इतिहासाचे एक पान. २२४

आणि पंडितजींना लगेच त्याचं दर्शनहि घडलं. मुंबईतला, नव्या राज्याच्या उद्घाटनाचा सोहळा संपवून परदेशच्या यात्रेचं प्रस्थान पंडितजींनी ठेवलेलं होतं. परदेशयात्रेला निघतानाच, आकाशांतून पंडितजींना नव्या महाराष्ट्राचं दर्शन घडावं अशी व्यवस्था यशवंतरावांनी केलेली होती. सागरांत लाँचेसची रचना अशी करण्यांत आली होती की, त्या लाँचेसमधील दिवट्यांच्या आकारांतून संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचं दर्शन घडावं. पंडितजी रात्री १ वाजतां विमानानं परदेशी जाण्यासाठी निघाले ते नव्या महाराष्ट्राचं दर्शन घेऊनच! आशीर्वाद त्यांनी अगोदरच दिला होता. नव्या गुजरातचे मुख्य मंत्री बनले. ‘घनःश्याम सुंदरा’ या अमरभूपाळीच्या सुरानं महाराष्ट्र दि. १ मे रोजी सकाळी जागा झाला तेव्हा मराठी मन मोहरून गेलं होतं. याच सोनियाच्या दिवशी यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे मुख्य मंत्री झाल्याचं महाराष्ट्राला ज्ञात झालं. चार वर्षांच्या अवधीत मुख्यमंत्रिपदाची तीन वेळा शपथ घेऊन न्यायाचं व समतेचं राज्य करीन अशी मराठी मनासमोर प्रतिज्ञा करणारे भारतांतले हे पहिलेच मुख्य मंत्री असावेत! योगायोग अपूर्व खरा!

त्या दिवशी, १ मे १९६० ला दुपारी सचिवालयांत नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधि झाला. १२ वाजून ३१ मिनिटांनी यशवंतरावांनी नव्या राज्याचे मुख्य मंत्री म्हणून शपथ घेतली. द्वैभाषिकाच्या मंत्रिमंडळांतले गुजराती मंत्री आता गुजरात राज्याचे मंत्री झालेले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची त्यांना पुनर्रचना करावी लागली. यशवंतराव हे द्वैभाषिकाचे मुख्य मंत्री होते. नव्या राज्याचे मुख्य मंत्री म्हणूनहि त्यांचीच निवड करण्यांत आली.

शपथविधि-समारंभाच्या वेळी, यशवंतरावांनी या दिवसाचा उल्लेख ज्ञानेश्र्वरांना साक्ष ठेवून ‘सोनियाचा दिवस’ असा केला. मुख्य मंत्र्यांनी या वेळी नव्या राज्याला कोणकोणती कामं करावी लागणार आहेत याचा विस्तृत आढावा घेतला आणि ही सर्व कामं करण्यासाठी मानसिक व इतर दृष्ट्या कोणती तयारी केली पाहिजे याची उजळणी केली. महाराष्ट्रानं आता एका नव्या कालखंडांत प्रवेश केलेला असल्यामुळे आपल्या आशा व आकांक्षा यांची पूर्तता करून घेण्याचा क्षण आता आला आहे अशी जनतेची स्वाभाविक भावना होती. या संदर्भात, जनतेच्या अपेक्षापूर्तीचा क्षण जवळ आणणं हा महाराष्ट्र राज्याचा मानबिंदु आहे असंच यशवंतरावांनी या वेळी सांगितलं. शपथविधीच्या या समारंभांत लोकांच्या भावनाच त्यांनी स्वतः बोलून दाखवल्या आणि सहका-यांचं लक्ष महाराष्ट्रासमोरील प्रचंड कामाकडे वेधलं.

राज्याच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रापुढील आर्थिक व सामाजिक प्रश्र्नांची उकल करण्याची तयारी आणि त्याची आखणी केलेली असल्याचं त्यांच्या या भाषणांतून ध्वनित झालं. महाराष्ट्रांतील लोकांनी त्यांचा धर्म, जात अगर पक्ष कोणता का असेना, आपण सर्व एकच बांधव आहोत असं मानलं पाहिजे, असं आवाहन करतांना त्यांनी नवा महाराष्ट्रीय हा केवळ मराठी भाषा बोलणारा नव्हे, तर जो महाराष्ट्रांत रहातो व आपल्या शक्त्यनुसार त्याचं जीवन समृध्द करतो, असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीय होय, अशी महाराष्ट्रीय माणसाची व्याख्या नव्यानं सांगितली.

बदलत्या कालमानास सुसंवादी अशी शासनयंत्रणा निर्माण करण्याचं काम यशवंतरावांनी अगोदरच्या काळांत सुरू केलेलंच होतं. समाजावादी पध्दतीचं नियोजन करण्यास ही शासनयंत्रणा मिळती-जुळती राहिली पाहिजे या दृष्टिकोनांतूनच या यंत्रणेची पुनर्रचना कशी केलेली आहे याचा पुनरुच्चार त्यांनी या प्रसंगी केला. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि दुष्काळी भाग यांच्या विकासाकडे विशेष लक्ष द्यावं लागणार होतं. या भागाच्या विकासाकडे राज्य-सरकार डोळ्यांत तेल घालून लक्ष देईल आणि त्यांच्या हितसंबंधांची जपणूक केली जाईल, असं आश्र्वासन त्यांनी दिलं. सरकारचं धोरण म्हणून त्यांनी जे घोषित केलं त्यावरून मुख्य मंत्र्यांचा राज्याविषयीचा विशाल दृष्टिकोन स्पष्ट झाला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org