्वय साधणं हे कार्य जे नेतृत्व साधील तेच महाराष्ट्राचं मंगल करील व ते स्थिर होईल, हा सिध्दान्त यशवंतरावांनी त्या काळांत निरनिराळ्या शिबिरांत सांगितला.

संसदीय क्षेत्रांतील साधनसामग्रीचा वापर करून पक्षाचं ध्येय गाठण्याच्या दृष्टीनं वाटचाल ही करावीच लागते; परंतु संघटनात्मक कार्याला अनेक मर्यादा असतात. मात्र संसदीय शाखेला जे कार्य पार पाडणं अशक्य आहे ते पार पाडण्यासाठी संघटनात्मक शाखेतल्या कार्यकर्त्यांनी जरूर प्रयत्न करावेत, असं सांगून कार्यकर्त्यांच्या मनांतला गोंधळ त्यांना साफ करावा लागे.

सारं सरकारनं करावं असा एक सर्वसामान्य दृष्टिकोन मूळ धरून असतो. सरकार जे करील ते आपल्या खाती जमा करणं कार्यकर्त्यांना सोपं ठरत असतं. सत्ताधारी पक्षांतल्या कार्यकर्त्यांचीच केवळ नव्हे, तर ‘हे सरकारनं केलं पाहिजे’ अशी सातत्यानं मागणी करत राहून विरोधी पक्षांनाहि जगायचं असतं. याबाबतची यशवंतरावांची दृष्टि मात्र साफ होती. विकासाचं काम सरकारला तर करायचं आहेच, पण त्यामध्ये समाजाची, कार्यकर्त्यांचीहि बरोबरीनं भागीदारी असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या पक्षांतले जे कोणी सत्तेच्या मागे असत त्यांना त्यांचं असं निक्षून सांगणं होतं की, पक्षाच्या संघटनेतल्या लोकांनी पक्षाच्या कार्यक्रमांत भागीदारी घेतली म्हणजे आपोआप सत्तेची भागीदारी चालून येते. कार्यकर्त्यांनी डोळसपणे कार्य करावं. आंधळं असू नये. आंधळा दुनियेत हिंडू शकेल, पण आंधळ्याच्या मागे दुनिया जाऊ शकणार नाही, असा त्यांचा कार्यकर्त्यांना व्यवहारी सल्ला होता.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org