इतिहासाचे एक पान.. २२

   २
------------

यशवंतारावांचा जन्म झाला त्या अगोदरची पंचवीस-पन्नास वर्षे आणि त्यांचं शिक्षण सुरु होतं तो सर्वच काळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रांतील मोठा धामधुमीचा होता. भारतीय स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक लढ्याच्या कथेची देदीप्यमान अशीं प्रकरणं याच काळांत तयार झालेलीं आढळतात. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धांत ब्रिटिश राज्यकर्ते आणि भारतीय जनता यांच्या परस्पर हितसंबंधांच्या संघर्षोतून सतत लढा सुरु राहिला तो प्रामुख्यानं याच काळांत ! भारतीय जनतेंत राष्ट्रीय भावना जागृत झालेली होती आणि बलशाली राष्ट्रीय आंदोलन निर्माण होण्याला पोषक अशी आर्थिक नैतिक, बौद्धिक, राजकीय परिस्थिती त्यामुळे देशांत तयार झाली होती. यांतूनच साम्राज्यवादाच्या विरुद्ध आंदोलनानं जन्म घेतला. जनतेमध्ये एकराष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली. कारण राज्यकर्त्यांच्या धोरणाचा देशांतील शेती, शेतकरी, व्यापार, उद्योग, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्र या सर्वांवरच अनिष्ट परिणाम घडत राहिला होता. ब्रिट्रिशांचं शेतीविषयक धोरण तर कमालीचं जुलमी होतं. शेतीला तें धोरण मारक होतं. त्या तसल्या धोरणामुळे सावकारीचं पेव फुटलं. कर वसूल करणा-या मध्यस्थांचा एक दुय्यम सरंजामदारी वर्ग तयार झाला. समाजांत नवे वर्ग वरच्या आणि खालच्या वर्गांत निर्माण झाले. वरच्या थरांत जमीनदार, मध्यस्थ व सावकार आणि खालच्या थरांत कुळं. वांट्यानं शेती करणारे वांटेकरी आणि शेत-मजूर अशीं हीं छकलं पडलीं. वसाहतवादाचं हें देशाला घडलेलं एक नवं दर्शन होतं. परिणामी शेतीचं उत्पन्न कमालीचं घडलं आणि मुळांतला दरिद्री शेतकरी दारिद्राच्या खोल गर्तेंत जाऊन पडला. राज्यकर्त्यांनी व्यापाराचीहि हीत गत करुन ठेवली होती. स्वदेशी धंदे मोडकळीला आले. नवे कामधंदे दिसेनासे झाले. त्यामुळे उद्योगधंद्यांतील लाखो कारागीर शेतीच्या मागे लागले आणि शेतीवरील लोकसंख्येचा ताण किती तरी पटींनी वाढण्यांतच त्याचा परिणाम झाला. खेडीं मोडकळीस आलीं.

देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनांत आधुनिक पाश्चात्त्य शिक्षणामुळे नवविचारांचे नवे अंकुर फुटूं लागले होते. पश्चिम-युरोपांत उदयास आलेले आधुनिक विचारप्रवाह भारतांत शिरुं लागले होते; आणि येथील बौद्धिक जीवनांत क्रांतीनं मूळ धरलं होतं. लोकशाही जनतेचं सार्वभौमत्व, बुद्धिवाद, मानवतावाद या कल्पना भारतीयांच्या मनांत रूजूं लागल्या होत्या. त्यांतून देशांतल्या अर्थव्यवस्थेकडे, समाज-जीवनाकडे आणि विशेषत: शासनसंस्थेकडे चिकित्सेनं पहाण्याचं काम सुरु झालं. अर्थात् हे नवे विचार, नवं आर्थिक व राजकीय जीवन आणि ब्रिटिशांचा राज्यकारभार याचा परिणाम शहरी भागावर प्रथम झाला आणि हळूहळू तो ग्रामीण भागांत पसरला.

महाराष्ट्रांत न्या. महादेव गोविंद रानडे, गणेश वासुदेव जोशी, सीतारामपंत चिपळूणकर आदि कार्यकर्त्यांनी १८७० मध्ये पुण्यांत 'सार्वजनिक सभा' स्थापन केली आणि लोकांना राजकीय शिक्षण देण्याचं काम आरंभलं. याच वर्षीं देशांत सर्वप्रथम स्वदेशीचा उच्चार झाला. ब्रिटिश गिरण्यांच्या हल्ल्यापासून देशी गिरण्यांना वांचवण्याचा उपाय म्हणून या तत्त्वाचा प्रचार सुरु झाला होता. भारतीय तरुणांमध्ये या काळांत नवीन राजकीय वारे वाहू लागले होते. बंगालमध्ये त्याचा पहिला आविष्कार झाला. तिथल्या नव्या मध्यमवर्गीयांना ब्रिटिश इंडिया असोशिएशनचं जमीनदार-धार्जिणं जुनाट धोरण मंजूर नव्हतं. हा नवा मध्यमवर्ग आणि बुद्धिवादी यांचा 'आम्हीच जनतेचे नेते आहोंत, जमीनदार नव्हत' असा आग्रह होता. आनंद मोहन बसू न सुरेंद्रनाथ बानर्जी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी १८७६ च्या जुलैमध्ये ' इंडियन असोशिएशन' ची स्थापना केली आणि सनदी नोकरांच्या परीक्षा-पद्धतींत सुधारणा या विषयावर चळवळ आरंभली. सुरेंद्रनाथांना त्यांनी चळवळीच्या प्रचारार्थ आणि पाठिंबा मिळवण्यासाठी देशाच्या अन्य भागांत पाठवलं. सामान्य जनतेला आपल्या राजकीय चळवळींत सामावून घेण्यासाठी तिथे त्यांनी कुळांच्या आणि शेत-मजुरांच्या हक्कासाठी चळवळ सुरु केली.

देशाच्या निरनिराळ्या भागांतील तरुणवर्ग जागृत बनला होता. १८८४ सालीं सी. राघवाचारी, जी. सुब्रह्मण्यम् अय्यर, आनंद चार्लू इत्यादि तरुणांनी मद्रास येथे 'महाजन-सभा' स्थापन केली आणि १८८५ सालीं सर फिरोजशहा मेहता, न्यायमूर्ति तेलंग प्रभृति कार्यकर्त्यांनी मुंबई इथे 'बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन' स्थापन केली. राजकीय जाण आता पसरत चालली होती आणि अखिल भारतीय संघटनेची निकड सर्वांनाच जाणवूं लागली होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org