इतिहासाचे एक पान. २१६

“महाराष्ट्राच्या परमेश्र्वराला प्रणाम करण्यासाठी आणि सर्वांच्यातर्फे श्रीशिवछत्रपतींचे आशीर्वाद घेण्यासाठी या सुवर्ण-दिनी मी इथे आलो आहे. युगायुगांतून येणारा हा दिवस आहे. तीनशे वर्षांपूर्वी तो एकदा आला आणि या शिवनेरीत शिवाजीमहाराजांचा जन्म झाला. केवळ एका व्यक्तीचा, एका बालकाचा तो जन्म नव्हता, तर त्या बालकाच्या रूपानं महाराष्ट्राचा नवा इतिहास जन्माला येत होता. शिवजन्मानं हा इतिहास त्या वेळी गडावर सुरू झाला. त्याच या पवित्र ठिकाणी विसाव्या शतकांतल्या नव्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासास सुरुवात होत आहे, हा अपूर्व योगायोग आहे.

“छत्रपतींच्या जन्मठिकाणी स्वतंत्र भारताचं निशाण फडकवून महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या मंगलदिनी भारतानं सुध्दा त्यांना मुजरा केला आहे. महाराष्ट्र-राज्याच्या रूपानं एक नवं कर्तृत्व आज जन्माला येत आहे. तृप्तीचा हा क्षण छत्रपतींच्या पुण्याईनं निर्माण झाला आहे. हा आनंद उपभोगतांना, या आनंदामागोमाग येणा-या जबाबदा-या पार पाडण्यासाठी आता सिध्द होऊ या. एक किल्ला जिंकला, आता दुसरा किल्ला जिंकण्यासाठी विकासाची घोडदौड सुरू करूं या. कारण या विकासांतूनच महाराष्ट्राचं भवितव्य आकारास येणार आहे.

“भारतांत चाळीस कोटि लोकांचं राज्य निर्माण झालेलं आहे ते भारतीयांच्या मनांत स्वातत्र्यांचा अभिमान जोपर्यंत जागृत आहे तोपर्यंत टिकणार आहे. जसा भारत एकदाच आणि कायमचा निर्माण झाला तसा महाराष्ट्रहि एकदाच निर्माण होत आहे. आतापासून पुढे अनंतकाळपर्यंत महाराष्ट्र भारताशी समरस होऊन सांगणार आहे की, आमच्या मराठी जीवनांत जे जे कांही चांगलं आहे, मंगल आहे, ते भारताच्या समृध्दीसाठी, संरक्षणासाठी आणि सेवेसाठी आम्ही देणार आहोत. आम्ही प्रथम भारतीय आणि नंतर महाराष्ट्रीय आहोत.

“महाराष्ट्रांतील जनतेनं गेल्या चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक प्रकारांनी आणि मार्गांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी या प्रयत्नांचे दोन कालखंड मानतो. प्रतापगडावर पंडित नेहरूंच्या हस्ते शिवप्रभूंच्या पुतळ्याचं अनावरण होण्यापूर्वीचा एक आणि प्रतापगडापासून शिवनेरीपर्यंतचा दुसरा. पंडित नेहरू ज्या दिवशी शिवछत्रपतींना प्रणाम करण्यासाठी प्रतापगडावर आले तेव्हापासून माझ्या मतानं या निरगाठीनं बांधलेल्या प्रश्र्नाचे धागे उकलत गेले. शेवटी साडेतीन कोटींचा महाराष्ट्र आता एकत्र येत आहे.

“महाराष्ट्र-जीवनाच्या चार परंपरा मला दिसतात. मुक्तेश्र्वर-ज्ञानेश्र्वरापासूनची संतांची परंपरा समतेचा, न्यायाचा, बंधुभावाचा संदेश देत असतांना दिसते. दुसरी प्रवृत्ति वीर, पराक्रमी, राजकारणी पुरुषांची आहे. तिचं प्रतीक छत्रपति शिवाजीमहाराज हे आहेत. अन्यायाविरुध्द दलितांचा कैवार घेऊन लढण्याची तिसरी प्रवृत्ति महात्मा फुले यांनी दिलेली आहे. आणि शेवटी विद्वानांच्या बुध्दिमत्तेचा वापर देशासाठी करून त्या मार्गानं वाटेल तो त्याग हसतमुखानं सहन करण्याची राजकारणी प्रवृत्ति लो. टिळकांनी महाराष्ट्राला दिली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org